जमलेली गर्दी : पत्रकार हेमंत जोशी
मेधाताई आणि अनंत गाडगीळ या जोडप्याविषयी आम्हाला अगदी सुरुवातीपासून आदर आहे उत्कंठा आहे कौतुक आहे आणि अभिमानही आहे. मेधाताई अलीकडे प्रशासकीय सेवेतून निवृत्त झाल्या आणि अनंत विठ्ठलराव गाडगीळ यांच्या तर नसानसात घराण्यात कुटुंबात केवळ काँग्रेस भिनलेली आहे, त्यांच्या घराण्याला देशभक्तीची मोठी परंपरा आहे हे मराठींना सांगणे म्हणजे अमृता फडणवीस उत्तम गायिका आहेत हे नागपूरकरांना सांगण्यासारखे. मेधाताई आणि अनंतराव दोघांनी दाम्पत्याने ठरविले असते आणि केंद्रीय मंत्री म्हणून कित्येक वर्षे कार्यरत राहिलेल्या दिवंगत विठ्ठलराव यांनी ठरविले असते तर आज पुण्यातले श्रीमंत म्हणून शरद पवार यांच्याकडे नव्हे काँग्रेस मधले नवश्रीमंत म्हणून सुशीलकुमार शिंदे यांच्याकडे नव्हे तर गाडगीळ कुटुंबाकडे पुणेकरांनी बघितले असते पण सुसंस्कारांनी मढलेल्या देशभक्त गाडगीळ कुटुंबाला खाण्याची लबाडी कधीच रुचली नाही म्हणून अनंतराव काँग्रेस नेते असूनही स्पष्टवक्ते आहेत, प्रसंगी ते आपल्या नेत्यांना देखील त्यांची जागा दाखवून देतात. येथे अनंतरावांचा विषय त्यांनी अलीकडे लोकमत दैनिकात २५ जुन रोजी १९ लिहिलेल्या बेधडक लेखानिमित्ते काढावा लागतो आहे, संग्राह्य असा हा लेख, प्रत्येकाने वाचावा असा…
Www.vikrantjoshi.com
अनंतराव लिहितात, ‘ पूर्वीच्या आणि आताच्या काँग्रेस मध्ये आणखी एक मोठा फरक म्हणजे पक्षात ‘ अकाउंटीबिलिटी ‘ च राहिलेली नाही. पूर्वी नेता कितीही मोठा असू दे, त्याच्या राज्यात वा जिल्ह्यात काँग्रेस चा पराभव झाल्यास राजीनामा घेतल्या तरी जायचा किंवा नैतिकतेच्या मुद्द्यावर दिल्या तरी जायचा. २०१४ नंतर लोकसभा, बिधानसभा, महापालिका, जिल्हा परिषद व तत्सममध्ये काँग्रेसचा पराभव होऊनसुद्धा राज्याराज्यातून कुणी राजीनामा दिल्याची फारशी उदाहरणेच दिसत नाहीत. ‘ अनंतरावांचा हा टोला सर्वात आधी थेट या राज्यात नेतृत्व म्हणून बदनाम झालेल्या अशोक चव्हाण यांना मारल्या गेला असावा असे येथे वारंवार वाटते किंवा ते एक सत्य आहे. जे कमावले ते चव्हाणांसाठी खूप आहे त्यात काँग्रेसची या राज्यातली पीछेहाट दयनीय निंदनीय आहे त्यामुळे खरेतर अशोक चव्हाण यांनी राजकीय निवृत्ती पत्करणे पक्षाच्या भल्यासाठी योग्य ठरेल….
कोणतीही व्यक्ती नेमकी कशी हे अतिशय सोप्या पद्धतीने ओळखायचे असेल तर त्याने सभोवताली जमा केलेले नातेवाईक, मित्र, माणसे, कुटुंब सदस्य नेमके कसे आहेत कोण आहेत काय आहेत हे बारकाईने पडताळले कि अमुक एक व्यक्ती वास्तवात कसा लगेच लक्षात येते. अशोक चव्हाण आधी मंत्री असतांना नंतर मुख्यमंत्री असतांना मी त्यांना तोंडावर सांगितले होते कि निवतकर, सावंत सारखे भ्रष्ट संधीसाधू कर्मचारी अधिकारी जर सभोवताली असतील तर तुमचा नेता म्हणून राजकीय सत्यानाश नक्की ठरलेला आहे, पुढे तेच झाले, अशोक हे राजकीय ऋषितुल्य शंकरराव चव्हाण यांच्या पोटी जन्माला येऊन देखील त्यांना कधीही राजकारणातले अनंत गाडगीळ म्हणजे एक सुसंस्कृत नेते म्हणून त्यांच्या कडे कोणीही बघितले नाही. अतिशय पडतीच्या काळात काँग्रेस पक्ष श्रेष्ठींनी अशोक चव्हाण यांना जेव्हा थेट प्रदेशाध्यक्ष केले तेव्हाच माझ्या लक्षात आले यापुढे काँग्रेसचे या राज्यातले उरले सुरले अस्तित्व महत्व नक्की गोत्यात येणार आहे, उरल्या सुरल्या काँग्रेस चे वाटोळे होणार आहे…
उद्या समजा रा. स्व. संघाने मोहन भागवत यांच्या ऐवजी गाव तेथे कुटुंब ठेवणाऱ्या एखाद्या विवाहित स्त्रीलंपट भ्रष्ट स्वयंसेवकाला जर सरसंघचालक म्हणून नेमले तर संघाचे महत्व संपायला आणि संपवायला त्यापुढलें काही महिने पुरेसे ठरतील.कोणताही पक्षप्रमुख, त्याची प्रतिमा जर डागाळलेली असेल तर असे पक्ष किंवा संघटना संपायला फारसा अवधी लागत नाही. नेमके हेच गांधी घराण्याच्या का लक्षात येत नाही, कळत नाही. रावसाहेब दानवे थेट केंद्रात मंत्री झाल्याने यापुढे राज्यातल्या भाजपाला देखील फडणवीस यांच्या तोडीस तोड प्रदेशाध्यक्ष नेमणे अत्यावश्यक आहे. राम शिंदे, सुभाष देशमुख, आशिष शेलार, गिरीश महाजन, गिरीश व्यास, संभाजी पाटील निलंगेकर इत्यादी नावे चर्चेत आहेत पण प्रदेश अध्यक्ष नेमण्याची भाजपाला घाई असेल असे अजिबात वाटत नाही, आधी अमित शाह यांच्या जागी कोण हा प्रश्न निकाली काढल्यानंतरच मोर्चा या राज्याकडे वळेल असे दिसते. जसे शरद पवारांच्या राजवटीत सारे काही पश्चिम महाराष्ट्राला, असे जे सतत घडायचे तसे अलीकडे थोडेफार आमच्या विदर्भाबाबत भाजपामध्ये झाल्याने घडल्याने भाजपा प्रदेशाध्यक्ष विदर्भातला तोही ब्राम्हण असेल असे अजिबात वाटत नाही.त्यामुळे गिरीश व्यास यांचे नाव जेव्हा पुढे आले आम्हाला हसू आले….
विशेष म्हणजे पडत्या काळात काँग्रेसने थेट चव्हाणांसारख्या बदनाम नेत्याला प्रदेशाध्यक्ष केल्याने या राज्यातली उरलीसुरली काँग्रेस रसातळाला नेण्याचे मोठे काम अशोक चव्हाणांनी करून ठेवले. पृथ्वीराज चव्हाण किंवा अनंत गाडगीळ इत्यादी बोटावर मोजण्याइतके काँग्रेस मधले चांगले नेते मात्र स्वतःच्या राजकीय अस्तित्वासाठी स्वतःच धडपडतांना दिसतात. बाळासाहेब थोरातांचे देखील विखे पाटलांसमोर नेमके पृथ्वीराज चव्हाणांसारखेच होत असे म्हणजे बिना भरवशाचे राधाकृष्ण हे गांधी घराण्याला अधिक विश्वासू आणि राजकीय दृष्ट्या ताकदवान वाटायचे पण एक बरे झाले कि पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान थेट राहुल गांधी यांना नगर जिल्ह्यातल्या मुक्कामातून धोकेबाज आणि धोकादायक विखे पाटील आणि लॉयल बाळासाहेब थोरात या दोघातला नेमका फरक केल्याने ओळखल्याने अलीकडे एकमेकांचे जिवलग मित्र असलेले पृथ्वीराज चव्हाण आणि बाळासाहेब थोरात या दोघांनाही गांधी कुटुंबाने लाडाने कडेवर उचलून घेतले आहे, यापुढे पुन्हा एकदा या दोघांच्या शब्दांना अशोक चव्हाण यांच्यापेक्षा त्यांच्या श्रेष्ठींकडे अधिक मान असेल, त्यांचा तो सन्मान असेल…
श्री पृथ्वीराज चव्हाण आणि बाळासाहेब थोरातांच्या शब्दाला दिल्लीत नक्की किंमत असेल. विशेष म्हणजे यापुढे या देशातली सत्ता मतदार कायम हिंदुत्व मानणार्या, हिंदूंना प्राधान्य देणाऱ्या आणि भ्रष्टाचाराची बऱ्यापैकी चीड असलेल्या राजकीय पक्षाच्याच हाती सोपवून मोकळे होतील, राष्ट्रवादी किंवा काँग्रेसच्या नेतेमंडळींनी आत्मचिंतन करणे यापुढे नक्की अत्यावश्यक आहे…
तूर्त एवढेच :
पत्रकार हेमंत जोशी