कोकणात बारकाईने लक्ष,
समस्त नेत्यांनी असावे दक्ष :
कुडाळ मालवण विधान सभा मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार निलेश नारायण राणे यांच्यासारखी चित्रविचित्र अवस्था राज्यातल्या एकही आमदाराची नाही, एखाद्या नवविवाहितेचा लग्नाआधीचा प्रियकर नेमका तिच्या लग्नानंतर योगायोगाने फारतर भिंती पलीकडे राहायला यावा आणि तिचे व तिच्या नवोदित नवऱ्याचे बोलणे त्याला रात्रीच्या भीषण शांततेत जसेच्या तसे ऐकायला यावे नेमके हे असे आमदार निलेश राणे यांचे झाले आहे म्हणजे सख्खा भाऊ आणि पिताश्री भाजपाचे मान्यवर त्यात डॉ नितेश नेमके फडणवीस शिंदे मंत्रिमंडळात आणि हे महाशय एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून निवडून आलेले विद्यमान आमदार, त्यामुळे अमुक एखाद्या महत्वाच्या मुद्दयांवर जर नितेश आणि नारायणरावांना आपापसात बोलायचे झाल्यास ते दोघेही निलेश यांना एकट्याला सोडून आतल्या खोलीत निघून जातात आणि निलेश यांना त्यांच्या बोलण्यातला एकही शब्द कळणार नाही समजणार नाही याची काळजी घेतात तेवढ्यात जर नितेश यांना भेटायला त्यांच्या पक्षाचा एखादा नेता आला तर नारायणराव व नितेश लगेच आतल्या खोलीत निघून जातात. एकाच घरात राहून एकमेकांपासून सारे काही लपवून ठेवायचे म्हणजे नोकरीनिमित्ते घरी राहणाऱ्या मेहुणीचे प्रेम संबंध खुबीने बायकोपासून लपवून ठेवण्यासारखे. एकाचवेळी यावेळी शिंदे आणि फडणवीस दोघांनाही काहीही करून आपापले पक्ष अख्य्या कोकणात बळकट ताकदवान अधिक बलवान करायचे आहेत आणि त्या दोघांचीही भिस्त कोणावर तर एकाच घरात राहणाऱ्या पण वेगवेगळ्या पक्षात असणाऱ्या कुटुंब सदस्यांवर…
www.vikrantjoshi.com
विधान सभा निवडणुकांआधी संपूर्ण कोकणात अर्थातच वर्षानुवर्षे फार मोठे वर्चस्व होते बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या शिवसेनेचे, ज्यांनी बाळासाहेबांच्या हयातीत नेतृत्वाखाली संपूर्ण कोकणात शिवसेना खर्या अर्थाने वाढविली मोठी केली त्यात नक्कीच अग्रक्रमी नारायणराव राणे हेच होते पण पुढे ते शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर देखील सेनेला मोठे भगदाड पडले असे अजिबात घडले नाही म्हणजे राणेंच्या टापूत त्यांचा दबदबा होता आजही आहे किंवा आज हा दबदबा जरासा अधिक वाढला आहे पण त्यांच्या बाहेर पडण्याने फारसा फरक विशेषतः उद्धव यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना काम करायला लागल्यानंतर देखील पडला नव्हता पडला नाही, रामदास कदम भास्कर जाधव राजन साळवी दीपक केसरकर पद्धतीच्या असंख्य नेत्यांनी सतत शिवसेनेची राजकीय ज्योत तेवत ठेवली पण हल्ली हल्ली जे घडले तो ताजा इतिहास आहे, एकनाथ शिंदे आणि कोकणातले सर्दच ताकदवान नेते उद्धवपासून वेगळे झाले आणि कोकणात आजच्या तारखेला उद्धव सेनेची ताकद औषधापुरती उरली आहे. नाही म्हणायला शरद पवार आणि शेकाप यांचा देखील जोर कोकणात होता, आज हे सारेच त्या कोकणात शरीरावरच्या तिळाएवढे उरले आहेत, अख्य्या कोकणात ज्या वेगाने भाजपा आणि शिंदे सेनेने कार्य विस्तारले आहे, दुर्दैवाने जर त्याच दोघांनी आपापसात स्पर्धा ठेवली तर त्याचे परिणाम नक्की वादात होऊन मोठा फटका त्या दोघांनाही विनाकारण बसेल. पण त्या दोघातली सध्याची महायुती आणि निकोप स्पर्धा, फडणवीसांची समंजस भूमिका आणि एकनाथ शिंदे यांची दिलदार वृत्ती आणि थेट मोदी यांच्याशी असलेली जवळीक, शरद पवार शेकाप आणि उद्धव ठाकरे या तिघांना हात चोळत बसण्यापलीकडे आजतरी कोकणात काहीही काम उरलेले नाही…
कोकणच्या बाबतीत अजितदादांच्या राष्ट्रवादीचे भारत श्रीलंकेच्या नकाशासारखे आहे म्हणजे भारताच्या नकाशाखाली श्रीलंकेचे छोटेसे बेट दाखविल्या जाते त्याला आम्ही वर्हाडी लेंडूक म्हणतो, अजितदादांच्या राष्ट्रवादीचे देखील तेच, रायगड जिल्हा तेवढा माझ्या लाडक्या तटकरे साठी सोडा वाटल्यास अख्खा कोकण ताब्यात घ्या त्यांचे हे एवढे शिंदे फडणवीसांना सांगणे, मात्र रायगड जिल्ह्या पलीकडे वेळ काढून तटकरे यांनी यावेळी तरी पक्ष वाढीकडे लक्ष द्यावे…
आता पुन्हा एक गुपित उघड करतो. आपले राजकीय महत्व आणि वर्चस्व अबाधित ठेवण्या साठी एकनाथ आणि डॉ श्रीकांत शिंदे दोघांनीही ठाण्याव्यतिरिक्त राज्यात सर्वत्र पक्षाची ताकद वाढविण्याचे नक्की केले आहे ज्यात काहीही वाईट नाही, शिवसेना वाढविण्याची सुरुवात त्यांना बाळासाहेब पद्धतीने कोकणातून करायची असल्याने त्यांची मोठी भिस्त ज्या चौघांवर आहे त्यातले एक मंत्री योगेश कदम दुसरे आहेत आमदार निलेश राणे आणि उरलेले महत्वाचे दोघे आहेत रत्नगिरीतले सख्खे बंधू नामदार उदय सामंत आणि आमदार किरण सामंत. उदय सामंत यांच्याकडे अख्य्या कोकणचे नेतृत्व सोपविण्यात आलेले असून त्यांच्या नेतृत्वाखाली इतर समस्त नेत्यांनी आपण सिनियर उदय जुनियर असा कुठलाही मानापमानाचा आडपडदा न ठेवता एकदिलाने काम करण्याच्या सख्त सूचना एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आहेत, पुढल्या काही दिवसात उदय सामंत यांच्या गळाला उद्धवसेनेचे उरलेसुरले ताकदवान नेते लागल्यास अजिबात आश्चर्य नवल वाटून घडू नये ते घडवून आणण्याची केवळ तारीख जाहीर करणे तेवढे बाकी आहे. किरण सामंत योगेश कदम आणि निलेश राणे या नव्या दमाच्या तिन्ही नेत्यांनी उदय सामंत यांच्याच नेतृत्वाखाली कोकणात शिंदेसेना भरभक्कम करावी हे एकनाथ यांनी अगदी निक्षून या तिघांना सांगितले असल्याची माझी पक्की माहिती आहे. राजकीय दृष्ट्या कोकण लवकरच पूर्णतः बदलतो आहे हेच नेमके सत्य आहे…
तूर्त एवढेच : पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी