पवार वार : पत्रकार हेमंत जोशी
प्रात: शाखेची प्रार्थना आटोपताच गण्या देशपांडेने तडक पोराची घुश्यातच सोमलवार शाळा गाठली. रागाचे कारण देखील तसेच होते, सोमलवार शाळा संघाची नसूनही वरून अत्यंत नामवंत असूनही स्विमिंग आटोपल्यानंतर गण्याच्या मुलाचा टॉवेल वर्गातल्या कुठल्याशा मुलाने ढापला होता. वर्गात येताच तावातावाने गण्या पोराच्या क्लासटीचर ला म्हणाला, हेच का तुमच्या शाळेचे संस्कार…खुशाल चोऱ्या होताहेत, शाळेचे लक्ष नाही….अशाने पुढली पिढी कशी घडेल….? बाईंनी आधी गाण्याचे शांतपणे ऐकून घेतले मग विचारले, कोणत्या रंगाचा टॉवेल होता तुमच्या मुलाचा ? पांढऱ्या रंगाचा, गण्या म्हणाला. अहो, पांढऱ्या रंगाचे टॉवेल्स अनेकांचे असतात कसे ओळखायचे मी, बाई म्हणाल्या. त्यांचे वाक्य संपत नाहीच तोच गण्या त्यांना म्हणाला, अहो, त्याचा टॉवेल ओळखणे अगदी सोपे आहे, त्यावर ‘ इंडियन रेल्वे ‘ असे मोठ्या अक्षरात लिहिलेले आहे…
दुसऱ्या सांगे ब्रम्हज्ञान, पद्धतीने वागणारे आम्ही जवळपास सारेच भारतीय, आपली खरकटी असतांना दुसऱ्याला स्वच्छ धुवून ये सांगणारे आम्ही, त्यामुळे वर वर चढणाऱ्या अप्रामाणिक भारतीयांचा ज्यावेळी प्रगतीचा आलेख उंचावत असतो त्याचवेळी त्याच्या अधोगतीच आलेख देखील नकळत झपाट्याने तयार होत असतो. वास्तविक शरद पवारांच्या हातात हात घेऊन एरवी प्रचंड खडूस असलेले नरेंद्र मोदी थेट बारामती दौरा करून आल्याचे तुम्हाला आठवत असेलच. म्हणजे पवारांना त्यांनी राजकीय गुरूच्या जागी ठेवून त्यांना आपलेसे करण्याची तयारी मोदी यांनी दाखवली होती..विशेष म्हणजे एरवी थेट भाजपा खासदाराने जरी मोदी यांना एखादे काम सांगितले तरीही काहीसे कधीकधी वेळकाढू धोरण राबवणारे मोदी त्या सुप्रिया सुळे यांना मात्र साक्षात लेक मानून तिने आणलेल्या कामांवर पटकन निर्णय घेऊन मोकळे व्हायचे पण जे पवार कधीही कोणाचे झाले नाहीत त्यांनी का म्हणून मोदी यांच्याशी म्हणाल तर मैत्रीची लॉयल्टी ठेवावी आणि येथेच पुन्हा एकवार शरद पवारांनी स्वतःचे एकवार मोठे राजकीय नुकसान करवून घेतले. त्यांना लोकसभा निवडणूकी आधी अनेक सामान्य मतदारांना जे वाटायचे ते तसेच वाटले होते कि पुन्हा मोदी येणे मोदी पंतप्रधान होणे शक्य नाही याउलट मोदी आणि सोनिया वादाचा राजकीय फायदा आपल्याला उचलता येईल आणि तिसर्या आघाडीच्या कुबड्यांवर किंवा मोठ्या प्रमाणात खासदार निवडून आणून आपल्याला नक्की पंतप्रधान होणे सहज शक्य होईल…
www.vikrantjoshi.com
त्यातून लोकसभा निवडणूक प्रचारा दरम्यान ज्या नेत्यांनी मोदी आणि भाजपाला नामोहरम केले त्यात शरद पवार सर्वाधिक आघाडीवर होते. पवारांचे चिन्ह घड्याळ, निकालानंतर त्यांचे खरेच बारा वाजले. आपण मोदी यांना धोका देऊन मोठी चूक केलेली आहे हे पवारांना कळून चुकलेले आहे पण मारलेला दगड एखाद्याच्या वर्मी लागल्यानंतर त्याने त्यानंतर का म्हणून तुम्हाला प्रेमाची झप्पी द्यावी, मोदी आणि भाजपा आता पवारांपासून कायमचे मनापासून दूर गेले आहेत. पवार यांनी जर मोदी यांना आपले मानले असते तर आज फार वेगळे चित्र बघायला मिळाले असते, आता ती वेळ निघून गेलेली आहे, पुन्हा एकवार सवयीप्रमाणे पवारांनी मोदी नामक मित्राला देखील ऐन मोक्याच्या वेळी धोका दिला, दगा दिला. पवार संपूर्ण देशात आणि या राज्यातही आता एकाकी पडले आहेत. येणाऱ्या विधान सभा निवडणुकीत देखील त्यांच्या पक्षाचे चित्र फार पॉझेटिव्ह असेल असे निदान आज तरी दिसत नाही, पवारांच्या वृत्तीने पवारांचेच मोठे राजकीय नुकसान होत आलेले आहे…
ध्यानी मनी नसतांना एखाद्या रूपवतीने मागून पटकन यावे आणि एखाद्याच्या ओठांचे दीर्घ चुंबन घेऊन त्यालासुखदधक्का द्यावा तसे राज्यमंत्री म्हणून अलीकडे शपथ घेतलेल्या परिणय रमेश फुके यांचे झाले आहे. परिणयवर जळफळाट करणारे उगाच कुजबुज करायचे कि फडणवीसांनी आपल्या या दोस्ताला आता दूर केले आहे, त्यांचे पूर्वीसारखे फारसे सलोख्याचे संबंध राहिलेले नाहीत पण ती केवळ एक अफवा ठरली. नागपुरात तसे देवेंद्र यांना अनेक मित्र अतिशय जवळचे त्या संदीप जोशी यांच्यासारखे, पण त्यांनी डान्स करायचा चान्स परिणय रमेश फुके यांना दिला. त्यांना थेट राज्यमंत्री केले. परिणय नाव एकदम रोमँटिक पण ते तसे फारसे नावाला शोभणारे नाहीत म्हणजे आजही जर परिणय यांना हाल्फ चड्डी सदरा घालून धरमपेठ शाळेत सोडले तर थेट शिक्षकांच्या देखील ते लक्षात येणार नाही कि चाळिशीतले परिणय वर्गात येऊन बसले आहेत. एखाद्या गुटगुटीत बाळासारखी त्यांची शरीरयष्टी पण माणूस लाई भारी…
मी जसा परिणय यांना ओळखतो तसा त्यांच्या बापाला देखील मी अतिशय जवळून बघितले आहे. रमेश फुके हे नागपुरातले मोठे शासकीय कंत्राटदार आणि जेव्हा डॉ. श्रीकांत जिचकार एकदम जोमात होते त्यादरम्यान ते डॉ. जिचकार यांचे जवळचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखल्या जायचे, त्यामुळे रमेश फुके यांचा शासकीय कंत्राटदाराचा व्यवसाय देखील पटापट वाढत गेला. पुढे वयाच्या २६ व्य वर्षी परिणय हे अवघ्या २४ मतांनी अपक्ष नगरसेवक म्हणून पहिल्यांदा महापालिकेत निवडून गेले आणि त्यानंतर सतत आजतागायत देवेंद्र फडणवीस यांचे ‘ हनुमान ‘ म्हणून नागपुरात नावाजले, राज्यात गाजले. मैत्रीची परिणीती अशी झाली कि अलीकडे केवळ देवेंद्र फडणवीसांच्या आग्रहातून परिणीती परिणय फुके यांना देखील भाजपातर्फे उमेदवारी देण्यात आली, सध्या त्या देखील नागपूर महापालिकेत नगरसेविका आहेत. सुदैवाने आता तर परिणय फुके यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी आली. परिणय यांना हे खाते तोंडपाठ आहे त्यांनी अवघ्या तीन साडेतीन महिन्यात या खात्यात वेगळे काहीतरी असे करवून दाखवावे कि राज्याला वाटावे बांधकाम खात्याला पुन्हा एकदा नितीन गडकरी यांच्यासारखा बाप माणूस मिळालेला आहे. बघूया, परिणय यांचे कौतुक करावे लागणार आहे कि त्यांनाही शाब्दिक हासडणे आमच्या नशिबी येणार आहे…
जे उद्धव ठाकरे यांना यावेळी अजिबात जमले नाही ते देवेंद्र फडणवीसांना अतिशय छान जमले आहे. मंत्रिमंडळ विस्तार आणि बदल करतांना खऱ्या अर्थाने भाजपाने बाजी मारली आणि शिवसेनेने मोठे नुकसान करवून घेतले. मंत्रिमंडळ विस्तारात भाजपचा फडणवीसांनी केलेला फायदा आणि इतरांचे ऐकून उद्धव ठाकरे यांनी सेनेचे करवून घेतलेले नुकसान त्यावर पुढे मी व्यापक नक्की लिहिणार आहे. लोकसभा निवडणुकीत नागपुरात बाहेरचे उमेदवार आघाडीचे नाना पटोले आणि त्यांच्या नागपुरातील मराठा कुणबी समाजाने खऱ्या अर्थाने गडकरी आणि थेट फडणवीस दोघांच्याही नाकात दम आणला, गडकरी हे देशात सर्वाधिक मतांधक्याने निवडून येतील असे जे सुरुवातीला वाटायचे ते गडकरी कुणबी मराठा समाजातील ऐक्यामुळे कसेबसे निवडणुकीत पास झाले आहेत. या समाजाचा एकत्रित असणायचा फायदा निदान येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपा सेना युतीला मोठ्या प्रमाणात व्हावा त्याचसाठी फडणवीसांनी या समाजात त्या त्या भागात ज्या नेत्यांचा आमदारांचा समाजावर प्रभाव आणि प्रभुत्व आहे त्यांना विस्तार करतांना मंत्रिमंडळात स्थान देऊन राजकीय कौशल्याची जणू चुणूक दाखवली आहे. त्यांनी बुलढाणा अकोला भागातून डॉ. संजय कुटे, अमरावती भागातून डॉ. अनिल बोन्डे आणि नागपुरातून परिणय फुके यांना मंत्रिमंडळात स्थान देऊन, येणाऱ्या विधानसभेची बेगमी आजच करून ठेवली आहे. वास्तविक डॉ. संजय कुटे अगदी सुरुवातीलाच मंत्री झाले असते पण फडणवीसांच्या एका लाडक्या पत्रकाराने संजय कुटे यांच्या ऐवजी पांडुरंग फुंडकर यांनाच मंत्रीपद देण्यात यावे असा सतत आग्रह धरल्याने पुढे कुटे यांचे राजकीय वाटोळे झाले आणि फुंडकर मात्र लगेचच मंत्री झाले. फुंडकर यांचे देहावसान झाले नसते तर कुटे निदान या पंचवार्षिक योजनेत नक्कीच मंत्री झाले नसते. जवळचा मित्र धोका देतो तेव्हा माणूस कोलमडून पडतो. असे म्हणतात, फुंडकर मंत्री कसे झाले हे कळल्यानंतर कुटे अनिल गावंडे नामक मित्राच्या खांद्यावर डोके ठेवून मुलगी सासरला जातांना बाप जसा
ढसाढसा रडतो तसे म्हणे रडले होते. आता मात्र कुटे स्वतःवर जाम खुश आहेत….
तूर्त एवढेच :