फोडतो गुपिते, फडणवीस आणि
एकनाथ शिंदेंचे :
मांजर आडवी गेली किंवा कावळा डोक्यावर बसला तर आपण अशुभ समजतो किंवा मध्यरात्री कुत्री रडायला लागलीत, उंबरठ्यावर शिंकलो, रेडा पादला, एखाद्याने महत्वाच्या कामाला जाताना हटकले तरीही आपण अशुभ समजतो, अलीकडे चार दिवस माझ्या मुलास विक्रांतला अन्न अजिबात गोड लागत नव्हते, असे का मी विचारले तो म्हणाला, मी फडणवीसांना भेटायला गेलो होतो तेव्हा त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला म्हणून अन्न गोड लागत नाही, वाचकहो, शरद पवार, देवेंद्र फडणवीस या दोघांपकी जर एखाद्याने तुमच्या खांदयावर हात ठेवला कि समजायचे तुमची उलटी गिनती सुरु झाली आहे, कदाचित तुम्हाला माहित नसेल पण उद्धव ठाकरे यांनी महाआघाडीशी जुळवून घेताच त्यानंतर किमान 8-10 वेळा जेव्हा थेट शरद पवारांनी उद्धवजींच्या खांद्यावर तोही प्रेमाने हात फिरविला तेव्हाच मी जवळच्या मित्रांना सांगून टाकले सांगून टाकले कि यापुढे ठाकरे आणि त्यांच्या सेनेचे काही खरे नाही, पुढे नेमके तेच झपाट्याने घडले आहे घडते आहे, खांद्यावर हात ठेवणाऱ्या शरद पवार यांनी यादिवसात उद्धव ठाकरे यांचा पार भारत भूषण करून ठेवला आहे म्हणजे याच उद्धव यांच्या जिवंतपणी त्यांना उघड्या डोळ्याने एकाचवेळी सुवर्णकाळ आणि सूर्यास्त नेमका बघण्याचे दुर्दैव त्यांच्यावर ओढवले आहे. ज्या व्यक्तीला एकनाथ शिंदे दारापर्यंत सोडायला येतात त्याने ओळखावे कि त्यांनी दारापर्यंत सोडले आहे म्हणजे शिंदेंच्या मनातून आपण उतरलो आहे, सारे काही संपले आहे. एकनाथ शिंदे जेव्हा केव्हा अजितदादा त्यांना भेटायला जातात तेव्हा तेव्हा एकनाथजी त्यांना हमखास दारापर्यंत सोडायला येतात. अजितदादांना उचंबळून येते पण एकनाथजी गालातल्या गालात हसत असतात. एकदा ते असेच राधेश्याम मोपलवार यांना दारापर्यंत सोडायला आले, दुसरेच दिवशी मोपलवार कायमस्वरूपी समृद्धीतून पायउतार होत घरी बसले…
www.vikrantjoshi.com
जे इतरांना अजिबात माहित नाही ते तुम्हाला येथे आज सांगून टाकतो. तुम्हाला धर्मेंद्रचा एक सिनेमा ‘ गजब ‘ आठवतो का त्यात त्याचा डबल रोल आहे एका धर्मेंद्रच्या इच्छा पूर्ण होण्याच्या आतच त्याचा खून करण्यात येतो त्यानंतर त्याचा मृत आत्मा दुसऱ्या धर्मेंद्रच्या शरीरात शिरून तो आपल्या सार्या अपूर्ण इच्छा जिवंत असलेल्या डॅशिंग धर्मेन्द्रमार्फत पूर्ण करवतो, हेच नेमके आणि नक्की घडते आहे एकनाथ शिंदे बाबत, आनंद दिघे यांचा ज्या मुद्द्यांवर विशेषतः मातोश्रीकडून सतत कायम पदोपदी अतोनात छळ आणि सतत अपमान करण्यात आला किंवा सिनेमातल्या धर्मेंद्रसारखा जर त्यांचाही खून झाला असेल तर हे नक्की आहे एकनाथ शिंदे यांचा देवबाप्पा दिवंगत आनंद दिघे आपल्या या पराक्रमी आणि पुरून उरणाऱ्या लाडक्या शिष्यामार्फत सार्या अपुऱ्या इच्छा आकांक्षा पूर्ण करून घेतो आहे वरून ज्यांनी दिघेंना छळले त्या साऱ्यांचा हिंदी सिनेमातल्या हिरोसारखे एकनाथजी बदला घेताहेत. ज्या पद्धतीने मातोश्रीवरून विशेषतः उद्धव ठाकरे यांच्या सूचनेवरून सांगण्यावरून एकाचवेळी अनेक विषारी बाण त्या आनंद दिघे यांच्यावर सोडले जायचे आणि ते चुकवितांना अखेरच्या श्वासापर्यंत आनंद दिघे यांची जी दमछाक व्हायची झाली त्या प्रत्येक घट्नेचे वाईट प्रसंगाचे एक प्रमुख साक्षीदार एकमेव एकनाथ शिंदे कारण ते आनंद दिघे यांचा समवेत सावलीसारखे वावरायचे असायचे त्यावेळी दातओठ खाण्यापलीकडे त्यांच्या हातात फारसे काही नव्हते, दिघेंच्या हत्येनंतर मात्र अतिशय थंड डोक्याने एकनाथ शिंदे यांनी दिघेंना छळणार्या प्रत्येकाचा चुन चुन के बदला घेतला आहे बदला घेताहेत नेमके हे जर सत्य नसेल तर मला सांगावे, मी याक्षणी सन्यास घेऊन हिमालयात निघून जाईन…
आणखी एक गुपित येथे उघड करतोय. तुम्हाला हे सांगून कदाचित आश्चर्य वाटेल कि एकनाथ शिंदे, अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस या तिघांमध्ये यादिवसात कमालीचे सख्य निर्माण झाले आहे, हे खरे आहे कि सुरुवातीला मुख्यमंत्री झाल्यानंतर काही महिने शिंदे त्या देवेंद्र यांना डॉमिनेट करण्याचा प्रयत्न करायचे किंबहुना अजितदादा व शिंदे यांच्यात तर आत्ताआता पर्यंत फारसे सख्य अजिबात नव्हते, लहान मूल घरात आले कि आधीचे मूल जसे त्याला हिडीस फिडीस करते तेच शिंदे यांचेअजितदादांबाबत झाले होते पण एकमेकात संशय आणि दुरावा त्यातून महायुतीचे मोठे नुकसान होईल हे फडणवीसांच्या लगेच लक्षात आल्याने त्यांनी या दोघांना आधी विश्वासात घेतले त्यानंतर तिघेही एकट्यानेच आपापसात बसून चर्चा करीत आपापसातले गैरसमज त्यांनी दूर केले त्यानंतर या निवडणुका लागण्याआधी काही महिने हे तिघेही एवढे एकत्र आले कि त्यांचे एकमेकांशी वागणे बोलणे सख्या भावांपलीकडे असायचे, आहे त्यामुळे यापुढे तिघांपकी कोणीही जरी सत्तेच्या राजकारणात पुढे असला गेला तरी उरलेले दोघे त्याच्या पाठीशी अपेक्षाविरहित उभे असतील. अजितदादा आणि एकनाथजी या दोघा भिन्न विचारांच्या नेत्यांना ज्यापद्धतीने फडणवीसांनी एकत्र आणले त्यावर करावे तेवढे कौतूक कमी. हे तर उघड आहे कि एकनाथ यांच्या डोक्यातून एकाचवेळी अनेक लोकोपयोगी निर्णय घेण्याची कल्पना येते मग त्यांना असे निर्णय जाहीर करण्याची प्रचंड घाई असते, लगेच ते अमुक एखादा निर्णय अजितदादा आणि देवेंद्रजींना कळवतात त्यावर ते दोघे आधी मनसोक्त मनमुराद हसतात त्यानंतर दोघेही एकदम सिरीयस होत शिंदेंच्या निर्णयावार अनुभवातून नेमका विचारविनिमय करून आवश्यक ते फेरफार करून पुन्हा तिघे एकत्र येतात आणि नेमका निर्णय जाहीर करून जनतेच्या टाळ्या घेतात. माझ्या प्रदीर्घ पत्रकारितेत, अशी एकमेकांच्या हातात हात घट्ट पकडून चालणारी युती किंवा महाआघाडी बघितलेली नाही…
तूर्त एवढेच : पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी