बदललेले राजकारण ३ : पत्रकार हेमंत जोशी
काल परवा मी मुंबईवरून आणि पत्रकार अशोक वानखेडे थेट दिल्ली वरून नागपूरला गेलो होतो, निमित्त होते भय्यूमहाराजांना श्रद्धांजली वाहण्याचे. सभागृहात जेमतेम माणसे होती, मी भाषणातही म्हणालो, आज येथे या ठिकाणी भय्यू महाराज स्वतः आले असते तर हे सभागृह क्षणार्धात तुडुंब भरले असते. आज ते नाहीत आणि त्यांनी मागे ठेवलेल्या कुटुंब सदस्यांचा कवडीचा देखील उपयोग नाही हे ध्यानात आल्या आल्या ते हयात असतांना त्यांच्या पायाशी कायम पिंगा घालणाऱ्यांनी लगेच पाठ फिरवली, अजब माणसे असतात नाही का…
वानखडे मला म्हणाले, मध्यप्रदेशात एक किस्सा नेहमी सांगितल्या जातो कि एकदा एका न्यायाधीशांचा कुत्रा वारल्यानंतर त्याच्या शवयात्रेला दोन हजार माणसे जमली होती, जेव्हा न्यायधीश गेले तेव्हा फक्त वीस माणसे होती. पृथ्वीराज चव्हाण जेव्हा मुख्यमंत्री होते त्यांची केवळ एका झलक बघण्यासाठी मंत्रालयात दररोज कितीतरी माणसे या राज्यातून ताटकळत बसलेली असायची, हेच पृथ्वीराज जेव्हा आज जवळूनही जातात, तेच भेटायला तारसणारे त्यांना पाहून वाट वाकडी करून घेतात, अर्थात येथे चूक पृथ्वीराज यांची अधिक, तेव्हा ते माणूसघाणे वागले नसते तर आज पदोपदी त्यांना मान खाली घालून विधान भवनात फिरावे लागले नसते. कारण त्यांच्याच मंत्रिमंडळात असलेल्या अजित पवारांच्या भोवती आज ते सत्तेत नसतांनाही कार्यकर्त्यांचा घोळका असतो, तेव्हाही अजितदादा काम घेऊन येणाऱ्या सामान्य लोकांना देखील भेटायचे म्हणून…
माणसे संधीसाधू नक्की असतात ते एकदा समोरचा सत्तेतून खाली उतरला कि त्याच्याकडे पाठ करतात पण सत्तेत असतांना जर मंत्र्यांच्या,नेत्यांच्या डोक्यात सत्तेचं माज गेला नाही तर सत्तेतून ते उतरल्यानंतर नक्की काही प्रमाणात गर्दी कमी होते पण सारेच पाठ करून मोकळे होतात असेही नक्की घडत नाही. उद्या जेव्हा केव्हा ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासारखे बोटावर मोजण्याएवढे मंत्री सत्तेत भलेही नसतील पण लोकांच्या मनात त्यांच्याविषयी कृतद्न्यता नक्की असेल. भय्यूमहाराजांच्या त्या श्रद्धांजलीपर कार्यक्रमाला माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते दत्ता मेघे आल्यानंतर माझे लक्ष माझ्या हातांसहित आपोआप त्यांच्या पायांकडे गेले कारण दत्ता मेघे हे एकेकाळी सर्वसामान्य लोकांचे नेते होते, मंत्री होते. त्यांना भेटायला जाणारे शेकडोंनी जरी असले तरी त्यातला एकही रिकाम्या हाताने परतला, घडायचे नाही…
मनीषा कायंदे भाजपा मध्ये असतांना कायम चर्चेत असायच्या, त्यांना हवे ते यश त्यावेळी दुर्दैवाने मिळाले नाही अन्यथा दोन वेळा निवडणुका लढवून पराभूत झालेल्या मनीषा कायंदे फार पूर्वी आमदार झाल्या असत्या. थोडक्यात भाजपा मध्ये असतांना त्यांच्यावर अन्याय झाला असे म्हणणे नक्की चुकीचे ठरेल फक्त काही सिच्युएशन्स अशा निर्माण झाल्या कि त्यांना भाजपाला सोडचिठ्ठी देणे अधिक सोयीचे वाटले आणि त्यांनी ते केले. त्यांनी भाजपा का सोडली ती चर्चा मात्र येथे नको आणि भविष्यात
देखील नको. त्यांची थेट उद्धव ठाकरे यांच्याशीच ओळख असल्याने त्या २०१२ च्या दरम्यान थेट त्यांनाच भेटायला गेल्या आणि शिवसेनेत विनायस सहभागी झाल्या…
यावेळी अनिल परब यांचे पुन्हा एकदा विधान परिषदेवर जाणे नक्की होते पण मनीषा कायंदे कि मिलिंद नार्वेकर त्यावर चर्चा बऱ्यापैकी रंगली होती, नार्वेकर आज भलेही विधान परिषदेवर गेले नसतील पण ते किंवा हर्षल प्रधान, एका दिवस नक्की विधान परिषद सदस्य होतील, हि म्हणाल तर काळ्या दगडावरची रेघ आहे, येऊ घातलेल्या विधान सभा निवडणुकीत भावोजी बांदेकर थेट लोकांमधून निवडणूक लढवतील हेही नक्की आहे त्यामुळे भावोजींची दरवेळी विधान परिषदेसाठी चर्चा तशी निरर्थक असते. ज्या खुबीने आणि मेहनतीने नार्वेकर यांनी मातोश्रीवर कमांड आणि सेनेत डिमांड मिळविलेली आहे, एक हक उनका नक्की बनता है, विधान परिषदेत जाण्याचा. एखाद्या विद्यार्थ्याने पाचवीत असतांनाच दहावीच्या परीक्षेची तयारी करावी तसे मिलिंद नार्वेकर यांचे फार पूर्वीपासून आहे, ते विधान सभेचे कोणतेही अधिवेशन सुरु असतांना अनेकदा सभागृहातील गॅलरीत मुद्दाम जाऊन बसतात, बहोत दुरकी सोचते है..
क्रमश:
पत्रकार हेमंत जोशी