हीच ती वेळ हाच तो काळ :
नाही म्हणायला मुंबईत अख्खी हयात घालवून देखील मोरारजी देसाई ना कधी महाराष्ट्राचे झाले ना कधी मराठी माणसाला ते आपले वाटले, मुंबईत राहून देखील कायम आपल्याशी एखाद्या कर्मठ घरातल्या विटाळशी बाईसारखे ते आपल्याशी वागले, मला शिऊ नका तेच सारखे आपल्याला म्हणायचे मी तुमचा नाही असेही ते आपल्याला अप्रत्यक्ष हिणवायचे, म्हणजे आपल्या हक्काचा असा मराठी माणूस कधी देशाचा पंतप्रधान आजतागायत झाला नाही जरी यशवंतराव चव्हाणांपासून तर शंकरराव चव्हाण शरद पवार अगदी शिवराज पाटील किंवा सुशीलकुमार शिंदे अशा काही नेत्यांची नावे केवळ चर्चेत आली पण काही क्षण नंतर त्या साऱ्यांचा हवेचा बुडबुडा झाला, मराठी माणसाला आजतागायत कधीच संधी मिळाली नाही जी दाट शक्यता यावेळी नक्की फडणवीसांच्या रूपात शंभर टक्के निर्माण झालेली आहे पण त्यात अडचणी निर्माण होतील, फडणवीस विचलित किंवा बदनाम होतील असे न वागण्याची जबाबदारी आता त्यांच्या अति जवळ असलेल्या किंवा आम्ही फडणवीसांच्या फार नजदिक आहोत हे आपणहून सांगणार्या काही महाभागांची, कुठलाही गैरप्रकार घडवून न आणता त्यांना बदनाम न करण्याची फार मोठी जबाबदारी आहे आणि हे मी येथे आज आत्ता याठिकाणी यासाठी सांगतो आहे कारण त्यांच्या आसपास असणाऱ्या काहींची अजूनही म्हणावी तशी मस्ती उतरलेली नाही. निदान आज तरी मी फडणवीसांना बदनाम करू पाहणाऱ्या किंवा गंभीर चुका करीत केवळ आर्थिक फायदे लुबाडण्यासाठी त्यांना अडचणीत आणू पाहणाऱ्या अशा राज्यातील नागपुरातील कुटुंबाशी संबंधित किंवा मित्र परिवारातील व्यक्तींची नावे आज याठिकाणी घेणार नाही पण असे वागू नका आणि मला तुमची नावे जाहीर करून तुमची दुष्कृत्ये सांगायची वेळ माझ्यावर आणू नका पण तशी वेळ आली तर तुम्ही कोण कसे किती मोठे याचा मुलाहिजा न ठेवता तुम्हाला रस्त्यावर आणतांना मला कठोर भूमिका घ्यावी लागेल. फडणवीसांच्या जवळचे आहोत हे सांगतांना तुमचे वागणे बोलणे आणि कृत्य नागपुरातल्या त्या शैलेश जोगळेकर पद्धतीचे असायलाच हवे, आपण मोठे व्यावसायिक आहोत किंवा पत्रकार आहोत किंवा मंत्री आहोत किंवा कुटुंब सदस्य आहोत आणि चुकून फडणविसांना जवळचे आहोत म्हणून तुमचे कसेही वागणे आणि व्यवहार किंवा अद्वातद्वा एखाद्या बेवड्या सारखे बोलणे निदान माझ्यातला पत्रकार हे नक्कीच खपवून घेणार नाही कारण जे काही फडणवीस प्रेमी कमिशन नव्हे मिशन देवेंद्र साठी झटताहेत त्यातलाच मी पण एक आहे. फडणवीसांच्या मंत्री मंडळातील देखील प्रत्येक सदस्यांची चांगले वागण्याची आणि पारदर्शी व्यवहार करण्याची त्यांची ती मोठी जबाबदारी आहे किंबहुना यावेळी माझे कडक धोरण माझ्या पक्षातल्या सहकारी मंत्र्यांना वाट्टेल तो धुडगूस घालू देणार नाही हे एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोघनीही फडणवीसांना सांगितले आहे. माझे वाक्य लिहून ठेवा, मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांच्या आयुष्यातली हि शेवटची टर्म किंबहुना हि पंचवार्षिक योजना संपायच्या आधीच ते हे राज्य सुजलाम सुफलाम करून शंभर टक्के दिल्लीत निघून जाणार आहेत आणि आपणही सारे त्यांना उद्याचे देशाचे नरेंद्र मोदी म्हणजे देशाचे पंतप्रधान म्हणूनच त्यांची येथून ऑन प्रमोशन पाठवणी करणार आहोत, हे राज्य पुन्हा एकदा राष्ट्रात नक्की महा राष्ट्र ठरणार आहे…
www.vikrantjoshi.com
अनेक तरुणींच्या बाबतीत अलीकडे जे घडते तेच हुबेहूब एकनाथ शिंदेंच्या बाबतीत नाही म्हणायला घडले आहे घडले होते म्हणजे तरुणींचे अनेकदा प्रेम प्रकरण असते पण ज्यातरुणाशी त्यांचे अफेअर असते तरुणींच्या घरातले त्याच्याशी तिचे लग्न लावून न देता तिसऱ्याच ठिकाणी तिला बोहल्यावर चढावे लागते. एकनाथ शिंदे यांचे अगदी मनापासून मुख्यमंत्री आडनावाच्या तरुणीशी प्रेम संबंध होते पुन्हा याच तरुणीशी तुझे लग्न लावून देईल असे म्हणे त्यांना दिल्लीतल्या अमित काकांनी सांगितले असल्याने एकनाथ बिनधास्त होते पण अचानक भलतेच घडले, अमितकाकानी त्यांच्या मुख्यमंत्री नावाच्या कन्येचे लग्न नागपुरातल्या फडणवीसांच्या मुलाशी अचानक लावून दिल्यामुळे सुरुवातीला काही दिवस एकनाथांकडून नाही म्हणायला आदळआपट रुसवेफुगवे अपेक्षितच होते पण मी जे आता सांगतो आहे तेच नेमके सत्य आहे म्हणजे फडणवीस आणि शिंदे यांच्यात असलेली नाराजी पूर्णतः संपलेली आहे आणि शिंदे यांच्या आजकालच्या एकंदर देहबोली आणि उत्साहावरून तुमच्या ते अगदी सहज लक्षात येत असेल, विशेष म्हणजे जर उद्या फडणवीस दिल्लीत निघून गेल्यानंतर त्याची जागा तेही भाजपातर्फे थेट शिंदे यांना बहाल करण्यात येणार असेल तर शिंदे मनापासू वाट पाहायला तयार झाले आहेत आणि राज्यातल्या भाजपाचे उद्याचे नेते एकनाथ शिंदे हे नवे राजकीय समीकरण जन्माला येणार असेल तर पुन्हा एकदा उद्धव सेना भाजपा युती हेही नवे समीकरण जन्म घेऊ शकते, माझा हा परिच्छेद बारकाईने वाचा, नेमके लिखाण तुमच्या लक्षात आल्यास तुम्हालाही हायसे वाटेल….
तूर्त एवढेच : पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी