पवारांची गेलेली पॉवर : पत्रकार हेमंत जोशी
शरद पवार ८० च्या आसपास आहेत, ते वृद्ध झाले आहेत, त्यांना कर्करोग आहे, काही वर्षांपूर्वी त्यांच्यावर त्यामुळे गंभीर शस्त्रक्रिया करावी लागली होती, त्यांच्या पायाचे हाड मोडलेले आहे, त्यांना मणक्यांचा त्रास आहे, पुन्हा जुना कर्करोग रोग उदभवयला नको म्हणून अलीकडे त्यांची जीभ कापावी लागली. पवारांच्या या शारीरिक असहाय्य्यतेविषयी ज्यादिवशी ईडी प्रकरणाचा मुंबईत अभूतपूर्व गोंधळ उडाला त्यादिवशी दुपारी जितेंद्र आव्हाड पवारांच्या सिल्व्हरओक निवासस्थानी कुठल्याशा वाहिनीच्या प्रतिनिधीला हे सांगतांना साऱ्यांनी बघितले आहे. त्यावर माझे सांगणे असे कि याच आव्हाडांनी पवारांना देखील भेटून हेच सांगावे कि तुम्हाला एवढ्या व्याधी असतांना, अलीकडे तुमचे बोलणे इतरांना स्पष्ट कळण्यासाठी कुठलेसे ते मशीन जिभेवर ठेवल्याशिवाय तुम्हाला बोलणे अशक्य असते, सिंह म्हातारा झाला कि गल्लीतले कुत्रे देखील त्याला गुदगुदल्या करून, वाकुल्या दाखवून मोकळे होते, असे आज दर दिवशी तुमच्याविषयी घडत असतांना तुम्ही हा सत्तेचा लोभ सोडा, तुम्ही आता सन्मानाने निवृत्त व्हावे, असे त्यांना सांगावे, ऐकले तर ऐकले, कारण म्हातारपणी विशेषतः पुरुषांचा स्वभाव लहान मुलांसारखा उनाड द्वाड होतो, त्यामुळे आव्हाडांचे पवार ऐकतील शक्यता कमी आहे पण प्रयत्न करायला काय हरकत आहे…
आधी पैसे कमविण्यासाठी अनेक बहुतेक महाबिलंदर दलाल अधिकारी कंत्राटदार आणि नेते शरद पवारांच्या आश्रयाला गेले सतत १५ वर्षे एखादाच अपवाद सोडला तर या राज्याला ओरबाडून खा खा खाल्ले नंतर हे मिळविलेले पचविण्यासाठी हेच सारे पवारांना सोडून इतरत्र विखुरले पण तेव्हाच पवारांनी त्यांना मोकळे सोडले नसते तर आज हे राज्य लयाला गेले नसते, लोकांनी पवारांचे त्यांच्या जिवंतपणी पुतळे उभे केले असते, देवासारखे त्यांना पुजले असते. माझे हेच सतत सांगणे असते कि पवार व्यक्तिगत पैसे मिळविताना गैरव्यवहार करतांना कधी आढळले नाही पण त्यांनी अगदी सुप्रिया अजित पासून तर त्यांच्या सभोवताली जमलेल्या साऱ्यांना कधी हे असे करू नका म्हणून सांगितलेही नाही त्यामुळे पवार त्यांच्या आयुष्याच्या नेमके संध्याकाळी जनतेच्या मतदारांच्या मनातून उतरले आहेत. पुन्हा मागचे पुढे होऊ घडू नये म्हणून यावेळीही मतदारांनी पवारांना सत्तेपासून दूर ठेवावे, सांगावेसे वाटते…
वाईट याचे वाटते कि देशाचे नेतृत्व करण्याची ताकद क्षमता असतांना शरद पवार येथे या राज्यात कायम चुकीच्या संस्कारहीन नेत्यांना पाठराख्यांना साऱ्यांना मोठे करण्यात गुंतून पडले. स्वतः संपले आणि हे राज्य देखील लयाला गेले. काहीही भले झाले नाही, केले नाही. ज्यांना या देशाचे पंतप्रधान होणे सहजशक्य होते त्यांनी आंतरराष्ट्रीय खेळ खेळायचे सोडून येथे या राज्यात लगोऱ्या फोडण्याचा खेळ खेळण्यात धन्यता मानली त्यामुळे यापुढे याआधीसारखे पवारांना या राज्यात पुनःपुन्हा यश मिळेल दिसत नाही, यावेळी कदाचित काही ठिकाणी त्यांना थोडेफार यश मिळेल म्हणजे कम्पेअर टू काँग्रेस त्यांचे बरे निकाल हाती येतील पण पूर्वीसारखे सत्ता संपादनासाठी मिळणारी संख्या यावेळी त्यांना गाठणे अजिबात शक्य नाही. अत्यंत महत्वाचे म्हणजे सतत मागचे पाच वर्षे याच पवारांनी या ना कारणाने विशेषतः देवेंद्र फडणवीसांना त्रासून सोडले पण देवाचे आशीर्वाद, फडणवीस सहीसलामत बाहेर पडले अर्थात याचे कारण असे कि त्यांचे सारे काही करणे केवळ राज्य राष्ट्र विकास साधण्यासाठी असल्याने, त्यांना मला वाटते, त्या अद्भुत शक्तीचे आपोआप पाठबळ मिळत होते त्यामुळे लोकांच्या मतदारांच्या जनतेच्या साऱ्यांच्या मनातूनच उतरलेले पवारांचे गलिच्छ राजकारण त्यांना यापुढे यश मिळवून देईल असे दूरदूरपर्यंत वाटत नाही, दिसत नाही…
देवेंद्र, तू मला माझ्या मुलासारखा आहे असे हक्काने आणि हट्टाने सांगून शरद पवार यांनी आधी फडणवीसांना पोटाशी प्रेमाने घ्यायचे होते तदनंतर त्यांनी शेतकऱ्यांचे, मराठ्यांच्या आरक्षणाचे प्रश्न त्यांच्याकडून खुबीने सोडवायचे होते, ते दिले सोडून आणि पवारांनी अतृप्त आंदोलकांना आतून सतत भडकविण्याचे, फडणवीसांना कायम मानसिक त्रास देण्याचे पाप सुरु ठेवले. त्यावर केलेली खेळी पवारांवरच उलटली, जातपात काहीही न बघता एकेकाळचे पवार समर्थक देखील फडणवीसांना घट्ट बिलगून मिठी मारून मोकळे झाले आणि पवार स्वतः लोकांच्या मनातून उतरले, एकाकी पडले, त्यांच्याच नेत्यांनी, लोकांनी पवारांना वाऱ्यावर सोडले. दुपारी ईडी माघार घेते, शरद पवारांना मोकळा श्वास घेणे शक्य होते. बाजी पालटली या आनंदात पवार असतांनाच संध्याकाळी अजित पवार प्रकरण घडते, अजितदादा थेट आमदारकीचा राजीनामा देऊन अज्ञातवासात निघून जातात म्हणजे मेरिट मध्ये नक्की येईन असे अमुक एखाद्या विद्यार्थ्याला वाटत असतांना त्याच्या उत्तरपत्रिकेवर शाई सांडावी तसे पवारांचे झाले, जे दुपारी कमावले ते सारे काही तासांच्या आत त्यांनी गमावले, याला म्हणतात सारे काही येथेच भोगून वर जायचे असते, बघूया पुढे काय घडते ते…
तूर्त एवढेच : हेमंत जोशी.