सुधीरभाऊ सभोवताली तात्पुरता फास,
कि मुनगंटीवारांचा कायम खेळ खल्लास :
राजकीय प्रवाहात आपण काही काळ फारतर पक्षश्रेष्ठींना किंवा आपल्या नेत्याला अंधारात ठेवून मनासारखा कार्यभाग उरकू शकतो पण लबाड राजकारणाला मर्यादा असतात, एकदा का अमुक एखाद्या नेत्याची काम करण्याची धूर्त खेळी स्वार्थी वृत्ती श्रेष्ठींच्या लक्षात आली कि तमुक एखाद्या शक्तिशाली नेत्याचे महत्व देखील क्षणार्धात संपते त्यानंतर हात चोळत बसण्यापलीकडे हाती काहीही उरलेले नसते. माझ्या आवडत्या नेत्यांपैकी एक सुधीर मुनगंटीवार पण त्यांचेही तेच, ऐकण्या सांगण्या पलीकडे त्यांचा सततचा फाजील उथळ आत्मविश्वास एकेकाळी जसा पंकजा मुंडे एकनाथ खडसे इत्यादींना नडला तोच आज सुधीर मुनगंटीवार यांना त्यांची जागा दाखवून गेला. पंकजा जशा लगेच भानावर आल्या त्यामुळे त्यांचा खडसे न होता पुन्हा एकवार सत्तेतला भाव वधारला, फडणवीसांचे पंकजा यांनी ऐकायला सुरवात केली फडणवीसांनी आधी अख्खे मुंडे कुटुंब बांधले जवळ आणले त्यानंतर एकाचवेळी दोघा बहीण भावंडांना एकत्र मंत्रिमंडळात स्थान देत वेगळा इतिहास रचला, सतत काहीतरी सकारात्मक वेगळे करून दाखविण्याचा फडणवीसांचा तो जुना स्वभाव आहे जे राजकारणात क्वचित आढळते म्हणून तर तिकडे साताऱ्यातले शिवबाचे वंशज देखील फडणवीसांवर जाम फिदा आणि खुश आहेत. मुनगंटीवार यांनी निदान किमान एकदा कोणतीही दुटप्पी भूमिका न घेता तावडे नव्हे पंकजा पद्धतीने फडणवीसांना मनापासून बिलगावे त्यांचे ऐकावे मनाचे न करावे बघा त्यांना देखील हि राजकीय आपत्ती पुढली सुवर्णसंधी होती हे लक्षात येईल. भलेही मला मंत्री करू नका पण सुधीरभाऊंना देखील दूर ठेवा, आमदार बंटी भांगडीयांच्या या हट्टाला त्यांच्या श्रेष्ठींनी हिरवी झेंडी दाखविली म्हणून मुनगंटीवार यांचे मंत्रिपद हुकले हि केवळ अफवा कदाचित ती भांगडिया समर्थकांनी आमदारांचे महत्व वाढविण्यासाठी आपणहून पसरविली असावी कारण भांगडीयांच्या सांगण्यावरून मुनगंटीवारांचे मंत्रिपद हुकले, भाजपा श्रेष्ठी निर्णय घेतांना एवढे तकलादू असणे दूरदूरपर्यंत शक्य नाही, सुधीरभाऊंनी सततच्या लबाड उथळ भूमिकेतून आपले महत्व असे कमी करून घेतले ज्याला अनेक विविध वादग्रस्त संशयास्पद कधी आर्थिक तर कधी राजकीय कंगोरे आहेत जेथे ते मला तोंडपाठ आहेत, फडणवीसांकडे तर गृहखाते आणि तल्लख बुद्धिमत्ताही आहे…
क्रमश: पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी