हे नेमके निवडून येतील ते नक्की पराभूत होतील :
जसे नवपरिणीत जोडप्याला काही बारकावे पाठ हवेत म्हणजे लग्नाआधीचे प्रेमप्रकरण उघड न करणे, कितीवेळा कुठे कुठे लपून काय काय केले हे न सांगणे तसे राजकीय बारकावे तुम्ही वाचकांनी देखील माझ्या लिखाणातून ध्यानात ठेवावेत. बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद विधानसभा मतदार संघ नेमका कसा आणि कुठे आहे हे विदर्भ वगळता इतरांना फारसा माहित नसेल पण हा मतदार संघ तुम्हाला यासाठी पाठ असायला हवा कारण जळगाव जामोद माझी जन्मभूमी आहे आणि 2004 ते आजतागायत तेथून माजी मंत्री भाजपाचे संजय कुटे कायम सतत लागोपाठ चार वेळा निवडून आले आहेत, बहुदा जे सत्तेतल्या प्रमुख नेत्यांचे निकटवर्तीय असतात ते त्याचा हमखास फायदा नव्हे तर गैरफायदा घेतात पण हेच संजय कुटे ज्या देवेंद्र फडणवीसांचे उजवे फारतर डावे हात समजले जातात आपण त्यांना उजवा हात समजूया कारण डाव्या हाताचा उपयोग ढुंगण धुण्यासाठी केल्या जातो, त्या फडणवीसांचा ज्या ज्या नेत्यांनी सातत्याने सकारात्मक उपयोग करवून घेतला त्यातले प्रमुख संजय कुटे म्हणजे संजय कुटे यांनी ज्या ज्या विकासकामांच्या योजना त्यांच्यासमोर मांडल्या फडणवीसांनी त्या लगेच मंजूर केल्या आणि कुटे यांनी योजना प्रत्यक्षात उतरविल्या कधी नव्हे ते माझ्या या गावाचा या मतदार संघाचा त्यांनी आमूलाग्र कायापालट केला त्यांच्या आधी झालेल्या एकही आमदाराने व्यक्तिगत भल्यापलीकडे काहीही कधीही केलेले नाही. कधी दिवंगत श्रद्धा टापरे तर कधी कृष्णराव इंगळे आमदार होते त्यांनी केवळ आपले कुटुंब श्रीमंत केले म्हणजे कृष्णराव यांनी दोन्ही लेकींना मोठे केले फारतर शेतात जाऊन त्यांनी पत्ते कुटले पण या मतदार संघाचा खर्या अर्थाने विकास केला तो एकमेव संजय कुटे यांनी म्हणून ते जसे आजतागायत चार वेळा सतत आमदार झाले त्याची बक्षिसी म्हणून इतिहासात पहिल्यांदा याच फडणवीसांनी त्यांना मंत्री देखील केले होते, अर्थात यावेळी देखील हेच भाजपा महायुतीचे संजय कुटे आमदार होतील, नक्की निवडून येतील, नोंद करून ठेवा…
www.vikrantjoshi.com
आता जळगाव जिल्ह्याकडे वळूया त्याआधी जोरजोरात टाळ्या पिटुया कारण राज्याच्या राजकरणातले दोन महत्वाचे नेते किंवा मोहरे, त्यातले एक गिरीश महाजन यांना त्यांच्या जामनेर विधानसभा मतदारांनी आणि कट्टर शत्रू एकनाथ खडसे यांनी तर एकनाथ खडसे यांना त्यांच्या सुनेने भाजपच्या केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी या महत्वाच्या दिवसात त्या त्या त्यांच्या मतदार संघात पार जखडून ठेवले आहे अन्यथा फडणवीसांचा संकटमोचक किंवा हनुमान म्हणजे गिरीश महाजन पण यावेळी का कोण जाणे त्यांना पराभूत करण्या एकनाथ खडसे यांनी नेहमीप्रमाणे कंबर कसली आहे तरीही गिरीश महाजन नेमके नक्की निवडून येतील पण मताधिक्य कदाचित यावेळी कमी असेल, माझी हि दोन्ही वाक्ये तुम्ही आजच गोंदवून घ्या. एकनाथ खडसे यांचा सारा जीव यावेळी त्यांच्या लेकीच्या म्हणजे रोहिणी खडसे मध्ये अडकला आहे त्या शरदरावांच्या राष्ट्रवादी तर्फे विद्यमान आमदार चंद्रकांत पाटलांविरोधात यावेळीही विधानसभा लढवताहेत पुन्हा पराभूत होण्यासाठी. वास्तविक शरद पवारांना किंवा आपणा सर्वानाच माहित आहे कि अगदी आत्ता आता पर्यंत त्या पवारांना धोका देत याच खडसेंना भाजपा प्रवेशाचा मोका साधायचा होता त्यासाठी त्यांनी विशेषतः विनोद तावडे आणि नितीन गडकरी दोघांमार्फत जिकिरीचे प्रयत्न जेव्हा सुरु केले इकडे तेव्हा हेच शरद पवार खडसेंच्या या धरसोड वृत्तीवर रुसले फुगले होते पण रक्षा खडसे केंद्रात मंत्री त्याचवेळी जर एकनाथ खडसे यांना पुन्हा भाजपात घेतले तर ते 2014 पद्धतीने महाजन व फडणवीसांना खाष्ट सासूसारखे सतत दिनरात छळतील हे उघड होते म्हणून खडसे यांचा हा डाव त्या दोघांनी यशस्वी होऊ दिला नाही त्यामुळे दातओठ खात आणि अजिबात इच्छा नसतांना ते राष्ट्रवादीतच उरले कामापुरते, शरदरावांचे असे आहे कि त्यांना जर या दिवसात एखाद्या नेत्याने कडेवर बसू का विचारले तर शरद पवार लगेच विचारणाऱ्याला डोक्यावर घेऊन नाचतील. तिकडे जामनेर मतदार संघात यावेळी कुण्या दिलीप खोडपे या स्थानिक नेत्याने बऱ्यापैकी महाजनांसमोर आव्हान उभे केलेले असल्याने विकासकामांची गंगा मतदार संघात ओतूनही गिरीश महाजन यांना जिल्ह्याबाहेर तोंड काढणे तसे कठीण होऊन बसले आहे, खडसेंची ते आणि रक्षा खडसे स्वतः नक्की जिरवतील कारण नणंद रोहिणी यांची सततची विरोधी भूमिका तीही आपल्या ऐन तारुण्यात विधवा झालेल्या वहिनीला, त्यातून रक्षा खडसे यांच्या डोक्यात रोहिणी खडसे गेल्या आहेत…
कोणाचे देऊळ पाण्यात कोण पराभूत होणार आणि कोण हमखास निवडून येणार आहे हे सांगायला मी केव्हाच सुरुवात केली आहे आणि ज्यांची जशी नावे मी जाहीर करेल त्याची नोंद घेण्याची सर्वस्वी जबाबदारी तुमची. फार मोठे आश्चर्य म्हणजे विधानसभा निवडणूक लागण्यापूर्वी महाराष्ट्रातले समस्त सरकारी अधिकारी आणि कर्मचारी जे पूर्णतः महायुती विरोधात होते महायुती पराभूत होणार सांगत होते त्या समस्त सरकारी नोकरदारांचे अचानक का आणि कसे मनपरिवर्तन झाले मला नेमके उमगलेले नाही पण आता तेच महाराष्ट्राच्या संपूर्ण कानाकोपऱ्यातले समस्त सरकारी नोकरदार आपणहून यादिवसात मोठ्या खुबीने महायुतीचा प्रचार तर करताहेतच शिवाय महायुती सत्तेत नक्की येईल असे ज्याला त्याला प्रत्येकाला सांगत सुटले आहेत. दाढीवाले शिंदे सांगा कि कोणत्या बाबाची जडीबुटी तुम्ही त्यांच्यावर शिंपडली आहे. याच जळगाव जिल्ह्यातले महायुतीचे जे उमेदवार हमखास आमदार होणार आहेत त्यापैकी एक असतील जळगावचे राजूमामा भोळे दुसरे भुसावळचे संजय सावकारे आणि तिसरे चोपड्याचे चंद्रकांत सोनावणे आणि ते किंवा महायुतीचे अन्य उमेदवार का व कसे निवडून येतील त्यावर मी पुन्हा एकवार तुम्हाला नेमके आणि नक्की सांगणार आहे…
तूर्त एवढेच : पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी