यारोंका यार आशिष शेलार :पत्रकार हेमंत जोशी
आशिष शेलार हे खरोखरी यारोंके यार आहेत आणि दुश्मनोके दुश्मन आहेत. एकदा त्यांची सटकली कि समोरचा मग कितीही बलवान ताकदवान असला तरी हे महाशय त्याला चारी मुंड्या चित करतात नंतरच पुढल्या कामाला लागतात कामगिरीवर रवाना होतात. तुम्हाला हे तंतोतंत माहीत आहे कि आम्हा भारतीयांची सर्वाधिक वाईट सवय त्याला फारतर विकृती असे म्हणता येईल, कि आपल्यातले बहुतेक अमुक एखाद्या हॉटेल मध्ये घुसले रे घुसले कि सर्वात आधी ते टेबलावर असलेल्या ग्राहकाच्या समोर खायला काय मांडून ठेवले आहे हे अशा नजरेने बघतात कि जणू त्याआधी कित्येक दिवस ते उपाशी आहेत. थोडक्यात आधी बसलेल्या ग्राहकाच्या पानात बघायचे, बघून झाल्यावर मग त्या पद्धतीने वेटरकडे ऑर्डर द्यायची. बहुतेक भारतीयांचे ते जगात कुठेही गेले असले तरी यापद्धतीने वागणे असते. थोडक्यात नक्कल करणे त्यांना आवडते. आशिष शेलारांचे हे एक बरे आहे कि त्यांचे सारे काही ओरिजनल असते म्हणजे अमुक एखाद्या नेत्याचे अनुकरण करायचे त्यापद्धतीने मग मतदार संघात काम करायचे,त्यांना कधी जमले नाही, सारे काही स्वतःच्या अक्कलहुशारीने, महत्वाचे म्हणजे आयुष्यात एकही क्षण नो टाईमपास, त्यांना कोणीही भेटले कि त्यांचे बोलणे, राजकारण क्रीडा समाजकारण इत्यादी विषयांना धरूनच असते, त्यांच्या डोक्यात दुसरे तिसरे काहीही नसते…
www.vikrantjoshi.com
सतत पाच वर्षे मी माझ्या उघड्या डोळ्यांनी हे बघत आलोय, या ना त्या कारणाने, निमित्ताने आशिष शेलार सतत आम्हा मतदारांच्या संपर्कात असतात. विशेष म्हणजे त्यांनी महिन्याभरात मतदारसंघात काय केले, विकासाची कोणती कामे उरकली त्याचा जसाच्या तसा वृत्तांत ते माहिती पत्रकातून साऱ्या मतदारांना नेमके कळवून मोकळे होतात. त्यामुळे ते सतत जणू आमच्यात एक डोळस आमदार डॅशिंग लोकप्रतिनिधी म्हणून वावरताहेत असे वाटत राहते. मुंबई बांद्रा पश्चिम विधानसभा मतदारसंघात मुस्लिम आणि मराठी नसलेले विशेषतः राज्याबाहेरचे असे बहुसंख्य मतदार आहेत जे झोपडपट्टीतून वास्तव्याला आहेत, आपले नाहीत म्हणून दुर्लक्ष करायचे अशी शेलारांनी वृत्ती नसल्याने त्यांनी झोपडपट्ट्यातून जो विकास साधला आहे, बघणार्यांना असे वाटत नाही कि ते झोपडपट्टीतून प्रवास करताहेत, एवढी काळजी आशिष शेलार लोकप्रतिनिधी या नात्याने गोरगरिबांची सतत घेत आले आहेत. शिवाय त्यांच्यामागे असलेला व्याप तर एकाचवेळी एखाद्या स्त्रीला छोटी छोटी ८-१० मुले असल्यासारखा आहे म्हणजे त्यांचे जेवढे क्रिकेट वर्तुळात प्राबल्य लक्ष असते दबदबा असतो त्याच तत्परतेने ते आत्ताआत्तापर्यंत मुंबई भाजपाध्यक्ष म्हणून काम बघायचे, साऱ्यांना पुरून उतरायचे त्यातून या मुंबईत भारतीय जनता पक्ष बघता बघता फोफावला, वाढला, ताकदवान ठरला, पक्षाची मुंबईत ताकद वाढविण्यात शेलार यांचे मुंबई शहर भाजपाध्यक्ष म्हणून कार्य काम कौतुकास्पद होते, लक्षणीय ठरले, जे सहज शक्य नव्हते पण शेलारांनी करून दाखवले…
सांगितले ना कि आशिष शेलार यांचे ८-१० मुले असलेल्या लेकुरवाळ्या स्त्रीसारखे आहे म्हणजे तिच्या खांदयावर एक असतो कडेवर दुसरा असतो पोटात तिसरा असतो आणि मला आणखी एक बाळ लगेच हवे आहे म्हणून नवऱ्याचा तिला सतत जाच त्रास असतो कामुक नजरेने बघणे वागणे असते. शिवाय सभोवताली तिच्या इतरही चिल्यापिल्यांचा गराडा पडलेला असतो. शेलार सकाळी भल्यापहाटेपासून तर रात्री फार उशीरपर्यंत एकतर लोकांच्या गराड्यात असतात किंवा थेट साऱ्यांशी फोनवर बोलण्यात धन्यता मानतात त्याचवेळी त्यांचे सर्वत्र चौफेर लक्ष असते म्हणजे त्यांना कोणे एके काळी नगरसेवक म्हणून यशस्वीरीत्या काम केल्याने तिकडे मुंबई महापालिकेत विकास कामांकडे देखील सतत कायम लक्ष असते कारण शेलार आधी अख्ख्या मुंबई शहराचे अध्यक्ष होते म्हणजे एकप्रकारे त्यांच्याकडे भाजपाचे पालकत्व होते, हा पक्ष बलवान ताकदवान करण्याची त्यांच्यावर मोठी जबाबदारी होती त्यानंतर तर ते थेट मंत्री झाले म्हणजे उभ्या राज्याची त्यांच्यावर मंत्री या नात्याने जबाबदारी येऊन पडली, हे सारे ते यशस्वीरीत्या निभावत आले आहेत, त्यांना फार उशीरा मंत्री करण्यात आले अन्यथा यशस्वी मंत्री म्हणून काही गाजले जसे महाजन पाटील किंवा बावनकुळे इत्यादी नावाजले त्या सर्वांच्या पुढे आशिष शेलार नक्की गेले असते….
मुख्यमंत्र्यांनी, केंद्राने मुंबईतील झोपड्पट्टीवासियांच्या बाबतीत अभूतपूर्व निर्णय घेतले आहेत त्यात पाठपुरावा आणि नेमकी माहिती देण्यात आशिष शेलार मोठे आघाडीवर होते हे सांगतांना आम्हा मतदारांना छान फिलिंग येते. २००० ते २०११ मधील पुरावे असलेल्या मुंबईकर झोपडपट्टीवासीयांना प्रधानमंत्री आवास योजनेत मुंबईतच म्हणजे मुंबईबाहेर अजिबात नाही जे २६९ चौरस फुटांचे पक्के घर मिळणार आहे, निर्णयावर आमच्या बांद्रा विधानसभा मतदार संघातले विशेषतः गोरगरीब कायम शेलार आणि फडणवीसांचे कौतुक करून मोकळे होतात. जेव्हा पक्क्या घरांची प्रधानमंत्री आवास योजना अमलात आली अस्तित्वात आली, शेलार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी या गोर गरीब मंडळींना जे नाव नोंदवून घेण्यासाठी विनामूल्य सहकार्य केले ते त्यांना अजिबात विसरता येणार नाही. यापूर्वी आमच्या विधानसभा मतदारसंघात सुनील दत्त यांचा सर्वत्र विशेषतः गोरगरिबांचे नेते म्हणून बऱ्यापैकी प्रभाव होता, असे पण शेलार तर त्यांच्याही पुढे गेले, अर्थात साऱ्याच मतदारांना आता ते आपल्या घरातले एक सदस्य असे कायम वाटत राहते. महत्वाचे म्हणजे सुनील दत्त यांची शेलारांनी गोरगरिबांना कधी उणीव भासू दिलेली नाही त्यामुळे प्रिया दत्त नव्हे तर आशिष शेलार आता मुंबईकरांना विशेषतः या मतदारांना अधिक जवळचे वाटतात….
क्रमश: हेमंत जोशी.