राज कि बात : पत्रकार हेमंत जोशी
धर्मा या जुन्या चित्रपटात बिंदू प्राणला एका कव्वालीतून म्हणते, “राज कि बात कहदू तो जाने महफिल में क्या होगा”, राज ठाकरे आणि त्यांची ईडी कडून सुरु असलेली चौकशी, हि अशीच रंगलेली मैफिल कम चौकशी. आपल्याकडे सर्वांना लागलेली वाईट सवय अशी कि व्यवहार मग ते कोणत्याही मालमत्तेचे असोत, त्यात काळा व्यवहार झाला नाही असे कधीही घडत नाही त्यामुळे कोहिनुर प्रकरणी तब्बल ९-१० वर्षांपूर्वी झालेले व्यवहार त्यातून घडलेले गैरव्यवहार ईडीच्या हाती आले, आयते कोलीत त्यांना सापडले त्यातून नको ते घडले, ज्या एकमेव विरोधकाच्या नुसत्या भाषणाने सत्ताधारी युतीला घाम फुटायचा, लोकसभा निवडणुकीदरम्यान घुमलेला हा राजआवाज ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर थंडावला आहे, येणाऱ्या विधानसभा निवडणूक प्रचारात लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान गाजलेले एकमेव राज ठाकरे यावेळी ऐकायला नक्की मिळणार नाहीत…
एकदा का अमुक एखाद्या व्यवहारात विशेषतः मालमत्तेच्या देवाणघेवाणीत काळा पैसा तमुक एखाद्या कुटुंबात आला कि त्या काळ्या पैशांचे पांढरे झटपट करण्याची वाईट सवय भारतीयांना असते आणि तेथेच आम्ही अडकतो. ईडीच्या हाती ठाकरे कुटुंबाचे त्यांच्या कोहिनुर प्रकरणातील शिरोडकर सारख्या मित्रांचे नेमके याच पद्धतीचे पुरावे हाती आल्याने राज आणि मित्रपरिवाराला हि चौकशी कठीण जाईल अशी माझी माहिती आहे. आज जे शिवसेना किंवा भाजपामध्ये दाखल झाले आहेत ते जवळपास सारेच यापद्धतीने मोठ्या प्रमाणात काळ्या व्यवहारात गुंतलेले, शासकीय अधिकारी किंवा सरकारी कंत्राटदार तसेच दलाल तर खूपच पुढे पण सध्यातरी ते सेफ असल्याने सरकारच्या तिजोरीत त्यांच्याकडे फार मोठ्या प्रमाणावर असलेला काळा पैसा जमा होईल, दूरदूरपर्यंत दिसत नाही.काळ्या पैशांच्या व्यवहारात गुंतलेले मोठे नीच आणि चतुर असतात…
www.vikrantjoshi.com
या राज्यात थेट बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर ज्यांच्याकडे मोठ्या अपेक्षेने मराठी माणसाने बघावे ते राज ठाकरे एकतर मातोश्रीवरून बाहेर पडल्यानंतर खूप वर्षांनी पूर्वीच्या जोशात जोमात लोकसभा निवडणूक प्रचारात दिसले नेमका त्यांचा आवाज लगेचच काही महिन्यात दिसेनासा होणे, मनापासून वाईट वाटते. असे घडायला नको होते. राज यांच्यापुढे काळ्या व्यवहारात कितीतरी पुढे असलेले या राज्यातले अनेक पण संकट केवळ राज यांच्यावर ओढवले तेही वाईट वाटले. पीएमएलए हा कायदाच काळा पैसा पांढरा करणाऱ्यांना रोखणारा आहे. त्यात किमान तीन वर्षे जामीन देखील मिळत नाही त्यामुळेच या राज्यातले या देशातले आजपर्यंत काळा पैसा पांढरा करणारे शासकीय प्रशासकीय अधिकारी नेते शासकीय दलाल आणि कंत्राटदार धास्तावलेले आहेत. अर्थात कोणीतरी हा कायदा राबविण्या कठोर पावले उचलणे अत्यावश्यक झाले होते ते मोदी सरकारने केले. आज त्या त्या नेत्यांच्या फॉलोअर्सला वाईट वाटते पण हे घडणे अत्यावश्यक होते, एकदाचे घडायला लागले….
ईडी हि देशातील सर्वाधिक शक्तिशाली तपास यंत्रणा त्यामुळे ईडीच्या कचाट्यात सापडणे म्हणजे जवळपास रस्त्यावर येणे असे आहे, ईडी तपासाची मोठी किंमत कशी मोजावी लागते ते भुजबळ कुटुंबाच्या बाबतीत आपण यापूर्वी बघितले आहेच. प्रश्न एकच मनाला पडतो कि टप्प्याटप्प्याने नवश्रीमंत यात अडकतील की आश्रयाला गेले असल्याने सुटतील, ते एक गूढ आहे. असे मात्र घडले म्हणजे राज्यातले भामटे जर आश्रयाला गेल्याने सुटले तर विशेषतः भाजपाला याची मोठी किंमत मोजावी लागेल, लोकांच्या मनातून ते उतरतील. अत्यंत महत्वाचे म्हणजे ईडीला अमुक एखाद्याला अटक करण्याचे थेट अधिकार आहेत जेथे जामीन देण्यासाठी प्रसंगी न्यायालये देखील कचरतात. केवळ राज ठाकरे किंवा उन्मेष जोशी यांची ईडीने जरी चौकशी केलेली असली तरी आणखी काही मंडळींची त्यात पुढे चौकशी होणार असल्याची माझी माहिती आहे ज्याची संबंधितांना कल्पना आलेली असल्याने अनेक चौकशीच्या धाकाने धास्तावलेले आहेत…
क्रमश: हेमंत जोशी