निवडणूक कि अडवणूक : पत्रकार हेमंत जोशी
जे प्रिंट आणि टीव्ही मीडियामध्ये नवीन आहेत त्यांच्यात चंचल वृत्ती अस्थिर स्वभाव असणे अपेक्षित आहे किंबहुना ते त्याच पद्धतीने बहुतेक ठिकाणी वृत्तपत्र किंवा बातम्यांच्या वाहिन्या सांभाळतांना दिसतात. मी अनेकदा मित्रांना गमतीने म्हणतोही कि विजय दर्डा किंवा सुभाष गोयल त्यांच्या मराठी स्टाफला काय वापरून घेतील, याउलट त्यांच्याकडे काम करणारे असे मी कितीतरी बघतो कि तेच गोयल जैन किंवा दर्डांसारख्या मंडळींना मोठ्या खुबीने वापरून घेतात. त्या झी मराठीवर किंवा अन्यत्र असे काही महाभाग आहेत कि ज्यांनी गोयल दर्डा जैन इत्यादींच्या मालकीच्या मीडियाचा वापर करून दहशत पसरवून स्वतःचे असे मोठे उद्योगाचे किंवा कंत्राटदार म्हणून जाळेच उभे केले आहे. त्यांना मिळणारे वेतन त्यांच्यासाठी चखण्यासारखे असते, म्हणजे मीडियाने अशा मंडळींना वेतन जरी दिले नाही तरीही त्यांचे काहीच अडणार नाही…
स्वतःला विकणे हे अलीकडे वृत्तपत्र, टीव्ही इत्यादी मीडियामध्ये अतिशय कॉमन झाले आहे. सऱ्हास तोच प्रकार आहे असेही म्हणणे चुकीचे आहे पण बहुतेकांनी लाज सोडली आहे हि वस्तुस्थिती आहे. मीडियावर विश्वास ठेवून सामान्य माणूस आपले मतदान ठरवतो ते बघून मात्र वाईट वाटते. अलीकडे हेमंत देसाई बाळासाहेब थोरातांना स्वच्छ प्रतिमेचा नेता म्हणालेत किंवा अशोक चव्हाण मोठ्या मनाने अध्यक्ष पदावरून बाजूला झाले असे सुकृत खांडेकर म्हणाले. देसाई किंवा खांडेकर यांच्या सारखे प्रदीर्घ अनुभवी पत्रकार जेव्हा पोरकट विधाने करून लोकांच्या डोळ्यात धूळफेक करतात तेव्हा तर मनापासून हसू येते. नेत्यांविषयी नेमकी वस्तुस्थिती माहित असतांना हे असले पोरकट मतप्रदर्शन तेही मीडियातल्या बुजुर्गांनी करणे चुकीचे वाटते. सामान्यांना न फसविणारी मीडिया असावी….
तिसरा मुद्दा तोंडावर आलेल्या विधान सभा निवडणुकीचा. त्याकडे बघितले तर असे लक्षात कि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत या राज्यात काँग्रेस मनसे राष्ट्रवादी इत्यादी विरोधकांना काहीच गमवायचे नाही. जे काय गमवायचे होते ते त्यांनी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर गमावलेले आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत जे काय गमवायचे आहे ते भाजपा आणि सेना युती गमावणार आहे. वंचीत आघाडीचे बांगला देशाच्या क्रिकेट टीम सारखे असते म्हणजे हरण्याची त्यांना एवढी सवय झालेली आहे कि जर ते कधी कुठे अधून मधून जिंकले तर तोच त्यांचा परमोच्च आनंद असतो. आपल्यामुळे काय घडले पेक्षा आपल्यामुळे काय बिघडले हे बघून त्यांना अधिक आनंद होत असतो. प्रभावी एकखांबी नेतृत्व त्यांच्याकडे नसल्याने वंचित आघाडी राजकारणात लागणाऱ्या लॉटरीवर जगत असते.येत्या विधानसभा निवडणुकीत खऱ्या अर्थाने युती खूप काही गमावू शकते…
तिकीट वाटपावरून आधीच चार बाहेर पडले आहेत त्यात आणखी चार बाहेर पडले तरी त्याचे वाईट आणि आस्चर्य आघाडीला अजिबात वाटणार नाही, वाईट वाटेल ते युतीला, नुकसान होईल ते युतीचे कारण तेथे आमदारकीचे तिकीट मिळविण्यासाठी मोठी स्पर्धा प्रत्येक मतदारसंघात आहे आणि तीच सेना भाजपा युतीची मोठी डोकेदुकी ठरणार आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात ज्याला त्याला वाटते कि उमेदवारी आपल्याला मिळावी कारण युतीकडून यावेळी निवडून येणे सोपे आहे आणि निवडून आल्यानंतर आपल्याला मंत्री व्हायचे आहे. सारे इच्छुक या अशाच ध्येयातून विधान सभा निवडणुकीवर डोळा ठेऊन आहेत. महत्वाचे म्हणजे शिवसेनेने मंत्री करतांना किंवा अलीकडील मंत्रिमंडळ विस्तार करतांना जे मतदारातून निवडून आले होते त्यांची साधी दखलही न घेतल्याने तेथे नाराजांची मोठी संख्या आहे. हि विधानसभा निवडणूक उद्धव ठाकरे व देवेंद्र फडणवीस यांची कठीण अशी परीक्षा घेणारी निवडणूक आहे, त्यात ते जर नापास झाले तर त्यांना त्या अपयशाची मोठी किंमत मोजावी लागू शकते. अत्यंत स्वाभाविक आहे किंवा तेच अपेक्षित आहे कि युतीतल्या प्रत्येक इच्छुकाला उमेदवारी देणे अशक्य आहे त्यामुळे त्यांच्याकडे बंडाळी होऊन इच्छुक दुसरा पर्याय निवडण्यासाठी बाहेर पडतील, इतरांचे दरवाजे ठोठावून मोकळे होतील आणि याच बंडाळीवर शरद पवार नजर ठेऊन आहेत….
www.vikrantjoshi.com
यश अपयश अडीअडचणी इत्यादींची उद्धव ठाकरे यांना देखील बऱ्यापैकी सवय आहे, सवय नाही ती देवेंद्र फडणवीस यांना कारण सत्तेत आल्यापासून सारे काही त्यांच्या सतत त्यांच्या मनासारखे घडत आले आहे. या पंचवार्षिक योजनेत नशीब त्यांच्याबाजूने होते ते कायम तसेच त्यांच्याचबाजूने घडेल असे राजकारणात होत नसते त्यामुळे जशी त्यांनी यशाची सवय करवून घेतली तीच सवय त्यांना अपयश मिळाले तरी डगमगून न जाण्याची सवय लावून घ्यावी लागणार आहे. लोकसभा निवडणुकीत जसे नागपुरातून आमदार म्हणून आशिष रणजित देशमुख किंवा खासदार म्हणून नाना पटोले आणि नेते म्हणून शरद पवार या तिघांचे अंदाज चुकले त्यातून त्यांनी स्वतःचे मोठे राजकीय नुकसान करवून घेतले ते तसे यावेळीही काहींचे होऊ शकते म्हणून क्षणिक राजकीय संधीला प्राधान्य दिल्यापेक्षा लॉयल्टी ठेवणार्या नेत्यांना राजकीय फायदे अनेक असतात हे ध्यानात ठेऊन ज्या त्या इच्छुकाने सावध निर्णय घ्यावेत म्हणजे फायदे होतात. नेते, बाळासाहेब थोरात होतात, मोठे होतात. संधी येण्यासाठी वाट पाहावी लागली तरी चालेल पण धरसोड करणे फायद्याचे नसते हे ज्याने त्याने ध्यानात ठेवावे…
शरद पवारांनी नरेंद्र मोदी यांना, आशिष देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांना आणि नाना पटोले यांनी एकंदर भाजपा व गडकरी फडणवीस यांना अंडरएस्टीमेट केले स्वतःचे मोठे तूर्त राजकीय नुकसान करवून घेतले. पवारांनी जर पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत मोदी यांच्या बाबतीत मवाळ आणि मैत्रीची भूमिका बजावली असती तर त्यांना ते अधिक फायद्याचे ठरले असते पण पवारांना सांगणे म्हणजे पेटत्या दिव्यावर हात ठेवण्यासारखे ते असते म्हणून कोणीही त्यांना काहीही सांगण्याच्या भानगडीत पडत नाही. नुकसान पवारांचे होते त्यातून त्यांना नेहमीच्या प्रताप आसबे यांचा आधार घेऊन मुलाखतीततून वेगवेगळे पिल्लू सोडावे लागतात, गोंधळाचे वातावरण तयार करायचे असते. प्रताप आसबे यांच्या मुलाखतीमध्ये कोणताही दम नसतो पण वातावरण निर्माण करण्यासाठी पवार आसबेंचा नेहमीप्रमाणे उपयोग करवून घेतात, संपलेल्या आसबेंना त्यातून उगाचच आनंद होतो. मी आजही कसा पत्रकारितेत जिवंत आहे, जक्खड आसबेंना तेवढेच मनाला बरे वाटत असावे…
हेमंत जोशी.