फ्रॉड पॅनकार्ड क्लब १ : पत्रकार हेमंत जोशी
सिनेमातल्या नायकासारखे वागता येत नाही नका वागू पण त्यातल्या खलनायका सारखे तरी वागून दाखवा, हिंदी सिनेमातल्या निदान डाकूंची तरी नक्कल करा, श्रीमंतांना कोणत्याही प्रकारे लुटा आणि त्यातले काही निदान गरिबांवर तरी लुटा.आपल्यातले नेहमी नेमके उलटे करत आले आहेत म्हणजे गरिबांना लुटायचे आणि श्रीमंतांना काढून द्यायचे. आपण केवळ या राज्याचा जरी अभ्यास केला तरी असे दिसेल दिसते कि जेथे जेथे या राज्यातले गोरगरीब पैसे ठेवतात, पुंजी टाकतात, तेथेच नेमकी त्यांची फसवणूक होते. मोठ्या रकमेचे व्याज देणाऱ्या चिटफंड कंपनीज आणि खाजगी बॅंक्स किंवा पतपेढ्या हे गरिबांना लुटण्याचे हमखास कुरण आहे, ते लुटून पळून मोकळे झालेत कि त्यांना येथे सरकारी अधिकारी, पोलीस आणि नेते हमखास प्रोटेकट करतात, गरीब रस्त्यावर येतात आणि बदमाश श्रीमंत अधिक श्रीमंत होतात…
सुधीर मोरावेकर आणि त्याच्या कुटुंबाने उभी केलेली पॅनकार्ड क्लबज लिमिटेड हा असाच सर्वसामान्य आणि गोरगरिबांशी खेळल्या गेलेला महाभयानक प्रकार आहे. मला आठवते, दिवंगत विजय लोके हा दिवंगत गजानन लोके यांचा मुलगा पुढे तो आमदार झाला. गजानन लोके देखील केव्हातरी काँग्रेस चे आमदार होते,सुरुवातीला विजय देखील युवक काँग्रेस मध्ये बऱ्यापैकी ऍक्टिव्ह होता पण पुढे तो त्यावेळी एकत्र असलेल्या उद्धव व राज ठाकरे या दोघांच्याही संपर्कात आला, त्यांचा त्यावेळचा ‘ मिलिंद नार्वेकर ‘ म्हणून काम बघू लागला. म्हणजे उजवा हात म्हणून प्रसिद्धीला आला, अर्थात विजय आणि मिलिंद दोघांच्या आचारविचारांत मला प्रचंड तफावत दिसली…पुढे लवकरच उद्धवजींच्या आग्रहावरून विजय लोके या सामान्य मित्राला म्हणाल तर शिवसैनिकाला आमदार करण्यात आले, विधान परिषदेवर घेण्यात आले, विजय आणखी मोठा झाला असता पण दारूच्या आहारी गेल्याने त्याचे लवकर निधन झाले. अधून मधून विजय लोके त्यावेळेच्या म्हणजे १९९०-९५ दरम्यान असलेल्या राजा बढे चौकातल्या माझ्या कार्यालयात स्कुटरवरून गप्पा मारायला येत असे, त्याच्या सोबतीने त्याचा ‘ मावसभाऊ सुधीर मोरावेकर ‘ पण हमखास येत असे. सुधीर त्याचा मावसभाऊ होता किंवा नाही हे कधी समजले नाही पण विजय त्याची तशीच ओळख करून द्यायचा. पुढे केवळ सर्वसामान्यांना फसवून श्रीमंत करोडपती झालेल्या सुधीर मोरावेकर याचे त्याकाळी स्वतःच्या मालकीचे कोणते वाहनही नव्हते हे विशेष….
Www.vikrantjoshi.com
माझ्या थेट कार्यालयासमोर माजी शिक्षण मंत्री सुधीरभाऊ जोशी यांची शिवसेना शाखा होती मग तेथे आम्ही गप्पा मारायला जात असू, भाऊ असायचे, नगरसेवक पंडित आणि दिवाकर दळवी असायचे, छान गप्पा व्हायच्या. त्यानंतर युतीची सत्ता आली, सुधीरभाऊ मंत्री झाले, पुढे विजयला देखील विधानपरिषदेवर घेण्यात आले. शिवसेनेचा खऱ्या अर्थाने तेथून सुवर्णकाळ सुरु झाला. येथे अत्यंत महत्वाचे सांगतो, कि ज्यांनी ज्यांनी केवळ इगो हर्ट झाला म्हणून शिवसेना सोडली त्यांचे सर्वांचे वेगवेगळ्या पद्धतीने वाटोळे झाले, नुकसान झाले जणू त्यांना बाळासाहेब नावाच्या ऋषींचे शाप लागले पण शिवसेना मात्र वाढत गेली, मनातले सांगतो, उद्धवजी सेनात्यांच्या पित्यापेक्षा यशस्वी पद्धतीने चालवू शकतील हे स्वप्नात देखील कधीच कोणालाही थेट बाळासाहेबांनाही वाटले नव्हते त्यातूनच शिवसेना फुटत गेली दिग्गज नेते बाहेर पडत गेले पण नशीब कसे बघा, बाहेर पडलेलेच संपले, मागे पडले…
ज्यांनी राजकीय नफानुकसानचा कोणताही विचार न करता बाळासाहेबांवर, उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर विश्वास ठेवला अशा नेत्यांना मात्र नाव सत्ता आणि हो, पैसा देखील मिळत गेला. लॉयल्टी त्यांना फायद्याची ठरली, सारेच रामदास कदम एकनाथ शिंदे पद्धतीने सर्वार्थाने मोठे झाले. १९९५ नंतर सुधीर मोरावेकर याच्या डोक्यात चिटफंड कंपनीची म्हणजे सर्वसामान्यांना चिट करून श्रीमंत होण्याची कल्पना आली आणि त्याने पॅनकार्ड क्लब नावाची कंपनी काढली त्यानिमीत्ते एक जंगी पार्टी त्याने आणि विजयने आयोजित केली होती, उदघाटनाला अर्थात उद्धव ठाकरे स्वतः आले होते, मला देखील बोलाविले होते. उद्धव ठाकरे पॅनकार्ड क्लब कंपनीच्या पाठीशी आहेत असे वातावरण निर्माण करण्यात आले. सुरुवातीला काही वर्षे सुधीर मोरावेकर यांच्या पॅनकार्ड क्लब चे कार्यालय माहीमच्या दर्गा गल्लीतील एका लहानशा खोलीत पहिल्या माळ्यावर होते पण तदनंतर सुधीरची मोठ्या झपाट्याने आर्थिक क्रांती, प्रगती झाली, गोरगरिबांना लुबाडून सुधीर झपाट्याने नवश्रीमंत झाला…
दिवंगत चीटर सुधीर मोरावेकर याचा उद्धव किंवा ठाकरे कटुंबीयांशी थेट परिचय अजिबात नव्हता. राज आणि उद्धव यांचा विजय लोके लाडका होता. येथे अत्यंत महत्वाचे सांगतो उद्धव यांनी कधीही सुधीर मोरावेकरला जवळ घेतले नाही किंवा पॅनकार्ड क्लब कंपनीला प्रोटेकट केले नाही, पुढे तर विजय लोके देखील लवकर वारला त्यामुळे पॅनकार्ड क्लब च्या पापात फक्त आणि खरा सहभाग केवळ त्याचा, त्याच्या दोन्ही मुलांचा, पत्नीचा आणि सुनेचा सहभाग होता. आता सुधीरचा धाकटा मुलगा केवळ मुंबईत असतो, जे या पापाचे लाभार्थी आहेत ते सारे सिंगापूरला स्थायिक झाले आहेत, जगभरात त्यांच्या मालमत्ता आहेत. पोलिसांचा नेमका कोणत्या पद्धतीने तपस सुरु आहे, कळत नाही पण गोरगरिबांचे त्यांना फार काही पडले असावे, वाटत नाही. फ्रॉड सुधीर मोरावेकर यांचे धाकटे चिरंजीव ज्ञानराज अगदी खुलेआम मुंबईत फिरताहेत आणि ज्येष्ठ चिरंजीव सिद्धार्थ मोरावेकर हे कुटुंबियांसमवेत सिंगापूरला तळ ठोकून आहेत…
क्रमश:
पत्रकार हेमंत जोशी