महाराष्ट्राची हास्य जत्रा : भाग २: पत्रकार हेमंत जोशी
सत्ता हि फेव्हिकॉल सारखी असते एकदा सत्तेची खुर्ची ढुंगणाला चिकटली रे चिकटली कि ती विरोधकांकडून काढता काढल्या जात नाही त्यामुळे महाआघाडी फार काळ टिकणार नाही या तुमच्या आमच्या म्हणण्याला फारसा किंवा अजिबात अर्थ नाही. हे तर असे म्हणणे झाले कि त्या दोघांचे भांडण झाले कि ती माझ्याकडे नक्की येणार आहे, त्यांचे पटणारच नाही असे माजी प्रियकराने आपल्या प्रेयसीच्या आणि तिच्या नवर्याच्या बाबतीत म्हणण्यासारखे आहे. राज्याच्या राजकीय घडामोडीत यावेळी वेगळे खूप काहीतरी घडणार आहे, अत्यंत महत्वाचे म्हणजे शरद पवार हे उद्धव ठाकरे यांना पोटच्या मुलासारखे सांभाळून घेतील, सत्तेतल्या साऱ्या क्लुप्त्या शिकवतील, काय करायचे काय करायचे नाही हेही पवार मुख्यमंत्र्यांना नेमके समजावून सांगतील आणि पवारांच्या सांगण्यात काहीतरी स्वार्थ आहे डावपेच आहेत असे उद्धव यांना अजिबात वाटणार नाही ते खाली मान घालून एखाद्या चतुर हुशार विद्याथ्यासारखे पवारांचे ऐकून घेतील, शरद पवार यांना मनातल्या मनात राजकीय गुरु मानून मोकळे होतील…
माझे अख्खे लिखाण तुम्ही संग्रही ठेवत चला आणि मी लिहिलेले जसेच्या तसे घडले नाही तर माझी टर खेचून मोकळे होत चला. यापुढे यशस्वीतेवर नेमकी कशी मात करायची याबाबतीत विशेषतः सतर्क सावध राहायचे आहे ते काँग्रेस व काँग्रेसच्या नेत्यांना मंत्र्यांना, अजित पवार यांना आणि भाजपा व देवेंद्र फडणवीस यांना. जे आमदार अजित पवार यांचे नेतृत्व मानणारे आहेत ते आजही त्यांच्यापासून फार दूर गेलेले आहेत असे अजिबात नाही कारण आमदारांनी अजितदादांचे म्हणणे ऐकले नाही आणि ते दादांनी बंड केल्यानंतर लगेचच शरद पवारांकडे निघून आले हे जे तुम्ही बघितले त्यातही फारसे तथ्य नाही त्यामागचे नेमके डावपेच मी नक्की कधीतरी पुरावे मांडून तुम्हाला सांगणार आहे पण एक नक्की घडणार आहे कि यापुढच्या पाच वर्षात दादा गटाचे आमदार दादांपासून कसे कायमचे दूर जाऊन दादांचे राजकीय भवितव्य खिळखिळे करण्याचा मोठा प्रयत्न होऊ शकतो, मला वाटते अगदी शपथविधीपासून तसे घडायला सुरुवात झालेली आहे. यावेळी शरद पवार यांनी आखलेली रणनीती अशी दिसते कि त्यांना शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करतांना शिवसेनेशिवाय इतरांची गरज पडू नये…
www.vikrantjoshi.com
ससा आणि कासवाच्या कथेतले यावेळी शरद पवार हे जिंकणारे कासव ठरले आहेत हे आता सर्वांना मान्य करायलाच हवे. पवारांचा राष्ट्रीय नेता म्हणून या साऱ्या गोंधळात ग्राफ उंचावला असल्याने मला तर असे वाटते या उंचावलेल्या ग्राफचा ते फायदा करवून घेतील कदाचित राष्ट्रवादीला काँग्रेस मध्ये आणून सोडतील वेगळी क्रांती घडवून आणून मोकळे होतील, फडणवीसनंतर मोदी आणि शहांच्या नाकात ते नक्की दम आणतील, नेमके हेच अमित शाह यांच्या लक्षात आले नाही आणि त्यांनी गरज नसतांना विनाकारण चुकीचे निर्णय घेऊन फडणवीस यांचे दोर कापले, देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र हे घुमणारे वाक्य अमित शहा यांना लागले आणि त्यांनी राज्यातल्या भाजपाचे मोठे नुकसान करवून घेतले वरून स्वतःच्या पायावर देखील धोंडा मारून घेतला. राज्यातली भाजपा आज जिंकून देखील हरलेली आहे, इतर कोणीही नाही फक्त आणि फक्त भाजपाला पवारांनी अलगद जाळ्यात पकडून मोठी शिकार केलेली आहे. आकडे लावणारे कसे दिवसभर चांगली कमाई करतात आणि संध्याकाळी घरी परततांना सारी कमाई आकडयांवर लावून कंगाल होतात, भाजपाचे आकडे लावणाऱ्या मंडळींसारखे झाले आहे. एक मात्र नक्की आहे जर पवारांना काँग्रेस मध्ये जायचे नसेल तर राज्यातल्या काँग्रेसने देखील आपला देवेंद्र फडणवीस आणि भाजपा होणार नाही याची डोळ्यात तेल घालून काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. आपल्याला हवे तसे वापरून घेतले आणि शिवसेना राष्ट्रवादी हे नाते अधिक घट्ट करून आपल्याला वाऱ्यावर सोडले आहे, जर उद्या काँग्रेस नेत्यांना वाटून घ्यायचे नसेल तर त्यांनी राजकारणात अतिशय धूर्त खेळी खेळून यश मिळविणाऱ्या उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर बारकाईनर लक्ष ठेवायला हवे. एक नक्की आहे, भाजपाला पुन्हा एकवार यश संपादन करण्यासाठी मोठी मेहनत आणि कसरत करावी लागणार आहे, वाईट वाटते…
तूर्त एवढेच : हेमंत जोशी