हा पोरखेळ सामान्यांशी राजकारण्यांचा :
देवेंद्र फडणवीस आणि भारतीय क्रिकेट चमू या दोघांमध्ये साम्य सांगण्यापूर्वी लिखाणाची सुरुवात चुटकुल्यानी करतो. लाहोरच्या फातिमाने सकाळचा चहा नवरा मोहम्मदला थेट टमरेलात आणून दिल्याने मोहम्मद चिडून म्हणाला, हे काय घाणेरड्या टमरेलात चहा ? मी काय करू, आपल्याकडला उत्तम कप तिकडे भारताने नेला कि… आणखी एक, तुम्हाला तर हे माहीत आहे कि अंतिम सामना जिंकताच नरेंद्र मोदींनी थेट कप्तान रोहित शर्माला अभिनंदनाचा फोन केल्या केल्या रोहित म्हणाला, मोदीजी आम्हाला राहुलने जिंकून दिले त्यावर क्षणाचा अवलंब न लावता मोदी म्हणाले, आमचेही तेच, आमच्यातही एक राहुल आहे आणि तो आहे म्हणूनच आम्ही सतत जिंकत आलोय…भारतीय चमू जेव्हा क्रिकेट खेळायला मैदानावर उतरते, समोरची टीम भलेही एखादे कच्चे लिंबू असेल म्हणजे पाकिस्थान बांगला देश अफगाणिस्थान किंवा ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड सारखी बलाढ्य, कोणताही सामना बघताना प्रत्येक भारतीयाला आज आपला पराभव नक्की आहे असे वाटत असते म्हणूनच सामना बघणारा कुठलाही भारतीय सतत त्याच्या आवडत्या देवाचा जप तोंडातल्या तोंडात करीत असतो पण तुम्हाला तर ते माहीतच आहे कि असे क्वचित घडते कि भारतीय चमूला पराभवाला सामोरे जावे लागते ते जसे हमखास दरवेळी जिंकतात तेच नेमके इकडे आमच्या या राज्यात त्या देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीत घडत आले आहे म्हणजे अमुक एखादा प्रभावी राजकीय विरोधक किंवा तमुक एखादी कोणतीही निवडणूक, फडणवीस यांचा जर तेथे संबंध असेल तर ज्याला त्याला हेच वाटते कि यावेळी फडणवीसांचे काही खरे नाही त्यातून सारेच देव पाण्यात बुडवून सतत देवाचा धावा करतात इकडे त्यादिवसात देवेंद्र यांना सतत उचक्या लागतात कारण आपण सारेच देवेंद्रच्या नावाने जपतप करण्यात मग्न असतो पण ही विनाकारण उगाचच लोकांना काळजी लागून राहिलेली असते, माझ्यावर तर तुमचा विश्वासच नाही, भक्कम बाजू फडणवीसांची आहे हे मी तुम्हाला अगदी घसा फाटेपर्यंत सांगूनही तुमचा त्या त्या वेळी विश्वास बसत नाही थोडक्यात भारतीय चमू आणि देवेंद्र फडणवीस मैदानावर उतरल्यानंतर सुरुवातीला हमखास कच्चे लिंबू वाटतात, त्यांचे आता काही खरे नाही असे आपल्याला वाटत राहते तिकडे त्या दोघानांही जिंकण्याचा आत्मविश्वास असतो आणि तेच जिंकतात…
www.vikrantjoshi.com
आमदार अभिमन्यू पवार फडणवीसांचे खास आहेत आधी ते त्यांचे खाजगी सचिव होते त्यांना फडणवीसांनी पुढे निवडून आणले लागोपाठ दोन वेळा आमदार केले ते झाले. पवारांच्या शेजारी लातूर विधानसभा मतदार संघ आहे, आपल्याला सत्तेत वाटा नको म्हणून कि काय अभिमन्यू यांचे लातूर विधानसभा मतदार संघाकडे दुर्लक्ष होते आहे जसे विद्यमान आमदार अमित विलासराव देशमुखांचे, त्यांनी देखील लातूरच्या विकासाकडे पाठ फिरविली आहे, वास्तविक धीरज पद्धतीने अमित देखील किमान पाच वर्षे नक्की घरी बसले असते पण अभिमन्यू तुम्ही आणि निलंगेकरांनी उगाचच आणखी एक स्पर्धा नको भाजपचा आमदार निवडून यायला नको म्हणून लातूरकडे आपणहून दुर्लक्ष केले अन्यथा सीट महायुतीचीच होती. सारी पुण्याई वडील विलासरावांची अन्यथा अमितकुमार म्हणजे ढुंगण धुवायची अक्कल नाही वरून सहस्त्रबुद्धे म्हणा असे अगदी उघड तेथे बोलले जाते, नाही म्हणायला बिलासराव हयात असतांना आणि सत्तेत असतांना लातूरला मराठवाड्याची माधुरी दीक्षित म्हटले जायचे एवढा हा मतदार संघ विलासरावांनी सर्वांगसुंदर केला होता अनेक विकासाची कामे तेथे धडाधड केल्या जायची पण विलासराव लवकर गेले, कमावलेले खंडीभर पैसे देखील मला वाचवणार नाहीत असे विलासराव अखेरच्या दिवसात हमखास म्हणायचे तेच घडले म्हणून मी पैसे कमावणार्या प्रत्येकाला हेच सांगतो कि जर तुम्हाला कुठे थांबायचे हे कळत नसेल तर आज ना उद्या साऱ्यांचा नक्की विलासराव होणार आहे. निदान विलासरावांच्या पाठीशी कमावलेली पुण्याई तरी होती तुम्ही तर सारे मला हुबेहूब तानाजी सावंत आहात कि काय असे वाटते आणि तेच सत्य आहे. लातूरकरांनी यावेळी कसेबसे अमितकुमारांना निवडून दिले पण हि जर त्यांची शेवटची टर्म ठरावी असे अभिमन्यू पवार, चाकूरकर आणि निलंगेकर घराण्याला अगदी बेंबीच्या देठापासून वाटत असेल तर आत्तापासूनच त्यादृष्टीने भाजपा श्रेष्ठींनी एखाद्या तगड्या उमेदवाराला आमचा उद्याचा उमेदवार आणि आमदार हाच असेल हे सांगून लातूरचा रखडलेला विकास आणि भकास चेहरा तातडीने या अशा एखाद्या नेत्याला पुढे करून बदलण्याची नितांत गरज आहे कारण समस्त लातूरकर मतदार अमितकुमारांवर नाराज आहेत आणि विकासाविना अस्वस्थ आहेत. पूर्वीची हि माधुरी दीक्षित आज पार हेलन झाली आहे ज्याला जसे जमेल तसा तो लातूरला नाचवतो आहे, एकेकाळची देखणी लातूर महापालिका आज आजची वैजयंती माला झाली आहे थोडक्यात विकासाविना विद्रुप लातूर बघवत नाही, विलासरावांच्या काळात या मतदार संघाने सोने वेचले आता विकासकामे गौर्या वेचताहेत, क्षेत्र मग ते कोणतेही असो जिकडे तिकडे विकासाची वानवा आणि आमदाराची उदासीनता, नेमकी यादीच मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे…
तूर्त एवढेच : पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी