एकनाथ खडसे आणि अनिल थत्ते
मंत्र्याच्या बदनामीचे षडयंत्र फत्ते :
नाथाभाऊ, लंगडत धावणाऱ्या बैलाने शंकरपटात भाग घ्यायचा नसतो, शरीराचा तंबू तोंडाचा चंबू झालेल्या वृद्धाने उफाड्या तरुणीशी लग्नगाठ बांधायची नसते किंवा भसाड्या आवाजाच्या तरुणीने मला आमच्या गावातली लता मंगेशकर म्हणतात, अशी थाप मारायची नसते, तुमचे राजकीय धोरण नव्याने पुन्हा तोरण बांधण्यासाठी सतत चुकते आहे, उपयोग शून्य असतांना आणि चारही बाजूंनी तुम्ही अपयशाने खचाखच भरलेले असताना चार पावले मागे येत खुबीने राजकीय शत्रुत्व संपविण्याची मोठी गरज असताना गेल्या अनेक वर्षांपासून ज्याच्या नेतृत्वाने खान्देशच्या पंचक्रोशीत मोठी झेप घेतली आहे त्या गिरीश महाजन यांना उठसुठ डिवचण्याचे खिजवण्याचे फाजील प्रयोग तुम्ही थांबवायची गरज असतांना तुमची बुडत्याचा पाय खोलात पद्धतीची चुकीची भूमिका तुम्हालाच मुख्य राजकीय प्रवाहातून आणखी आणखी बाजूला सारते फेकते आहे, तुम्ही फडणवीस महाजनांच्या दिशेने मारलेले सारेच तिर निष्प्रभ ठरलेले आहेत, तरीही गप न बसता तद्दन थापाड्या अनिल थत्तेंच्या खोट्या व्हिडिओचा आधार घेत राजकीय मळमळ आणि खळबळ माजविण्याचा तुमचा पोरकट प्रयत्न त्यावर हसावे कि रडावे हेच नेमके जळगाव धुळे नाशिक परिसरातल्या मतदारांना अजिबात समजेनासे झाले आहे. तुमच्याकडे महाजनांना अडचणीत आणण्या पुरेसे ठरावे असे पुरावे नाहीत याचा अर्थ महाजन पुरावे नष्ट करतात असे नाही तर भानगडी करायलाच त्यांच्याकडे वेळ नाही. अगदी तुमच्याही भानगडींचे पुरावे त्यांच्याकडे असूनही त्यांना ते बाहेर काढून तुमचे वृद्धत्व अधिक क्लिष्ट करावे असे मनातून अजिबात वाटत नाही अन्यथा उद्या समजा त्यांनी पत्रकार परिषद घेत जर तुमच्या पत्नीने तुम्हाला किडनी दान केलेलीच नाही तर ज्याने ती दान केली तो वीस वर्षांचा तरुण त्यातून मृत्यू पावला यापद्धतीने एका पाठोपाठ एक आरोप महाजनांनी तुमच्यावर केले तर प्रकरण कोणत्या थराला जाईल नाथाभाऊ, शांत राहा त्या महाजन यांचावर उगाच खोटे आरोप तेही एखाद्या तद्दन थापाड्या पत्रकाराला हाताशी धरून करू नका, महाजनांच्या मनाला वेदना देऊन त्यांचा राग उफाळून वर येईल असे अजिबात वागू नका….
www.vikrantjoshi.com
तुमच्या डरकाळ्या आता त्या वाघाच्या नसून आज ती एक गाढवाची किंकाळी वाटते, तुमचे बोलणे म्हणजे उसने अवसान आहे, मीडियाच्या ते लगेच लक्षात येते म्हणूनच विधान सभा निवडणुकीत तुम्ही जेव्हा जामनेरात जाऊन मी गिरीश महाजन यांचे डिपॉझिट जप्त करून येईल, तुमचे त्यावेळेचे वक्तव्य किंवा भाषणातून ओरडून सांगणे नेमके हवेत विरले आणि कल्पनेपेक्षा कितीतरी अधिक पटींनी मते घेत गिरीश महाजन निवडून आले. मुलाकडे तुमचे दुर्लक्ष झाले त्यातून त्याने आत्महत्या करणे पसंत केले निदान त्याच्या नंतर आपले राजकीय अस्तित्व निर्माण करून सत्तेत स्थान मिळविणाऱ्या आणि मोठे मन ठेवून ज्याने स्नुषा रक्षा यांना सत्तेत स्थान मिळवून देण्यात मोलाची महत्वाची भूमिका बजावली त्या गिरीश महाजन यांना तरी वारंवार न डिवचण्याचे कार्य तुमच्या हातून घडावे अशी प्रत्येकाची इच्छा असतांना थेट विधवा सुनेच्या ताटातही विष कालविण्याची तुमची विचित्र विक्षिप्त भूमिका केवळ गिरीश महाजनांच्या द्वेशापोटी नकळत तुम्ही कुटुंब सदस्यांच्याही मनातून उतरताहात, डर्टी सिनेमातली सिल्क स्मिता तुमची होत चालली आहे असेच हे प्रकार बघून सतत वाटत राहते. आधी अनेकदा त्या फडणवीसांसमोर भाजपामध्ये पुन्हा प्रवेशासाठी लोटांगण घालायचे पण मोदी आणि शाह यांच्याच ते अजिबात दूरदूरपर्यंत मनात नसल्याने त्यांनी प्रवेशाचा नकार कळविताच पुन्हा तो दगाफटका करण्याचा स्वभाव उफाळून वर आणायचा, त्यातून संघ आणि भाजपामधल्या प्रत्येकाची तुमच्या प्रति असलेली सहानुभूती केव्हाच संपलेली आहे, तुम्हाला राजकारणात पुन्हा पूर्वीचे वैभव म्हणजे एखाद्या प्रेताच्या मनात, मी पुन्हा उठून पूर्वीसारखा चालायला लागेल असे येण्यासारखे, जेथे आता तुम्हाला तुमच्या विधानसभा मतदारसंघात तुमच्या गावात यश नाही ज्याचे परिणाम तुमच्या कन्येला विनाकारण भोगावे लागताहेत, उगाच आगपाखड करून आता यापुढे काडीचाही उपयोग नाही. राजकारणात तुमचा थेट सिनेमातला भगवान दादा झाला आहे…
तूर्त एवढेच : पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी