आठवणी आशाजींच्या : पत्रकार हेमंत जोशी
आमच्या बुलढाणा जिल्ह्यातलेच एक लोकप्रतिनिधी आहेत,चुकून केव्हातरी तेही बायकोने हट्ट सोडला नाही म्हणून तिला मुंबईत घेऊन आले, फिरता फिरता बायकोला भूक लागली म्हणून तिला एका उडप्याच्या हॉटेलात घेऊन गेले, बसले, तेवढ्यात त्यांचे लक्ष शेजारच्या टेबलवर बसलेल्या आणखी एका जोडप्यावर गेले त्यातला पुरुष दिसायला बावळट होता आणि त्याच्या सोबतीने बसलेल्या तरुणीचा पदर ढळलेला होता, मग काय…याला विचारपूस करायची आयती संधी मिळाली…त्याने मग त्या पुरुषाकडे तोंड करीत विचारलेच, मी तुम्हाला कुठेतरी बघितलेले आहे त्यावर तो पुरुष म्हणाला, साहेब पण मी तुम्हाला लगेच ओळखले..अहो हि तरन्नुम तिचा मेकअप नाही म्हणून तुम्ही तिला ओळखले नाही आणि मी शेषराव, दीपा डान्स बार मध्ये पियानो वाजवतो कि…विचार करा, केवढा हाणला असेल त्यादिवशी वहिनींनी.
असो, आशा भोसले यांच्या वाढदिवसानिमीत्ते मला त्यांच्या सहवासातले काही अविस्मरणीय क्षण आठवले, माझी खात्री आहे त्यांच्या ते कदाचित खिसगणतीतही नसतील. ज्या सकाळी वर्षा भोसले यांनी म्हणजे त्याच्या लाडक्या पण अपयशातून आयुष्यात काहीशा फ्रस्ट्रेट झालेल्या लेकीने आत्महत्या केली त्याआधीच्या रात्री सिंगापूरला मिफ्ता आयोजित मराठी कलाकारांच्या रजनीत अभिनेता सचिन पिळगावकर यांनी त्यांची जी प्रदीर्घ मुलाखत घेतली होती त्यावेळचा मीही एक साक्षीदार, मी त्या कार्यक्रमाला होतो आणि आशा भोसले त्या मुलाखतीत आपल्या मुलांविषयी भरभरून बोलल्या होत्या. विशेष दुःखद म्हणजे सकाळी त्यांना हि बातमी कळविल्यानंतर विमानात सीट शिल्लक नसल्याने त्या एकट्याच मुंबईला निघाल्या आणि एरवी अति शिष्ट वाटणाऱ्या साऱ्याच हवाई सुंदऱ्यांनी त्यांना त्या प्रवासात भरभक्कम मानसिक आधार दिला होता…
दुसरा एक किस्सा तर फार पूर्वीचा एकदा व. पु. काळे यांच्या कुठल्याशा कथाकथनाच्या एका विशेष कार्यक्रमाला पार्ल्याच्या दीनानाथ नाट्यगृहात आशा भोसले यायच्या होत्या. व. पु. आदल्या दिवशी सकाळीच माझ्या कार्यालयात आले मग आम्ही दोघेही व.पु. यांच्या स्कुटरवर बसून दादरच्या आस्वाद मध्ये नाश्त्याला गेलो तेथे मग व.पु. म्हणाले, हेमंत उद्या तुम्ही सहकुटुंब यायचे तर आहेच पण तुम्ही माझ्या घरी लवकर या आणि मी ज्या मंडळींची नावे सुचवेल त्यांना तुम्ही दीनानाथाला घेऊन यायचे आहे. मी अर्थात जबाबदारी पार पाडली पण व.पु. मूळे आशाजींची उपस्थिती आणि त्यांचे बोलणे जे अनुभवले, तोही एक अविस्मरणीय प्रसंग…
तिसरा किस्सा तर एकदम धमाल. मला अगदी अलीकडे म्हणजे चार दोन वर्षांपूर्वी कॅनडा टोरांटोला व्हाया झुरिक जायचे होते. मुंबईतल्या विमानतळावर सारे सोपस्कार पूर्ण करून बिझिनेस लाउंज मध्ये जाऊन बसलो आणि समोर बघतो तर काय दस्तुरखुद्द आशाजी त्यांचे चिरंजीव आनंद आणि नात तिघेही बसलेले. मी त्यांना परिचय करून देत म्हणालो कि मी योगेश खडीकरांचा ( म्हणजे त्यांच्या भाच्याचा ) मित्र, बघा तुम्हाला आठवत असेल कि मी आणि योगेश तुमच्याकडे अमुक दिवशी माझ्या एका आयकर खात्यात चीफ कमिश्नर असलेल्या मित्राला घेऊन येणार होतो ते तुमचे मोठे फॅन असल्यामुळे, त्या लगेच म्हणाल्या, अरे हो, पण त्यादिवशी माझ्या अंगात खूपच ताप होता, मी योगेशकडे दिलगिरी व्यक्त केलीही होती, त्यावर मी त्यांना म्हणालो, हो, मला निरोप मिळाला होता….
आश्चर्य म्हणजे त्यादिवशी आम्ही विमानातही चौघे थेट झुरिक पर्यंत एकत्र होतो आणि त्यादरम्यान ज्या गप्पा रंगल्या, कल्पना करा, काय धमाल मजा आली असेल. उतरतांना त्या एवढेच म्हणाल्या, तू पत्रकार असून देखील विशेष म्हणजे एकही रटाळ प्रश्न गप्पांच्या ओघात विचारला नाही. आनंद देखील रेस्टॉरंट व्यवसायात असल्याने त्यांना जेव्हा मी म्हणालो, माझ्या धाकट्या मुलाचा मुंबईत अमुक तमुक ब्रँड आहे, ते उसळून एवढेच म्हणाले, मी त्याच्या ब्रँडचा अतिशय फॅन आहे, आणि त्यांनी मुद्दाम त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक मला दिला. महत्वाचे म्हणजे त्या परदेशातून परतल्यानंतर आठवणीने योगेशला म्हणाल्या, तुझा मित्र भेटला होता, छान गप्पा झाल्या…
ज्यांची एक झलक पाहण्यासाठी सामान्य माणूस आयुष्यभर धडपडत असतो, अशा आभाळाएवढ्या कितीतरी मोठ्या माणसांच्या सहवासात मला केवळ पत्रकार असल्याने मोलाचे क्षण घालविता येतात, घालविता आले. घालविता येतील. आशाबाईंना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा आणि हो, निदान मला त्यांना पुन्हा एकदा भेटण्यासाठी तरी परमेश्वराने त्यांना किमान शंभर वर्षे आयुष्य द्यावे तेही रोगमुक्त…
शेवटी आणखी एक महत्वाचे काल आशाजींच्या वाढदिवसानिमीत्ते माझी लाडकी गायिका आणि या देशातली एकमेव डिट्टो आशा, मधुरा दातारच्या गाण्याच्या कार्यक्रमाला तिच्या आईचे म्हणजे वैजु दातारांच्या निरोपावरून पुण्याच्या यशवंतराव मध्ये हजेरी लावली, विशेष म्हणजे या कार्यक्रमात दस्तुरखुद्द हृदयनाथ मंगेशकरांनी आशाजींच्या डोळ्यात अश्रू आणणाऱ्या कितीतरी आठवणी सांगितल्या आणि हो, सांगायला नकोच, मधुराने जवळपास चार तास आम्हा तुडुंब भरलेल्यांना मंत्रमुग्ध करून सोडले…
तूर्त एवढेच.
पत्रकार हेमंत जोशी