मंत्रालय मुतारी : पत्रकार हेमंत जोशी
मागल्या आठवड्यात म्हणजे दिवाळीपूर्वी मी मंत्रालयात गेलो होतो. चवथ्या माळ्यावर सार्वजनिक बांधकाम खाते आहे त्यांचे दोन दोन सचिव देखील तेथेच बसतात, अन्य मंत्र्यांचे आणि इतर काही महत्वाचे विभाग देखील या चवथ्या माळ्यावरच आहेत, मुतायला झाले म्हणून तेथल्याच एका मुतारीत घुसलो, जे दृश्य अख्या मंत्रालयातील प्रत्येक सार्वजनिक मुतारीत आहेत तेच तेथेही होते म्हणजे साऱ्याच मुताऱ्यांमध्ये किंवा शौचालयांमध्ये केव्हा घसरून पडू, नेम नसतो, एवढे ते अस्वच्छ, गचाळ, मुताने आणि विष्ठेने तुडुंब भरलेले, उग्र वासाने वांत्या होतील एवढे घाण, दुर्गंधीयुक्त, बेशरमपणाचे जणू प्रतीक अशी अवस्था अख्य्या मंत्रालयातील मुताऱ्यांची संडासाची आहे, असते, दररोज असते. नेमके नको ते घडलेच म्हणजे माझ्या शेजारी मुतायला उभा असलेला एक वृद्ध कार्यभाग उरकल्यानंतर हात धुवायला गेला आणि एवढ्या जोरात घसरून पडला, मला क्षणभर वाटले हा मेला, मी त्याला उठून उभे केले, बाहेर आणले, सहज विचारले, कोठून आलात, तो म्हणाला, मी गडचिरोली वरून आमच्या राज्यमंत्री आत्राम साहेबांना भेटायला आलो, माझे त्यांच्या मार्फत चंद्रकांत पाटलांकडे काम होते पण अत्राम साहेब कधीही भेटतच नाहीत, ना त्यांची बंगल्यावर भेट होते ना कधी मंत्रालयात, तिकडे चंद्रकांत पाटलांकडेही तेच, त्यांना भेटायला बंगल्यावर गेलो तर दिवसभर त्यांच्या बंगल्याचे गेट बंद होते फक्त जी माणसे दिवाळीचे पुडके घेऊन येत होते त्यांना तेवढे आत सोडल्या जायचे, मला तर अक्षरश: तेथल्या सुरक्षा रक्षकांनी हाकलून लावले….
येथे मंत्रालयात त्यांच्या कार्यालयात एवढी गर्दी आहे कि भेट होईल शक्य वाटत नाही, आता पैसे देखील संपले आहेत, आज निघालो, माझ्या डोळ्यात पाणी आले. चंद्रकांतदादा, हे शंभर टक्के खरे आहे कि सामान्य माणसाला मंत्रालयात तुमची भेट घेणे सर्वस्वी तुमच्या स्टाफच्या हातात असते आणि बहुतेकवेळा खिसे पाहून त्यांना कार्यालयात आत घेतले जाते आणि बंगल्यावरनेमक्या कोणत्या लोकांना आत सोडल्या जाते, जरा तुमच्या बंगल्याचे कॅमेरे तपासा, तुमच्या ते सहज लक्षात येईल. असे घडता कामा नये निदान तुमच्या कडून हि अपेक्षा नाही, अत्यंत वाईट तुमच्याविषयी मेसेज राज्यात पसरतो, वाईट वाटते…
येथे अत्यंत महत्वाचा मुद्दा मंत्रालयातील संडासांचा आणि मुताऱ्यांचा आहे, जर राज्याच्या प्रमुख इमारतीमध्ये कमालीची दुर्गंधी आणि अस्वच्छता आहे, मोदींच्या स्वप्नातले स्वच्छ राज्य कसे प्रत्यक्षात उतरेल, राजाचा महाल जर घाणेरडा मग इतरत्र स्वच्छता कशी असेल. एक किस्सा सांगतो, एक दिवस हिटलर त्याच्या पार्लिमेंट मध्ये एक कोंबडा घेऊन आला आणि निर्दयी हिटलर सर्वांच्या समोर त्याचे एक एक पीस खेचून काढू लागला. कोंबडा वेदनेने विव्हळत होता, सुटण्यासाठी तडफडत होता. तरीही एक एक करून हिटलरने त्याची सारी पिसे अक्षरश: सोलून काढली, खेचून काढून टाकली. नंतर त्या कोंड्याला जमिनीवर तेथेच फेकून दिले. तदनंतर खिशातून काही दाणे काढून कोंबड्याच्या समोर टाकून हिटलर पुढे पुढे चालू लागला. तो कोंबडा दाणे खात खात हिटलरच्याच मग मागे जाऊ लागला, चालू लागला. हिटलर सारखे सारखे दाणे टाकत होता आणि कोंबडा ते खात त्याच्या मागे मागे चालत होता. शेवटी तो कोंबडा हिटलरच्या पायाजवळ येऊन उभा राहिला….हिटलरने मग स्पीकर कडे म्हणजे अध्यक्षांकडे बघितले आणि महत्वाचे वाक्य तो बोलून गेला, लोकशाही असलेल्या देशातल्या लोकांची अवस्था या कोंबड्यासारखी असते. लोकशाही असलेल्या देशातले नेते जनतेचे सर्व काही लुटून नेतात, त्यांना लुळे पंगू पार गरीब, मजबूर करून सोडतात. त्यानंतर जनतेसमोर हेच नेते थोडा थोडा तुकडा टाकत राहतात मग असे नेते या अधू जनतेला साक्षात दैवतासारखे, परमेश्वर वाटतात.
मित्रांनो, प्रश्न कोणते शासन सत्तेत आहे त्याचा नाही, तुम्ही सारे जे सतत सर्वत्र त्या कोंबड्यासारखे जगता त्याचे मनाला वाईट वाटते, मी लढतो, मला अन्याय घरात होत असेल किंवा राज्यात, मला हेही माहित आहे कि माझे केव्हाही काहीही होऊ शकते तरीही लढतो, तुम्हीही लढणे शिकले पाहिजे, पुढल्या पिढीला देखील कोंबडा नव्हे तर वाघ बनून जगायला शिकवले पाहिजे तरच शासन ताळ्यावर राहील, अन्यथा तुमची अवस्था हि अशीच मूग गिळून बसलेल्या बलात्कार पीडित महिलेसारखी झालेली असेल…
तूर्त एवढेच :
पत्रकार हेमंत जोशी