जिल्ह्यात नाराजी राज्यात फजिती,
शिवाजीच्या घराण्यातला संभाजी :
माजी मंत्री भाजपा महायुतीचे विद्यमान आमदार माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे नातू माजी आमदार दिलीप पाटील निलंगेकर आणि माजी खासदार रूपाताई पाटील निलंगेकर यांचे सुपुत्र असूनही संभाजी पाटलांचा लातूर जिल्हा किंवा मराठवाड्याच्या राजकीय वर्तुळात थेट शरद पवार झाला आहे जसे एकेकाळी शरद पवार थेट पंतप्रधान पदाच्या शर्यतीत होते, केंद्रीय मंत्री असतांना दिल्लीत व्यवस्थित ते रमले असते तर नक्कीच एक दिवस पंतप्रधान झाले असते पण त्यांचेही माझ्या ओळखीच्या एका किराणा दुकानदारासारखे झाले, दुकानदाराचे लग्न झाल्यानंतर तो दुकानात कमी, दिवसा ढवळ्या देखील झोपायची खोली बंद करून पलंगाचा आखाडा करून सोडायचा, तिकडे नोकराने त्याचे जसे दिवाळे काढले तेच पवारांचे आणि संभाजी निलंगेकरांचे झाले, उठसुठ पवार मुंबईत बसून राहायचे देश सोडून राज्याच्या राजकारणात रमायचे त्यामुळे पंतप्रधान होणे उणे झाले. तेच संभाजी पाटलांचे, वास्तविक फडणवीसांनी त्यांना यासाठी सुरुवातीला मंत्री केले किंवा सतत आजतागायत मोठी राजकीय ताकद दिली कि त्यांनी उभ्या मराठवाड्याचे नेतृत्व करावे, भाजपाची मराठवाड्यात चौफेर ताकद वाढवावी पण निलंगेकर उरले लातूर जिल्ह्यापुरते तेही भाजपाचे वाटोळे करण्यासाठी म्हणजे लोकसभा पद्धतीने विधानसभेला देखील महायुतीचा त्यांच्याव्यतिरिक्त एकही आमदार निवडून न येण्यासाठी त्यांचे पक्षविरोधी डावपेच त्यांच्याच अंगलट जरी आले तरी त्यांच्या या मतलबी भूमिकेमुळे फडणवीसांना लातूर किंवा मराठवाड्यात जी मोठी झेप घ्यायची होती त्यात बाधा आली, आपण एकमेव निवडून आलो तर मंत्रिपद नक्की चालून येईल हा त्यांचा मनसुबा पण फडणवीसांचे अभिमन्यू पवारांसारखे विश्वासू साथीदार आणि संघाचा अस्वस्थ अहवाल त्यातूनच यावेळी त्यांचे मंत्रिपद हुकले. किमान लोकसभेला त्यांनी सुधाकर शृंगारे यांना निवडून आणले असते तरीही निलंगेकरांचे राजकीय नेतृत्व आणि महत्व नक्की वाढले असते पण दलित शृंगारे यांना निलंगेकर यांनी अगदी ठरवून कसे पराभूत केले त्याचा नेमका अहवाल संघाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी, सुधाकर शृंगारे यांनी स्वतः तसेच भाजपच्या हार्डकोअर नेत्यांनी थेट मोदी शाह आणि फडणवीसांना पाठवून दिला आणि तेथेच संभाजी पाटील निलंगेकर यांचे त्यांच्या पक्षातले स्थान डळमळीत होऊन त्यांना मंत्रिपद नाकारण्यात आले. लातूर जिल्ह्यात जशी मराठ्यांची ताकद मोठी त्याच तोडीचे दलित आणि लिंगायत समाज, पण या दोन्ही समाजाच्या विरोधात निलंगेकरांची भूमिका असते असा त्यांच्यावर उघड आरोप होतो जो या दिवसात महायुतीला नेमका त्रासदायक ठरत आलाय किंबहुना त्यांच्याविषयीची असलेली तीव्र नाराजी, विधानसभेला निलंगेकर कसेबसे काठावर पास झाले. वास्तविक निलंगेकर घराण्याचा राजकीय वारसा, मन मोठे ठेवल्यास आजोबांपेक्षा काकणभर सरस उत्तम नेतृत्व करण्याची मोठी क्षमता पण बिनभरंवशाच्या वृत्तीतून निलंगेकर एकाचवेळी भाजपा आणि स्वतःचे मोठे राजकीय नुकसान करवून घेताहेत हीच वस्तुस्थिती आहे. चार चार वेळा निवडून येऊनही विचार फक्त आपल्या राजकीय अस्तित्वाचा, नावात संभाजी आणि आजोबा शिवाजी असूनही निलंगेकर लातूर जिल्ह्यातल्या हिंदुत्वालाच खतरेमें आणताहेत…
www.vikrantjoshi.com
माजी खासदार सुधाकर शृंगारे किंवा विश्व्जीत अनिल गायकवाड यांची लातूर जिल्ह्यात विशेषतः दलितांमध्ये मोठी लोकप्रियता आहे पण त्यांचा निलंगेकरांकडून सततचा होणार राजकीय छळवाद, मोठ्या खुबीने अगदी सहज निवडून येण्याची क्षमता असणाऱ्या विश्व्जीत गायकवाड यांना महायुतीची उमेदवारी न मिळू देणे, शेवटी या राजकीय सासुरवासाला कंटाळून ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शृंगारे यांनी अगदी उघड निलंगेकर यांच्या नावाने कडाकडा बोटे मोडत ते महायुतीमधून बाहेर पडले. वास्तविक फडणवीसांनी थेट मराठवाड्यात देखील नव्या पिढीला मोठी राजकीय ताकद देत शरद पवार उद्धव ठाकरे यांचे आत्ता आत्ता पर्यंत मराठवाड्यात असलेले महत्व पुसून टाकण्याचे नक्की केले आहे अशावेळी जर संभाजी निलंगेकर यांनी फडणवीसांचा मोठा विश्वास संपादन केला असता तर सत्तेच्या राजकारणात संभाजी कदाचित आजोबांच्या पुढे निघून गेले असते त्याऐवजी भाजपातल्या फडणवीसांच्या तावडे पद्धतीच्या अंतर्गत विरोधकांशी सततचा संबंध वरून लातूर जिल्ह्यातील संघ भाजपाला खिळखिळे करण्याचा त्यांचा सततचा प्रयत्न, निलंगेकरांचे हे असे चंचल वागणे त्यांना स्वतःला दिवसेंदिवस अधिक अडचणीचे नक्की ठरू शकते…
तूर्त एवढेच : पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी