महाराष्ट्राची हास्य जत्रा : १: पत्रकार हेमंत जोशी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत असे अनेकदा घडते कि ते युद्धात हरतात पण तहात जिंकतात. विधानसभा निवडणुकीच्या खरे पाहता युद्धातही ते हरले होते पण तहात मात्र ते जिंकले त्यांची तीच हातोटी आहे आणि फडणवीसांच्या बाबतीत मात्र नेमके उलटे घडले, ते युद्धात जिंकले पण तहात हरले. भलेही महाआघाडीचे सरकार सत्तेत आलेले असेल पण या राज्यातले असे एकही घर नाही ज्या घरात फडणवीस यांचे बाबतीत वाईट वाटले नाही किंवा डोळ्यात अश्रू आले नाहीत. विदर्भात तर सुतक असल्यासारखे वातावरण आहे, जणू आपल्या घरातले कोणी गेले पद्धतीचे तेथे घरोघरी वातावरण आहे, ज्याचे त्याचे डोळे अश्रूंनी थबथबलेले आहेत. जे घडले ते अत्यंत वाईट घडले पण यापुढे तरी राज्याचे आणखी वाईट होऊ नये याची निदान मुख्यमंत्री ठाकरे यांनी जरी काळजी घेतली तरी देव पावला असे म्हणता येईल. पवारांकडून अपेक्षा ठेवणेच चुकीचे. अहो, ज्या मंडळींचे लुटणे व लुबाडणे राज्याच्या जनतेला असहाय्य्य झाले होते त्याच मंत्र्यांना तुम्ही रिपीट करताहात यापेक्षा आणखी वाईट आणि वाटोळे या राज्याचे काय होऊ शकते ?
www.vikrantjoshi.com
शरद पवार म्हणजे दगाबाजी पवार म्हणजे पाठीत खंजीर खुपसणे पवार म्हणजे धोका पवार म्हणजे सिनेमातल्या खलनायकासारखे दगाबाज हे जे शरद पवार यांच्याविषयी सतत अगदी उघड बोलले सांगितले म्हटले जायचे तो डाग पवारांनी आयुष्याच्या संध्यकाळी साफ धुवून टाकला कारण भाजपाने अनेक प्रयत्न करूनही पवारांनी ना ठाकरे यांना धोका दिला ना त्यांनी काँग्रेसला फसविले. केवळ पवार होते आणि त्यांनी अगदी सुरुवातीला काँग्रेस व शिवसेनेला जे वचन दिले होते केवळ त्यामुळेच महाआघाडीचे सरकार अस्तित्वात आले आणि उद्धव मुख्यमंत्री झाले. त्यामुळे सतत महिनाभर पवार यांच्याविषयी ज्या अफवा मुद्दाम अनेकांनी पसरविण्याचा प्रयत्न केला तो प्रयत्न तर पवारांनी हाणून पाडलाच पण त्यांना जो मोठा डाग आजपर्यंत लागलेला होता तो देखील यानिमीत्ते पुसल्या गेला म्हणून पवारांना आता एकच सांगावेसे वाटते आणि त्या काँग्रेस च्या श्रेष्ठींना देखील हेच ओरडून सांगावेसे वाटते कि झालेल्या चुका कृपया पुन्हा करू नका, डागलेले डागाळलेले भ्रष्ट दुष्ट थर्डग्रेड लुटारू डाकू स्वभावाचे नेते आमदार त्यांना राज्याचे मंत्री राज्यमंत्री करू नका…
आज मला लगेच येथे फारसे काही शपथ घेतलेल्या मंत्र्यांविषयी वाईट सांगायचे लिहायचे नाही पण पुढले मंत्रिमंडळ देखील याच पद्धतीने शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस निवडणार असेल तर भाजपाला पुन्हा एकदा सुगीचे दिवस यायला फारसा वेळ लागणार नाही कारण आजच अचानक काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सत्तेत येण्याने येथील प्रत्येक माणूस मग तो कोणत्याही विचारांचा असेल अत्यंत मनातून अस्वस्थ आहे कारण त्याला आठवते आहे युती सत्तेत येण्यापूर्वी १९९९ ते २०१४ दरम्यान काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या प्रत्येक मंत्र्याने आणि राज्यमंत्र्याने या राज्याला लुबाडून ओरबाडून कसे नागडे केले होते ते, पण आघाडीचे नशीब जोरदार त्यांना पवार आडनावाचा फिनिक्स पक्षी भेटला आणि ते सत्तेत आले पुन्हा. मिळालेली सत्ता पुढले दहा वर्षे टिकवायची असेल तर याच शरद पवारांनी सर्वांना अक्षरश: दम भरायला हवा, खबरदार माझ्या राज्याला लुटले लुबाडले तर. शरदरावजी एक डाग तर तुम्ही पुसून काढला आता दुसराही डाग आयुष्याच्या संध्याकाळी पुसून काढा, पैसे न खाणारे मंत्री आणि मंत्रिमंडळ, हे काम आता तुम्हीच करून दाखवा…
क्रमश: हेमंत जोशी