उतावीळ आमदार गुढग्याला बाशिंग :
अनेकदा माझ्याकडल्या विवाह समारंभात ज्यांचा माझ्याशी दूरदूरपर्यंत संबंध नाही असे काही आगंतुक त्या थ्री इडियट सिनेमातल्या तिघा मित्रांसारखे अगदी नटूनथटून जेवायला येतात, यथेच्छ ताव मारून आल्या पावली निघूनही जातात, मी त्यांना कधीही हाकलून लावत नाही कारण चार दोन ताटे वाढल्याने मला काहीही फरक पडत नाही. 15 डिसेंबर रविवारच्या नागपुरातील देवेंद्र फडणवीसांच्या स्वागत शोभा यात्रेतून मला एका अतिशय जबाबदार नेत्याचा फोन आला कि भाऊ ज्याचा आजच्या या शोभा यात्रेशी दूरदूरपर्यंत काडीचाही संबंध नाही ते तुमच्या जळगाव जामोदचे आमदार डॉ संजय कुटे गॉगल घालून एखाद्या हिरोसासारखे उगाच फडणवीसांच्या बाजूला उभे आहेत आणि आमच्या नागपुरातल्या नेत्यांना कुठेतरी कोपऱ्यात उभे राहावे लागते आहे, वास्तविक आजच्या शोभा यात्रेत आमच्या नेत्यांना देवभाऊसंगे मिरवायचे आहे, कुटेंना आम्ही खाली उतरवू का, त्यावर मी त्यांना माझ्या कडे जेवणार्या आगंतुकांचे उदाहरण दिले त्यांनी त्यानंतर आलेला राग मनातल्या मनात गिळला. वास्तविक जेथे आपला संबंध नाही तेथे डोळा मारू नये हे डॉ कुटे यांना समजायला हवे होते, त्यांना मंत्रिपद न मिळाल्याने त्यांच्या या केविलवाण्या धडपडीचे मलाही वाईट वाटले. दुखावलेल्या सहकार्याला अधिक का दुखवावे म्हणून फाडावीसांनी देखील त्यांच्या शेजारी उभे राहणाऱ्या आमदार कुटे यांना नाराज केले नसावे, खाली उतरविले नाही. मनातून इच्छा असूनही फडणवीसांनी ऐनवेळी आपल्या या बऱ्यापैकी लाडक्या सवंगड्याला मंत्रिपद दिले नाही हि वस्तुस्थिती आहे मात्र शपथविधीचा सोहळा जवळ येईपर्यंत उगाचच डॉ कुटे आणि त्यांची अति उत्साही पिल्लावळ मंत्री होणारच त्यावर एवढे ठाम होते कि त्या उत्साहाच्या भरात जळगाव जामोद मतदार संघात आणि सोशल मीडियावर त्यांच्या स्वागताचे, अभिनंदनाचे विविध बॅनर्स झळकले होते जे चुकीचे झाले ठरले कारण जोपर्यंत डोक्यावर अक्षता पडत नाहीत तोपर्यंत लग्नाचे आणि राजकारणाचे काहीही खरे नसते ज्याचा अनुभव नेमका देवेंद्र फडणवीसांना देखील भोगावा लागला आहे. मंत्रिपद मिळाले नाही म्हणजे सारे काही संपले असे नसते संजूभाऊ, आपण नेमके का वगळल्या गेलो किंवा नक्की कुठे चुकलो त्यावर विचारमंथन करा आणि त्यापद्धतीने मार्ग बदला, नक्की चांगले दिवस येतील, माझे तुम्हाला आशीर्वाद आहेत आणि माझ्या जिभेवर तीळ आहे…
www.vikrantjoshi.com
डॉ संजय कुटे यांना ऐनवेळी का वगळण्यात आले त्यावर माझी माहिती अशी कि बुलढाणा आणि अकोला जिल्ह्यातले महायुतीच्या समस्त आमदारांनी खासदारांनी फडणवीसांना सांगितले कि मंत्रिपदाची माळ कोणाच्याही गळ्यात, केवळ ती डॉ संजय कुटे यांच्या गळ्यात पडायला नको, फडणवीसांना अतिशय जवळचे मलकापूरचे आमदार चैनसुख संचेती आणि त्यांचा भाजपाचा बऱ्यापैकी प्रभावी पुतण्या अजय संचेती जो फडणवीसांचा मित्र मंडळीतील एक, या काका पुतण्याने देखील निक्षून सांगितले कि काहीही झाले तरी डॉ कुटे आम्हाला मंत्री म्हणून नकोसे, असा हा प्रचंड उघड विरोध डॉ कुटे यांचे नाव मग नाईलाजाने मागे पडले. दुसरा अत्यंत महत्वाचा मुद्दा अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यातल्या भाजपाला विधान सभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मतदान करणाऱ्या मराठा कुणबी समाजाचा, ज्या समाजावर डॉ कुटे यांचा अजिबात प्रभाव नाही त्याऐवजी फुंडकर सावरकर धोत्रे या आमदार खासदार मंडळींचे मोठे वर्चस्व असल्याने आणि आकाश फुंडकर हे वडील भाऊसाहेब फुंडकर यांच्या पश्चात सतत तीनवेळा निवडून आल्याने या मराठा कुणबी समाजाची पसंती म्हणून आकाश फुंडकर यांना ऐन तारुण्यात थेट कॅबिनेट मंत्री करण्यात आले. अर्थात एकेकाळी भाऊसाहेब फुंडकर यांचे मंत्रिपद रोखणाऱ्या डॉ कुटे यांचा त्यांच्या मुलाने आकाश यांनी यावेळी हिशेब चुकता केला असेही यादिवसात म्हटले जाते. मला वाटते मंत्रिपद हुकले म्हणजे सारे संपले असे राजकारणात नसते. आपल्याशी लॉयल्टी ठेवणाऱ्याला फडणवीस कधीही एकाकी सोडणार नाहीत ते कुटे यांच्या वियोगाची दुप्पटीने भर काढून मोकळे होतील. तूर्तास कुटे यांनी भावनेच्या भरात नको त्या चुका टाळणे केव्हाही चांगले…
तूर्त एवढेच : पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी