पत्रकारितेतले भयावह वास्तव :
नुकताच पत्रकार दिन साजरा झाला, वाटले पुन्हा एकवार घसरलेल्या बदफैली मीडियावर सविस्तर लिहावे पण जेथे आकाश फाटले आहे तेथे ठिगळ लावावे तरी कुठे कुठे आणि किती, मनातला विचार मग काढून टाकला. एवढाच विचार केला कि आपण आजपर्यंत त्या पत्रकारितेशी प्रामाणिक आहोत ते काय कमी आहे आणि जोपर्यंत मीडियातले काही मीडियाशी लॉयल आहेत तोपर्यंत काही अंशी समाजातले विदारक सत्य समाजासमोर नक्कीच उघडले जाईल हेही नसे थोडके. कोरोना काळात सारे काही बंद होते त्यातून बरेच काही वाईट घडले अनेक उध्वस्त झाले पण एक मात्र खूपच चांगले घडले कि आम्हा भारतीयांना सकाळी उठून वृत्तपत्र वाचण्याची जडलेली वाईट का चांगली सवय आपोआप बंद झाली, अलीकडे कोणीही वृत्तपत्रे फारशी वाचत नाहीत, वृत्तपत्र मालक सरकारला लुटण्या लुबाडण्यासाठी खपाची अगदी सर्हास खोटी आकडेवारी देतात म्हणजे भ्रष्टाचार हा मीडियापासूनच सुरु होतो, मीडियातून ज्ञान पाजणारे म्हणजे एखाद्या वेश्येने पतिव्रतेचे फायदे प्रवचनातून सांगण्यासारखे. आता आणखी एक आस्चर्य सांगतो जे कदाचित तुमच्या लक्षात आलेले नसेल, मला ते यासाठी माहित आहे कारण खपाची आकडेवारी जमा करणाऱ्या ज्या जाहिरात संस्था आहेत तेथे माझ्या ओळखी आहेत. जसा कोरोना काळापासून साऱ्याच वृत्तपत्रांचा खप झपाट्याने कमी झालेला आहे, दिवसेंदिवस तो आणखी कमी होतो आहे तेच बातम्या देणार्या मराठी वाहिन्यांचे देखील झाले आहे म्हणजे पूर्वी जसे आम्ही समस्त मराठी सतत बातम्या बघत असू, त्याच त्या खोट्या आणि रटाळ सुपारी घेतल्यासारख्या बहुतांश बातम्या का म्हणून बघायच्या किंवा नेमकी वस्तुस्थिती लक्षात आल्याने किंवा मीडियात जे काम करणारे प्रमुख पदावर असतात त्यांना आलेली अचानक आर्थिक सुबत्ता बघून लोकांचा आता जवळपास पूर्णतः वाहिन्या आणि वृत्तपत्रांवर विश्वास उडाला आहे त्यातून झपाट्याने मीडियाचे महत्व व विश्वासाहर्ता ओसरली आहे. बहुतेक घरातून केवळ ठळक बातम्या तेवढ्या बघितल्या जातात आणि कुटुंबातले सारेच मनोरंजनकडे वळतात….
www.vikrantjoshi.com
मिठाई विकणाऱ्याला अगदी सहज अधूनमधून जशी मिठाई तोंडात टाकण्याचा मोह होतो,आम्हा मीडियात काम करणाऱ्यांचे देखील तेच आहे, सतत सत्तेच्या नेमक्या बातम्यांच्या सभोवताली आम्ही वावरतो त्यात मीडियात काम करणाऱ्यांचे आयुष्य बऱ्यापैकी अस्थिर असते तेथे सारखी अदलाबदली होते त्यामुळे आर्थिक स्थैर्यापोटी अतिरिक्त चार पैसे मिळविण्याचा मोह होतो जो वाईट नाही शिवाय आपले मालक मीडिया दबाव तंत्राचा वापर करून ज्यापद्धतीने दरदिवशी मालामाल होत असतात, मीडियात काम करणारे अगदी जवळून हे बघतात मग तेही कमवायला लागतात पण असे अनेक आहेत ज्या मालकांचा किंवा मीडियात काम करणाऱ्यांचा दूरदूरपर्यंत लिखाणाशी पत्रकारितेशी संबंध नसतो पण आम्हीच खरे मीडियावाले अशी वातावरण निर्मिती करून जे सत्तेभोवताली सतत वावरून केवळ दलालीच्या माध्यमातून फक्त आणि फक्त पैसे मिळवितांना दिसतात. घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटना सांगतो. काही वर्षांपूर्वी माझा एक मित्र म्हणाला कि तुझ्या भावाने लोकमतच्या यदु जोशी यांनी जो अधिस्वीकृती पत्र समितीचा प्रमुख आहे त्याने माझी मान्यता रद्द केली आहे, नेमकी वस्तुस्थिती यदु जोशींच्या लक्षात आलेली होती कि हा मित्र केवळ एका वृत्तपत्रासाठी दलाली करतो त्याने आजतागायत एकही बातमी किंवा लिखाण वृत्तपत्रातून केलेले नाही त्यामुळे यदूचे चुकले नाही मी मित्राला म्हणालो त्यानंतर त्याने माझ्याशी असलेले संबंध कायमचे तोडले. आता याच यदू जोशींचा एक अतिशय जिवलग मित्र आहे तो देखील एकही बातमी लिहितांना मला कधी दिसला नाही किंबहुना त्याच्या बातम्या चुकून आल्या तरी घ्यायच्या नाहीत हे त्या वृत्तपत्र मालकाने आपल्या संपादकाला सांगून ठेवले आहे त्यातून या तथाकथित पत्रकाराला त्याच्या दैनिकातले अतिशय वाईट नजरेने बघतात पण घृणास्पद प्रकार असा कि हे महाशय राजकीय वर्तुळात सर्वाधिक प्रतिष्ठित वृत्तपत्र प्रतिनिधी म्हणून वावरतात त्यांना अधिस्वीकृती पत्र सरकार सन्मानाने देते आणि त्या भरवशावर समस्त प्रतिभावान आणि प्रतिष्ठित मीडियासंगे तोंड वर करून वावरणारे हे मस्तवाल महाशय फक्त आणि फक्त सतत दरदिवशी दरक्षणी ज्या वृत्तपत्र मालकाने त्याला विनापगारी नोकरीत ठेवले आहे त्या मालकांसाठी आणि स्वतःसाठी हे नकली पत्रकार दरदिवशी विशेषतः मंत्रालयात सत्तेच्या राजकीय परिघात दलाली करतात, ते आणि त्यांचे काही प्रतिष्ठित पत्रकार मित्र करोडो रुपयांची कामे करवून घेतात हीच वस्तुस्थिती आहे…
पुन्हा एकदा सांगतो कि अस्थिर असलेल्या मीडिया जगतात थोडेफार फायदे घेणे मला अजिबात चुकीचे वाटत नाही आम्ही देखील आमचे व्यवसाय करतांना चिमूटभर फायदे नक्की नेहमी उकळतो पण जास्तीत जास्त वेळ केवळ पत्रकारितेसाठी घालवतो मात्र सतत पत्रकारितेच्या नावाखाली लुबाडणूक फसवणूक आणि दलाली करणे केव्हाही वाईट जे अनेकांच्या हातून घडते आहे त्याला आळा जे सच्ची पत्रकारिता करतात तेच घालू शकतात त्यांनी आळा घालावा. रखेल पद्धतीचे मालकांनी ठेवलेले आणि स्वतःला विकणारे त्यातून आर्थिक फायदे उकलणार जे मीडियातले अनेक शासन दरबारी सतत वावरतांना दिसतात त्यांना जाब विचारणे सच्च्या पत्रकाराचे ते काम आहे, असे अनेक बिलंदर महाभाग मीडियाच्या नावाने दहशत निर्माण करून गैरफ़ायदे घेताहेत…
तूर्त एवढेच : पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी