मंत्रिमंडळ विकार आणि विस्तार : पत्रकार हेमंत जोशी
नेमके सांगायला गेले कि पवार या वयातही अंगावर धावून येतात दातओठ खातात राग राग करतात आमची मीडियाची अवस्था मग गुप्तरोग झाल्यासारखी होते म्हणजे सहन होत नाही आणि सांगताही येत नाही किंवा ढुंगणाला फोड आणि सासूबाई डॉक्टर म्हणजे सहन होत नाही पण सासूबाईंना चड्डी खाली करून फोडही दाखवता येत नसलेल्या पेशंट सारखी मीडियाची अवस्था पवारांच्या बाबतीत झालेली आहे. मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर मात्र पवारांनी काहीही यावेळीही वेगळे करून न दाखविल्याने शेवटी नेमकी परिस्थिती सांगणे येथे अपरिहार्य ठरले आहे. मंत्रिमंडळ विस्तारात वेगळे काहीतरी करून दाखविले घडवून आणले ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, पवारांनी मात्र काहीही वेगळे केले नाही याउलट ते स्वतःच्या नेहमीच्या स्वभावाला जगले, उद्धव यांच्या हातून हवे ते त्यांनी मोठ्या खुबीने हिसकावून घेतले, नेमके हवे तेच पदरात पडून घेतले, उद्धव यांच्यावर भविष्यात हात चोळत बसण्याची वेळ त्यातून नक्की येऊ शकते…
ज्यांनी पवारांना या राज्यात या देशात सतत बदनाम केले अडचणीत आणले नामोहरम केले, अपयश ज्यांच्यामुळे पवारांना अनेकदा मिळले त्याच राष्ट्र्वादीतल्या आमदारांना नेत्यांना तरीही यावेळीही शरद पवार यांनी मंत्री केले मंत्रिमंडळात स्थान दिले जे त्यांनी केले ते अतिशय चुकीचे केले असे म्हटल्यास अजिबात वावगे ठरू नये. अधिकाऱ्यांना दमदाटी करून जनतेला लाथ मारून उल्लू बनवून आपल्याला आणि आसपासच्या दलालांना हवे ते मिळविणारे आमदार पुन्हा एकवार पवारांनी नामदार केले, अत्यंत महत्वाचे म्हणजे जे आधी मंत्री म्हणून खाबुगिरी करणारे होते बदनाम होते त्यांना यावेळी आणखी मोठे अधिकार कसे मिळतील याची काळजी त्यांनी घेतल्याचे मंत्रिमंडळ विस्तार आणि राष्ट्रवादीचे एकूण मंत्री बघितले असता तेच सतत जाणवत राहते. बिहार च्या दिशेने वाटचाल असेच यापुढे महाराष्ट्र राज्याच्या बाबतीत म्हणावे लागणार आहे, अर्थात काँग्रेस ने मात्र काही नव्या चेहऱ्यांना संधी दिलेली असली तरी त्यांनीही पवारांच्याच पावलावर पाऊल ठेवले आहे असे त्यांच्या एकंदर मंत्र्यांकडे बघितले असता जाणवते आहे, दुर्दैव आहे राज्यातल्या जनतेचे…
अँग्री यंग मॅन बच्चू कडू यांना शिवसेनेने म्हणजे उद्धव ठाकरे यांनी मन मोठे करून स्वतःचे नुकसान करून मंत्रिमंडळात स्थान देऊन विदर्भाची राजकीय गणिते त्यातून बदलवून ठेवलेली आहेत, एक नवा चेहरा त्यानिमीत्ते अख्य्या विदर्भाला नेता म्हणून यापुढे लाभू शकतो पण बच्चू कडू यांनी शांत डोक्यांने यापुढे प्रत्येक पाऊल उचलणे अत्यंत आवश्यक आहे म्हणजे त्यातून प्रदीर्घ काळ टिकणारे पवार गडकरी किंवा फडणवीस यांच्यासारखे दमदार कणखर नेतृत्व विदर्भाला मिळेल, आम्ही वर्हाडी मग कडू यांना डोक्यावर घेऊन नाच नाच नाचू मात्र नेहमीप्रमाणे मंत्री झाल्यानंतर देखील बच्चू कडू यांनी आपला पूर्वीचाच फंडा वापरला तर विदर्भाने पुन्हा एकदा अल्पकाळ टाकणारे जांबुवंतराव धोटे या राज्याला दिले असे म्हणण्याची वेळ आमच्यावर येऊ शकते, शेवटी हे बच्चू कडू यांना ठरवायचे आहे कि सत्तेच्या राजकारणात प्रदीर्घ काळ टिकायचे कि स्वतःचा जांबुवंतराव धोटे करवून घ्यायचा. बच्चू कडू यांचे दिसणे वागणे दाढी वाढविणे बोलणे भाषण करणे पेटून उठणे अंगावर धावून जाणे आंदोलने करणे लोकांसाठी प्रसंगी रस्त्यावर उतरणे हे सारे त्या दिवंगत जांबुवंतराव धोटे यांची वारंवार आठवण करून देणारे पण ज्या वेगात धोटे आले त्यापेक्षा दुप्पट वेगाने ते ज्या पद्धतीने मागे पडले अडगळीत सापडले स्वतःचे आणि विदर्भाचे देखील त्यांनी मोठे राजकीय नुकसान करवून घेतले ते तसे बच्चू कडू यांना करवून घ्यायचे नसेल तर यापुढे त्यांना नेमकी आक्रमकता कोठे वापरायची आणि डोके कोठे वापरायचे याचे मोठे भान ठेवावे लागणार आहे, फडणवीस यांच्याप्रमाणे आम्हा विदर्भातल्या दुर्लक्षित लोकांना एक धडाकेबाज राजकारणातला अमिताभ बच्चन नक्की हवा आहे…
क्रमश: हेमंत जोशी