वेगळे सर्व देवेंद्र पर्व : पत्रकार हेमंत जोशी
सांताक्रूझ पश्चिमेला आमच्या अगदी इमारतीजवळ जुहू गार्डन आहे जेथे मी अनेकदा सकाळी फिरायला जातो तेथे अलीकडे संघाची प्रभातशाखा भरते, भरायला लागली आहे. प्रार्थनेची वेळ झाली कि मी पण त्यात सहभागी होतो, आता पूर्णवेळ स्वयंसेवक नसलो तरी संघाचे झालेले अनेक उत्तम संस्कार संघशाखेवर प्रार्थना म्हणण्यास भाग पाडतात. अलीकडे नेमका सकाळी पाऊस पडतो त्यामुळे शाखेवर व फिरायला जाणे होत नाही, पण त्यातले दोन सिनियर स्वयंसेवक परवा अगदी ठरवून घरी आले आणि शाखेत न येण्याचे त्यांनी कारण विचारले, विशेष म्हणजे ते दोघेही साधे रिक्षा चालक आणि उत्तरप्रदेशी आहेत. आणि संघात हे असेच नेहमी घडते, तेथे कोणीही लहानमोठे नसते, सारे एकत्र आले जमले कि समसमान असतात हे विशेष….
नेमक्या त्याच संस्कारातून शिस्तीतून या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस घडलेले, जेथे कडवी देशभक्ती आणि राहणीतला साधेपणा आपोआप दररोजच्या विशेष संस्कारातून स्वयंसेवकाच्या रोमारोमात भिनत असतो म्हणून देवेंद्र फडणवीस यांची ओळख नसलेल्यांना व ओळख असलेल्या प्रत्येकाला आपले वाटतात, ते आपल्या घरातलेच एक मोठे भाऊ असे साऱ्यांना या राज्यात वाटत राहते. त्यांच्यापेक्षा वयाने मोठे असलेल्यांना देखील ते त्यांच्या कुटुंबातले ‘ दादा ‘ वाटतात, मोठे भाऊ आहे असे साऱ्यांना वाटते, राज्यातल्या जनतेला ते आपल्यातलेच एक आहेत, जणू आपले कुटुंब सदस्य आहे असे वाटत राहते. जेव्हा केव्हा अनेक राजकीय प्रतिस्पर्धीही फडणवीसांना मग ते त्यांच्या पक्षातले असोत किंवा बाहेरचे कामानिमित्ते भेटायला येतात तेव्हा मनात हेतू किंतु न ठेवता मुख्यमंत्री आम्हाला सहकार्य करीत आले आहेत हे त्यादिवशी अगदी विरोधकांनी देखील थेट सभागृहात फडणवीसांचे कौतुक करतांना अगदी जाहीरपणे सांगितले, त्यांचे मनापासून कौतुक केले….
www.vikrantjoshi.com
मागे केव्हातरी मी लिहिले आहे, श्रीकांत भारतीय हे मुख्यमंत्री कार्यालातले एक सदस्य आहेत, ज्या अनेकांची फडणवीसांच्या व्यस्ततेमुळे भेट होत नाही त्यांना संघ स्वयंसेवक श्रीकांत भारतीय आधार ठरले आहेत. हेच भारतीय दरवर्षी न चुकता पंढरपूर मार्गावर आषाढी एकादशीच्या काळात वारीत गुंतलेले असतात, लाखो वारकऱ्यांची ते संघाच्या माध्यमातून मनापासून काळजी घेतात, त्यादिवसात त्यांच्यातलेच एक होतात. वारी दरम्यान वारकऱ्यांना प्रामुख्याने मोठा त्रास असतो प्रचंड पडणाऱ्या पावसाचा, मागल्या वर्षी आषाढी एकादशी दरम्यान भारतीय मुख्यमंत्र्यांना म्हणाले, वारकऱ्यांना कायम वारीत सतावणारा पाऊस, त्यांच्यासाठी काहीतरी करायला हवे, आश्चर्य वाटेल, यावर्षी थेट वाऱ्या सुरु होण्याच्या सुरुवातीला लाखो तेही दर्जेदार मोफत रेनकोट्स वारकऱ्यांना देण्यात वाटण्यात आले पण कोठेही त्यावर फडणवीसांच्या नावाचा किंवा त्यांच्या पक्षाचा उल्लेख नव्हता, गाजावाजा न करता हे सारे घडायला हवे, मुख्यमंत्र्यांनी जणू अशी प्रेमाची तंबीच भारतीय यांना दिलेली होती, आणि हि अशी असते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यपद्धतीची वाटचाल, जगभर त्यांचे हे कार्य बिनबोभाट विशेष म्हणजे लोकांच्या खिशातून देणग्या जमा न करता सुरु असते. गुरुपौर्णिमेनिमित्त जो तो स्वयंसेवक भगव्या ध्वजासमोर त्यालाच गुरु मानून गुप्त दक्षिणा ठेवतो त्याभरवंशावर अतिशय काटकसरीने प्रसंगी पदरचे शक्य असेल तरच पैसे टाकून जगभरातले स्वयंसेवक विविध क्षेत्रात कार्य करण्यात, संघ प्रचार व प्रसार करण्यात गुंतलेले असतात…
या राज्यातल्या शरद पवारांसारख्या अत्यंत खतरनाक राजकीय विरोधकाला फडणवीस कसे काय पुरून उरताहेत त्यावर अनेकांना कुतूहल असते, फडणवीसांवर प्रेम करणाऱ्यांना तशी भीती काळजी देखील वाटते. पण तत्वांशी तडजोड करणाऱ्यांशी न घाबरता सामना करून अतिशय थंड डोक्याने यश प्राप्त करणे हे संघ स्वयंसेवकाच्या अंगवळणी पडलेले असते. स्वतःची तारीफ नाही पण न घाबरता भल्याभल्यांशी लिखाणातून पंगा घेणे मला जे जमते, नक्की तो झालेल्या संघ संस्कारांचाच एक भाग आहे हे टाळून चालणार नाही. मनातली भीती कायम निघून गेलेली असते. मृत्यूचे भय कदापिही आम्हा वाटत नाही. थेट पाच लाख वारकऱ्यांना तेही दर्जेदार रेनकोट्स वाटप तेही गाजावाजा न करता, देवेंद्र यांचे हे असे कायम वागणे आहे. मी अमुक साठी तमुक केले असे ते उपकाराच्या भावनेतून जो भेटेल त्याला दवंडी पिटल्यासारखे कधीही सांगतांना ते दिसणार नाहीत. त्यांच्या वाढ दिवसानिमीत्ते त्यांना काही तुम्हाला गिफ्ट द्यायचे असेल तर एक करा, येथे आवर्जून विशेषतः त्यांना भेटणाऱ्या किंवा त्यांच्या संपर्कात येणाऱ्या नेत्यांना सांगावेसे वाटते कि अमुक एखादे काम झाले नाही किंवा केले नाही तर आधी केलेली कामें त्याचे उपकार विसरून तुमच्यातले बहुतेक नेते जी एखाद्याची बदनामी करीत सुटतात, ती पद्धत अतिशय चुकीची आहे. केवळ कामांच्या मोबदल्यात मैत्रीचा हात पुढे करणे, सध्याच्या कपटी हलकट राजकारणातले हे स्वार्थी गणित केव्हातरी कधीतरी चांगल्या मंडळींच्या बाबतीत बाजूला ठेवणे अत्यंत गरजेचे असते, आवशयक ठरते. देवेंद्र फडणवीस हे या राज्याला पडलेले अत्युत्तम स्वप्न आहे, त्याची सतत मनाला जाणीव ठेवायला हवी आणि हेच गिफ्ट त्यांना तुम्ही नेत्यांनी मोठ्या मनाने द्यायला हवे…
क्रमश: हेमंत जोशी.