आजी माजी मुख्यमंत्री त्यांच्या निवडणुकीतल्या
भानगडी : भाग एक
असे मानतात कि ठाण्यात जे दाढी वाढवितात ते राजकारणात हमखास फार पुढे जातात म्हणून हल्ली हल्ली काही महिला नेत्या देखील नकली दाढी चिटकवून नशीब अजमावण्याच्या तयारीत आहेत. इतरही नेते स्पर्धेत असतांना दरवेळी खाऊ वाटताना ठाण्यात त्या संजय केळकर यांचाच हात पुढे आणि त्यांच्याच हातावर मूठभर इतर साऱ्यांच्या हातावर चिमूटभर खाऊ सतत दाढीवाल्या केळकरांचे असे फाजील लाड आणखी किती पुरवायचे त्यावर ठाणे शहरातसमस्त भाजपा नेते यावेळी त्यांच्या श्रेष्ठींवर चिडले आहेत आणि केळकरांकडे खाऊ का गिळू पद्धतीने बघताहेत, दोनवेळा विधानसभा दोन वेळा विधान परिषद तरीही यावेळी पुन्हा तेच ते केळकर मग आमचा कधी नंबर, ठाण्यातला संदीप लेले पद्धतीचा जो तो नेता त्यांच्या पक्ष श्रेष्ठींना बेंबीच्या देठापासून ओरडून ओरडून विचारतो आहे पण केळकर रुपी हे राजकीय अत्तर पक्षांतर्गत दुर्गंधी पसरवूनही उमेदवारी देणाऱ्या त्यांच्या नेत्यांना हीच दुर्गंधी जर दरवेळी अंगाला लावून घ्यायची असेल तर असंतुष्टांच्या कोल्हेकुईला भाजपा मध्ये तसेही फारसे महत्व नसल्याने पुन्हा एकदा ठाणेकर भाजपा मंडळींवर केळकर यांचा प्रचार करणे त्यांना निवडून आणण्याची पुन्हा मोठी जबाबदारी येऊन पडली आहे, तसेही इच्छा असो किंवा नसो अगदी निरंजन डावखरे यांच्यासहित सारेच नेते संजय केळकर यांना निवडून आण्यासाठी लंगोट कसून निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत. ठाणे शहर भाजपाची अवस्था मोठी विचित्र आहे म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात मंडलिक आडनावाचे एक फार मोठे नेते होते जोपर्यंत त्यांनी त्यांच्या मुलीच्या वयाच्या एका देखण्या तरुणीशी लग्न केले नव्हते तोपर्यंत घरातल्या प्रत्येक कुटुंब सदस्यांच्या शब्दाला मान होता महत्व होते मात्र एक दिवस अचानक याच मंडलिक यांचे डोके जणू फिरले, त्यांच्या एका चावट मित्राने त्यांना सांगितले कि कुटुंब लहान तर सुख महान म्हणून मंडलिक यांनी एका मुलीच्या वयाच्या सुस्वरूप तरुणीशी लग्न केले त्यानंतर मात्र घरातल्या इतर सदस्यांचे जसे महत्व संपले तेच ठाण्यातल्या भाजपाचे, जोपर्यंत निरंजन डावखरे भाजपाबाहेर होते तोपर्यंत मूळ भाजपा नेत्यांना वर अनन्यसाधारण महत्व होते पण निरंजन डावखरे भाजपामध्ये आले आणि इतर गादीवर गच्चीवर निरंजन मात्र टॉप नेत्यांच्या थेट मांडीवर जाऊन बसले खरे पण त्यांचा स्वभाव तसा एवढा सकारात्मक कि ते त्यांच्या श्रेष्ठींच्या जसे डोक्यावर जाऊन बसले नाहीत तसे त्यांनी ठाणेकर भाजपा नेत्यांना कार्यकर्त्यांना देखील कधी हिडीसफिडीस केले नाही, यावेळी देखील निरंजन वसंत डावखरे नाही म्हणायला केळकर यांच्या पाठीशी या निवडणुकीत एक मोठी ताकद म्हणून उभे आहेत…
www.vikrantjoshi.com
वास्तविक ठाणे शहर विधान सभा मतदार संघात एकेकाळी ब्राम्हणांचे महत्व आणि वर्चस्व होते त्यांच्या शब्दाला मान आणि मतांना महत्व होते पण कालांतराने ते कमी होत गेले त्याचवेळी कोकणस्थ मराठ्यांची वाढलेली लक्षणीय लोकसंख्या विशेष म्हणजे मुसलमान मतदारांसहित ब्राम्हणेतर मतदारांची संख्या आणि राजकीय महत्व झपाट्याने वेगाने वाढत गेले त्याचा फायदा संजय केळकर ब्राम्हण असूनही त्यांना यासाठी नक्की मिळणार आहे किंबहुना मनसे आणि उद्धव सेनेचे दोन्ही अतिशय तुल्यबळ असे कोकणस्थ मराठा उमेदवार अनुक्रमे राजन विचारे तसेच अविनाश जाधव याच ब्राम्हण केळकर यांच्या विरोधात निवडणूक लढवत असूनही यावेळी देखील हमखास अत्तरवाले नाही तर दाढीवाले केळकर हेच निवडून येतील, जाधव आणि विचारे या दोघांच्या चढाओढीत तिसऱ्या केळकरांच्या फायदा होणार आहे, केळकर पुन्हा एकदा आमदार म्हणून विधासभेवर जातील. आणखी एक कळीचा मुद्दा असा कि जाई ठाण्यात उद्धव सेनेला एकगठ्ठा मतदान करणारी संख्या मोठी असली तरी राजन विचारे का कोण जाणे यांचे राजकीय महत्व सिनेमातल्या व्हॅम्प सारखे आहे, ठाणेकर त्यांच्या नेतृत्वावर नाराज आहेत तसेच केळकरांचे आजतागायत असलेले ठाण्यातले कट्टर राजकीय शत्रू खासदार नरेश म्हस्के आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, या दोघांना आणि त्यांच्या शिवसेनेला एखाद्या खाष्ट सासूसारखे याच केळकर यांनी कायम छळले किंवा भाद्रपद महिन्यात गावातले उनाड मुले ज्यापद्धतीने ऐन मोक्याच्या क्षणी डॉगी जोडप्यांचा आनंद दगडे मारून हिरावून हिसकावून घेतात हुबेहूब तीच पद्धत केळकरांची कायम ठाण्यातल्या शिवसेना नेत्यांना छळतांना असायची दिसायची पण यावेळी तरीही एकनाथ शिंदे यांना संपूर्ण ताकद पणाला लावून संजय केळकर यांना निवडून आणावेच लागणार आहे कारण त्यांना तशी प्रेमाची ताकीद थेट संघ मुख्यालयातून देण्यात आलेली आहे तसेच झाले गेले ते विसरून जा पण माझा हा उमेदवार कसेही करून निवडून आणा, अतिशय हट्टाने आग्रहाने स्वतः देवेंद्र फडणवीसांनी म्हस्के शिंदे या प्रभावी शक्तिशाली जोडगळीला सांगितले आहे. तरीही जर कोकणस्थ मराठ्यांचा एकमेव उमेदवार केळकरांच्या विरोधात उभा असता तर यावेळी नक्कीच केळकर निवडणुकीत पार उताणे झाले असते पण तेथेही त्यांचे नशीब बलवत्तर निघाले, एकाचवेळी उद्धवसेनेचे राजन विचारे आणि मनसेचे अविनाश जाधव केळकरांच्या विरोधात उभे असल्याने केळकर नक्की निवडून येतील, हे यापुढे कोणत्याही कुडमुड्या ज्योतिष्याला विचारण्याची गरज नाही. पुनःपुन्हा केळकरच नशिबी हाच ठाणेकरांचा गुन्हा, असे म्हणून आपण सारेच आता त्यांच्या निवडणूक निकालाची वाट पाहूया !!
तूर्त एवढेच : पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी