यारोंका यार फिर एक बार : पत्रकार हेमंत जोशी
शिखर बँक प्रकरण अनेकांना अडचणीचे ठरणार आहे कारण काँग्रेसमधल्या एकमेव ना खाऊंगा ना खाने दूंगा संस्कारातून घराण्यातून आलेल्या पृथ्वीराज चव्हाणांनी ईडीकडे ते पाठवून दिलेले आहे. राजन पारकर नावाच्या आमच्या पत्रकार मित्राचे लग्न निदान याजन्मी होणे अशक्य कारण त्याने शपथ घेतली आहे जोपर्यंत वहिदा रहेमान किंवा आशा पारेख या दोनपैकी कोणीही एक बोहल्यावर चढणार नाही, मी लग्न करणार नाही. मकरंद अनासपुरे यांचे केस कधीही विस्कटलेले तुम्हाला दिसणार नाहीत कारण विग कधीही विस्कटत नसतो. ऍक्सिस बँक एकमेव अशी जी कधीही बंद पडणार नाही कारण तेथे अमृता फडणवीस कामाला आहेत आणि चंद्रपूर मतदारसंघात कायम भाजपा आमदार निवडून येणार आहे कारण त्या मतदार संघाचे आमदार व उमेदवार सुधीर मुनगंटीवार आहेत, असतात. नेहमीप्रमाणे सुधीर मुनगंटीवार हेच या मतदार संघातून उभे राहतील, यावेळीही विक्रमाधिक्याने निवडून येतील…
केसांचा विग वापरणाऱ्यांविषयी कुतूहल आहे, जिज्ञासेपोटी त्यांच्याकडून नेमके जाणून घ्यायचे आहे कि घरी गेल्यावर गावकरी जशी आपली टोपी खुंटीला टांगून ठेवतात तसे हे देखील डोक्यावरचा विग काढून खुंटीला टांगून ठेवतात का कि थेट रात्रीच बायकोच्या हाती झोपतांना काढून देतात, नेमके माहित नाही. विगचा भांग आधीच पाडल्या जातो कि विग डोक्यावर चढविल्या नंतर त्यांची बायको भांग पाडून देते. प्रेयसी किंवा पत्नी विग घालणाऱ्याच्या केसांवरून जेव्हा प्रेमाने हात फिरविते तेव्हा तो प्रेमाचा स्पर्श त्यांच्या शरीराला जाणवतो का कि शास्त्रक्रियापूर्वी क्लोरोफॉम दिल्याने पुढे जसे काही जाणवत नाही तसे विग घातलेल्या पुरुषांचे होते, असते. विग घालणाऱ्यांना खोबरेल तेल लावावे लागते का, आठवड्यातून किमान एकदा शाम्पू त्यांना करावा लागतो का, असे अनेक प्रश्न मला विग घालणाऱ्यांच्या बाबतीत पडलेले असतात..
www.vikrantjoshi.com
पुरुष केसांचा विग का वापरतात मला न उलगडलेले कोडे आहे याउलट केस नसलेले गळलेले म्हणजे टक्कल पडलेले पुरुष अधिक कर्तृत्वान बुद्धिमान आणि हो, सेक्सी असतात असे स्त्रियांना वाटते त्यामुळे विग घालून त्यांनी स्वतःचे हसे करवून घेऊ नये, विग वापरणारे पुरुष इतरांचा हमखास थट्टेचा टिंगलीचा विषय ठरतात, चिडविण्याचे खिजविण्याचे विषय असतात. विग घालणाऱ्या साऱ्या पुरुषांना हे उगाचच वाटत असते कि मी विग वापरतो ते कोणाच्याही लक्षात येत नाही, हा त्यांचा हमखास गैरसमज असतो. जेव्हा एखादी महिला विग वापरणाऱ्या पुरुषाचे केस धरून त्याला बाहेर काढते तेव्हा खरे स्वरूप क्षणार्धात बाहेर पडते. मी स्वतः विग वापरतो असेही अनेकींना वाटत असल्याने माझ्यावर हे प्रसंग कितींदातरी ओढवले आहेत. मला तर सुधीर मुनगंटीवार यांच्यावरही संशय आहे कि तेही विग वापरतअसावेत, विचारण्यासाठी नो चान्स कारण सुधीर मुनगंटीवार एकपत्नीव्रत असल्याने म्हणजे ते पुढारी असूनही त्यांचे गाव तेथे कुटुंब नसल्याने त्यांच्या अमुक एखाद्या मैत्रिणीला जाऊन विचारावे कि भाऊंचे ओरिजनल आहेत कि तेही विग वापरतात म्हणून…
पत्रकार किशोर कुलकर्णी यांनी म्हटले आहे कि, भारावून जाणे हा सुधीरभाऊ नामें संवेदनशील नेत्याचा माणसाचा स्वाभाविक अविष्कार असावा, त्यामुळे जग्गी वासुदेव यांच्या जल व वन क्षेत्रातील कामांचा पुढाकार त्यांना प्रभावित करतो. श्रीश्री रविशंकर यांचे विचार त्यांचा सहवास त्यांना प्रभावित करतो. बाबा रामदेव यांनी निसर्गाच्या कुशीतून दिलेले आयुर्वेद म्हणजे त्यांची निसर्गा ची व्यवहाराशी घातलेली सांगड यांना कायम प्रभावित करते. जंगलावर प्रेम करणारा, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे यावर श्रद्धा ठेवणारा हा नेता, भन्नाट माणूस मधमाशीप्रमाणे समाजात राजकारणात मतदारसंघात राज्यात देशात वावरतांना विचिध व्यक्ती, संस्था, प्रसंग, अनुभव यातून अखंड मधू संकलन करतो आणि कृत्यातून त्याचा आनंद इतरांना देतो. बरे झाले ते मंत्री झाले व त्यांना त्यांच्या आवडीचे वन खाते मिळाले, त्यातून कोट्यवधी वृक्ष लागवडीची रोपणाची कल्पना जन्माला आली ज्याचे रूपांतर नजीकच्या काळात घनदाट वृक्षवेलींमध्ये झाल्याचे तुम्हाला नक्की बघायला मिळणार आहे…
मुनगंटीवार नेहमी सांगतात, मी राजकारणात यावे यासाठी ना कोणी आंदोलन ना उपोषण केले. त्यासाठी ना कोणी मोर्चे काढले वा धरणे धरले. राजकारण,त्याचबरोबर समाजकारण हा माझा आवडीचा प्रांत व घेतलेला स्वतःचा निर्णय. त्यामुळे संपूर्ण यशापयशाची जबाबदारी माझी स्वतःची असते. कधीतरी अमुक एखादयाठिकाणी अपयश आले कि त्याचे खापर सहकारी नेते व कार्यकर्त्यांवर फोडून अपयश झाकण्यातला मी पळपुट्या नेता अजिबात नाही. कायम जमिनीवर राहायचे, जामिनावर नाही असे माझे मत त्यामुळे विजयाने मी माजलो किंवा अमुक एखाद्या पराभवाने खचलो, असे कधी घडत नाही घडणार देखील नाही, कदाचित याला वडिलांकडून देशभक्तीचे मिळालेले कणखर बाळकडू कारणीभूत असावे. दीनदुबळ्या वंचित शोषित अनाथ अपंग धिक्कारलेल्या नाकारलेल्या अडगळीत पडलेल्या अडचणीत अपघातात सापडलेल्या शेतकरी शेतमजूर बेकार बेरोजगार लोकांसाठी जनतेसाठी मतदारांसाठी अपेक्षाविरहित काम करत राहायचे मी ठरविलेले आहे, त्यात बदल करणार नाही….
क्रमश: हेमंत जोशी