वर्ष तावडेंच्या कविता आणि इतर बरेच काही : पत्रकार हेमंत जोशी
स्त्रियांचे आत्मचरित्र गाजतात, सुनीताबाईंचे आहे मनोहर तरी, माधवी देसाईंचे नाच ग घुमा, मल्लिका अमरशेख यांचे मला उध्वस्त व्हायचे आहे, असे कितीतरी. अमृता देवेंद्र फडणवीस, ज्योती पराग आळवणी आणि वर्षा विनोद तावडे या तिघींवर लिहीत असतांना सहजच मनाला वाटले कि ज्योती यांनी आत्मचरित्र अजिबात लिहू नये, पराग यांना राजकारणात आणखी मोठे व्हायचे आहे म्हणून आणि वर्षा यांनी मात्र त्यांच्या कविता संग्रहातून जसे मनात साचलेले काव्यरूपाने ओकले तेच त्यांनी आत्मचरित्र लिहून आणखी मन मोकळे करावे आणि आत्मचरित्राला नाव द्यावे, मनाचे अस्वस्थ दार…
संदीप खरे यांनी जे सांगितले ते खरे आहे कि कविता करणे म्हणजे कवीच्या संवेदनशील मनाचे लक्षण आहे, थोडक्यात वर्षा नक्की संवेदनशील आहेत,म्हणून त्यांनी मनातले नेमके आपल्या तोडक्यामोडक्या कवितांमधून लिहिले रेखाटले आहे. जशी अजिबात अनुभव नसलेल्या तरुणीची मधुचंद्राच्या रात्री मोठी फजिती होते त्यातून अनेक गंमतीदार प्रसंग उद्भवतात ते तसेच नवकवी चे असते, क्षणार्धात कविता करण्याचे धाडस नवकवींमध्येच आढळते. शब्द आवडले कि मनात साचलेल्या विचारांवर कविता करून मोकळे व्हायचे असे काहीसे नवकवींचे असते. खरे तर कविता वाचून हेच वाटले कि काव्य संग्रह काढायला वर्षा यांनी मोठा कालावधी का घेतला, ८-१५ दिवसात जे अगदी नक्की शक्य होते. समजा सहज शक्य आहे म्हणून शिक्षण मंत्र्याच्या पत्नीची कविता एखाद्या पाठय पुस्तकात घुसडल्या गेली तर, बापरे ! मग मात्र विद्यार्थ्यांचे काही खरे नाही….
मनाला दार असतंच, हा काव्यसंग्रह वाचतांना त्यातली ‘ सौमित्र ‘ यांची प्रस्तावना वाचतांना मनात विचार आला कि अलीकडे सौमित्र यांच्याकडे काही काम उरलेले दिसत नाही कारण अशा कविता संग्रहावर एवढी मोठी प्रस्तावना, एखादा रिकामटेकडाच असे दिव्य काम करू शकतो. प्रस्तावना वाचल्यानंतर सौमित्र आयुष्यात मला पहिल्यांदाच खूप खुजे वाटले. एखादा त्यातून हे म्हणेलही कि सांस्कृतिक मंत्र्यांना खुश करण्यासाठी संदीप खरे आणि अभिनेता किशोर कदम उर्फ कवी सौमित्र यांनी असे टोकाचे पाऊल उचलले असावे. तब्बल सहा पाने प्रस्तावना म्हणजे कवितांपेक्षा प्रस्तावनाच मोठी हे म्हणजे असे झाले कि सौमित्र डब्लू डब्लू मध्ये कुस्ती खेळणाऱ्या चड्डी घालून एखाद्या जाहीर समारंभाला गेले, यालाच चार आण्याची कोंबडी एक रुपयाचा मसाला, असेही म्हटल्या जाते….
जसे एक माणूस विहिरीत बुडताना एका मुलास बाहेर काढतो त्याला वाचवतो, बाहेर आल्यावर विहीरीसभोवताली जमलेले सारे त्याला असंख्य प्रश्न विचारून भंडावून जेव्हा सोडतात तेव्हा तो म्हणतो, मी तुमच्या सार्या प्रश्नांची उत्तरे नक्की देईन पण आधी मला हे सांगा कि मला विहिरीत ढकलले कोणी, माझेही नेमके तेच झाले आहे कि वर्षा यांच्या त्या मैत्रिणी कोण, ज्यांनी त्यांना कविता लिहिण्या आणि काव्यसंग्रह काढण्या भाग पाडले. वर्षा यांच्या अस्वस्थ मनातली आणखी एक कविता येथे लिहून हा विषय पूर्ण करतो….
सुन्या गळ्याला नावं ठेवतील
म्हणून घालतेय मंगळसूत्र
खरी मानेल ती तुला तिची
जेव्हा बनशील सच्चा मित्र !
काळ्या मण्यांचं एक ‘ डोरलं ‘
तिला तसं जड नाही
पण
ती शोधते आहे कधीची
तुझया डोळ्यात छबी तिची !
वाट्या, दोरा, मणी
सगळ्यांची तीच कहाणी
नुसतं मंगळसूत्र
कसं ठरवणार
कोण राजा
आणि कोण राणी ?
क्रमश:
पत्रकार हेमंत जोशी