बदललेले राजकारण २ : पत्रकार हेमंत जोशी
बदललेले राजकारण किंवा बदललले राजकीय संदर्भ त्याआधी राज्यात बदललेले हवामान त्यावर काहीतरी बोलूया. बघा, राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी झाडांची केवळ रोपटे लावायला घेतल्या घेतल्या चक्क त्यांच्या जिल्ह्यात, नागपुरात आणि नेहमी कोरड्या राहणाऱ्या विदर्भातही केवढा धो धो पाऊस पडला, उद्या याच रोपट्याचे डेरेदार वृक्षात रूपांतर झाल्यानंतर सुधीरभाऊ गडकरींना महालात बोटीने भेटायला गेल्याचे वारंवार दर्शन घडल्यास यापुढे आश्चर्य वाटणार नाही किंवा फडणवीसांचा जो सहकुटुंब बोटीवरचाच एक फोटो मागे व्हायरल झाला होता यापुढे त्यांना देखील नौका विहारासाठी नागपूरबाहेर जावे लागेल, वाटत नाही, आता असे वाटायला लागलेले आहे कि नागपूरचे नाव बदलवून ऍमस्टरडॅम ठेवण्यात येईल आणि फडणवीस देखील इकडून तिकडे तिकडून इकडे प्रसंगी सह कुटुंब नौकेंतूनच बाहेर पडतील, एखाद्या जाहिरातीसारखे यापुढे नक्की म्हणता येईल, ये तो वनमंत्री का कमाल है. अर्थात हे सारे मी येथे गमतीने म्हणतो आहे, उद्या दादा बारामतीकर समुद्रात मुतले म्हणून पूर येणार नाहीकिंवा पाणी अधिक खारट होणार नाही. पटकन काहीही घडत नसते…
सुधाकर, मधुकर आणि मनोहर तिघेही दिवंगत माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे सख्खे पुतणे पैकी सुधाकरराव नाईक आणि मनोहर नाईक राजकारणात आले, मधुकरराव यांनी राज्याच्या राजकारणात कधी रस घेतला नाही, फारतर थोड्याफार स्थानिक राजकारणात ते रमले, त्यांनी शेती करण्यात आपले मन अधिक रमविले. मधुकरराव यांचा मुलगा म्हणजे सुधाकरराव आणि मनोहर नाईक यांचा पुतण्या, निलय, तो मात्र कायम राजकारणात स्थिरावण्यासाठी थेट १९९०-९२ पासून धडपडत होता पण त्याची हाडतूड फार झाली किंवा काही वेळा त्याने ती करवून घेतली. एकदा नाही म्हणायला निलयचे राजकारणात छान बस्तान देखील बसले होते, काका मनोहर नाईक यांनी मनापासून धडपड करून निलय यांना यवतमाळ जिल्हा परिषदेचे अध्यक्ष केले होते पण हे पद निलयला टिकवता आले नाही, मग सारेच बिनसतं गेले. नाकापेक्षा मोती जड, असे निळ्याच्या बाबतीत घडते आहे ध्यानात आल्यानंतर मनोहर नाईक आणि सुधाकररावांनी देखील निलायला राजकारणात सत्तेत पुढे येण्याची संधी दिली नाही. महत्वाचे म्हणजे आपल्या वडिलांप्रमाणे झोपा काढण्यात अधिक आनंद घेणाऱ्या मनोहर नाईकांच्या मुलांनी जेव्हा राजकारणात यायची तयारी सुरु केली आणि पुतण्याऐवजी मनोहर नाईक यांनी पोटच्या मुलांनाच संधी देण्याचे ठरविले तेव्हापासून तर निलय यांचे घरातले बंड अधिक तीव्र होत गेले…
निलय नाईक देखील कमी नव्हते त्यांनी मग थेट या दोन्ही भावांविरुद्ध उघड बंड पुकारले पण अस्वस्थ होण्यापलीकडे आणि वाढलेल्या मनस्तापाचे मधुमेहात तसेच हृदयरोगात रूपांतर होण्यापलीकडे फारसे काही घडत नव्हते. मी, निलय आणि नागपूरचे अजय पाटील तिघेही नव्वदच्या दशकापासून मित्र. वर्ष दीड वर्षांपूर्वी अजय पाटील निलयच्या मदतीला धावले त्यांनी निलयला थेट भाजपा मध्ये आणले, ज्या घराण्याने कायम संघ जनसंघाला अतिशय दूर ठेवले हे असे राज्यातल्या अनेक घराण्यातून जे बघायला मिळते आहे, बघून हेच म्हणावे वाटते, बीजेपी हद करदी आपने…
राष्ट्रवादीतून तीन वर्षांपूर्वी भाजपा मध्ये आलेल्या नागपुरातल्या अजय आणि त्यांची पत्नी नगरसेविका प्रगती पाटील यांनी पुढे मित्रवर्य निलय नाईक यांना देखील भाजपा मध्ये आणले आणि यवतमाळ जिल्ह्यातले नेमके राजकारण ओळखून देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना थेट विधान परिषद सदस्य केले, आमदारकीची उशीर का होईना टिकली कपाळावर लागल्याने निलय सध्या खुश आहेत, पाळी गेलेल्या थोराड तरुणीसारखे त्यांचेही झाले आहे म्हणजे अनेक वर्षांच्या धडपडीनंतर निलयचे जमले आहे, ते आमदार झाले आहेत.राजकारणात डबघाईस आलेल्या मनोहर नाईकांना हा मोठा झटका आणि म्हणाल तर फटका बसला आहे…
यवतमाळ अमरावती अकोला आणि पलीकडे भिंतीला लागून असलेल्या मराठवाड्यात पसरलेल्या बंजारा समजला फडणवीसांनी खुश केले आहे, यापुढे निरपेक्ष मनाने आणि काका मनोहर नाईक यांच्यासारख्या झोपा न काढता जर निलय बंजाऱ्यांमध्ये मिसळले तर कालपर्यंत मनोहर नाईक यांच्या घरापुढे या समाजाची जी रांग लागत होती किंवा त्यांच्यानंतर थेट शिवसेनेतून राज्यमंत्री झालेले संजय राठोडांना, मनोहर नाईक यांना पर्याय म्हणून ज्या बंजारा समाजाने नको तेवढे महत्व दिले होते ती गर्दी अगदी सहजासहजी निलय नाईक यांच्या सभोवताली जमू शकते आणि विद्यमान मुख्यमंत्र्यांना नेमके हेच त्यांच्याकडून अपेक्षित आहे, बघूया पुढल्या काही महिन्यात निलय मोठे नेते होतांना दिसताहेत कि काकासारख्या गाढ झोपा काढतांना….
क्रमश:
पत्रकार हेमंत जोशी