फितूर : पत्रकार हेमंत जोशी
या राज्यात आता यापुढे काहीही घडू शकते असे वाटायला लागले आहे,म्हणजे ज्या नाशिकच्या कराडांना शिक्षकांनी विधान परिषदेवर निवडून पाठविले त्या उच्चशिक्षित शिक्षकांचे नेतृत्व करणाऱ्या दराडेंना नागपूर येथे विधान भवनात शपथ घेतांना त्यातले शब्द देखील धड वाचता येत नव्हते केवढे हे या राज्याचे दुर्दैव. भविष्यात एखादा तडीपार गुंड या राज्यात यापुढे गृहमंत्री झाला तर फारसे आश्चर्य वाटून घेऊ नये..आता खरेच असे वाटायला लागले आहे कि देवेंद्र फडणवीस यांनी या राज्याचे मुख्यमंत्रीपद स्वीकारण्यात विनाकारण घाई केली त्यावर एकदा मला अर्थमंत्री मुनगंटीवार मात्र नेमके उलटे म्हणाले होते म्हणजे ते हेच म्हणाले कि एवढ्या मोठ्या राज्याचे मुख्यमंत्रीपद नशिबाने चालून येते, त्यामुळे फडणवीसांनी ते स्वीकारून घाई आणि चूक केली वाटत नाही..
माझा पत्रकारितेतला प्रदीर्घ अनुभव हेच सांगतो कि फडणवीस हे एकदा किंवा अनेकदा मुख्यमंत्री होणारच होते, फक्त त्यांनी आधी काही महत्वाची खाती या राज्याचे एक सक्षम मंत्री म्हणून हातावेगळी केली असती तर त्यांना आज वारंवार दरदिवशी जणू वाढून ठेवलेल्या संकटांना तोंड द्यावे लागते, ते नक्की घडले नसते जर ते आधी मंत्री तदनंतर मुख्यमंत्री झाले असते. आज फडणवीस आहेत पण त्यांच्या जागी दुसरे कोणीही मुख्यमंत्री झाले असते तरी त्यांना शिवसेनेने आणि विरोधकांनी सुचू दिले नसते त्यामुळे उर्वरित दोन ते अडीच वर्षे नक्की फडणवीस मुख्यमंत्री जर झाले असते तर त्यांना आज बसता उठता जो मानसिक बौद्धिक त्रास होतोय, तेवढे नक्की सहन करावे लागले नसते…
बहुसंख्य मोस्ट फेल्युअर मंत्री राज्यमंत्री आणि गुप्त हितशत्रू शरद पवार यांच्यासारखे, सतत नामोहरम करण्याची एकही संधी न सोडणारे विरोधक, केवळ फडणवीस कणखर आहेत म्हणून एवढे सहन करू शकले, एखादा लेचापेचा असता तर ३५ वर्षांपूर्वी जसे स्व. मधुकरराव चौधरी विरोधकांना कंटाळून अज्ञातवासात निघून गेले होते, पुढे ते सेवाग्रामला सापडले, ते तसे एखाद्या कमकुवत मनाच्या मुख्यमंत्र्यांचे झाले असते त्याने सरळ उठून राजीनामा दिला असता आणि काही दिवसांसाठी असा मुख्यमंत्री थेट काशीला निघून गेला असता…
www.vikrantjoshi.com
एखादे रान चारही बाजूने पेटवून द्यायचे आणि मध्यभागी गरीब प्राण्यांना कोंडून ठेवायचे हे असे फडणवीसांचे करून ठेवले आहे त्यांच्या सभोवताली अक्षरश: संकटांचा वणवा पेटवून दिलेला आहे वरून जणू अप्रत्यक्ष आव्हान त्यांना दिले आहे कि दाखव सहीसलामत त्यातून सुटका करवून. मराठा आंदोलन करतांना नक्की पैसे तर लागतात, हे पैसे कोण देतंय ती नवे जर समोर आलीत तर सारेच्या सारे तोंडात बोटे घालून अवाक होतील पण वेगळ्या विचारांचे मुख्यमंत्री त्यापलीकडले आहेत, एवढेच सांगतो विरोधक आर्थिक दृष्ट्या अमुक एखादया आंदोलनाच्या पाठीशी उभे राहणे प्रसंगी आपण हे समजू शकतो पण जेव्हा सत्तेतलेच किंवा शासन व प्रशासनातले ज्यांच्यावर मुख्यमंत्र्यांनी प्रचंड विश्वास ठेवून त्यांना पदे किंवा महत्वाच्या ठिकाणी नेमलेले आहे असे झारीतले शुक्राचार्य जेव्हा मराठा आंदोलनाला मोठी आर्थिक रसद पुरवितात, ते बघून हसावे कि रडावे, कळत नाही, जेव्हा आपले घरच जणू आपल्याला ठार मारायला निघते तेव्हा अपेक्षा तरी कोणा कडून करायची, ठेवायची, हे असे तंतोतंत फडणवीसांच्या बाबतीत घडते आहे, घडले आहे…
मला वाटते अगदी जवळच्यांनी अतिशय खुबीने मुख्यमंत्र्यांचा ‘ अभिमन्यू ‘ करून ठेवला आहे, बदमाश अधिकारी, नेहमीचे थर्डग्रेड दलाल आणि अति भावनाशून्य नेत्यांनी अत्यंत चलाखीने फडणवीसांच्या भोवती आधी खुबीने स्थान निर्माण केले आणि आज मुख्यमंत्र्यांना अतिशय अडचणीत आणून ठेवलेले आहे. ज्या दिवशी मला मुख्यमंत्री या झारीतल्या शुक्राचार्यांनी नावे विचारतील, मी ती पटापट सांगून मोकळा होईल, प्रसंगी लिहून मोकळा होईल कारण तुम्हाला माहित आहे, भीती हा शब्द माझ्या शब्कोशात नाही…
अत्यंत आणि अतिशय महत्वाचा मुद्दा सांगतो, ज्या निरागस मनाने फडणवीस सच्चा देशसेवक म्हणून हे राज्य हाकताहेत, विरोधकांना किंवा झारीतल्या शुक्राचार्यांनी वाटते कि ते लोकांच्या मनातून उतरतील आणि हे राज्य हाती घेणे सोपे जाईल, नेमकी हि मोठी चूक या मंडळींची होते आहे. राज्यातले सामान्य मतदार अगदी मराठयांसहित अति भावनिकरित्या फडणवीसांशी मनाने मनातून मनापासून जोडल्या गेलेले आहेत त्याचा येणाऱ्या कोणत्याही निवडणुकीत मग ती लोकसभेची असो अथवा विधानसभेची, फायदा १०० टक्के फक्त आणि फक्त फडणवीसांनाच होईल विशेष म्हणजे ते एखादया सोलो हिरोसारखे हे राज्य पुन्हा एकदा जिंकून मोकळे होतील, अशा स्वच्छ साफ नियतीच्या नेत्याला असे छळणे नक्की चांगले नाही…
तूर्त एवढेच :
पत्रकार हेमंत जोशी