पवारांनी विचका केला, झिंगालाला, हर्षवर्धन
पाटलांचा पचका झाला !!
अब आयेगा असली खेल का मजा हर्षवर्धन बाबू !! माझे वाक्य समस्त वाचकांनी आताच याठिकाणी लिहून ठेवावे कि हर्षवर्धन पाटलांनी तुतारी हाती घेताच त्यांचे भले झाले. नाय नो नेव्हर, येणारी विधानसभा हर्षवर्धन पाटील शरद पवारांच्या राष्ट्रवादीतर्फे लढवतील आणि पराभवाची शंभर टक्के हॅट्ट्रिक करतील, यावेळीही त्यांचा पराभव अटळ आहे, दत्तात्रय भरणे उर्फ दत्तामामा गावमामा पुन्हा तिसऱ्यांदा हर्षवर्धन यांना मामा बनवून विधान सभा जिंकतील कारण गेल्या दहा वर्षात सतत मुंबईत मुक्कामाला राहणाऱ्या हर्षवर्धन पाटलांचा इंदापूर विधान सभा मतदार संघातली पकड पूर्णतः ढिली पडलेली असताना तिकडे भरणे मामांनी मात्र सतत कायम मतदारांच्या सान्निध्यात राहणे पसंत केले, एक नक्की आहे कि जर शरद पवार यांनी उगाच विनाकारण किंवा भाजपा तसेच अजितदादांना डिवचण्यासाठी केवळ राजकीय दृष्ट्या डंगरा उर्फ म्हातारा झालेल्या नेत्याला हर्षवर्धन यांना आपल्या पक्षात घेतले नसते आणि त्यांच्या ज्या जवळच्या पाठीराख्या नेत्यांनी गेली दहा वर्षे मेहनत घेऊन इंदापूर मतदार संघ बांधला त्यांनाच जर भरणे मामा विरोधात उमेदवारी दिली असती तर हि निवडणूक भरणे यांना नक्की जड गेली असती त्यांना निवडून येणे कठीण होते तेथे तुतारी वाजण्याचीच दाट शक्यता होती पण शरद पवार यांनी शंकरराव बाजीराव पाटील यांचे घराणे राजकारणातून नेस्तनाबूत करण्यासाठी हि चाल खेळली म्हणजे त्यांची ती नेहमीची पद्धत त्या अफझलखानासारखी, आधी पराक्रमी शत्रूला जवळ करायचे नंतर त्याला गाफील ठेवत असा काही वार करायचा कि समोरचा राजकीय शत्रू कायमस्वरूपी उद्धव ठाकरे होत राजकीयदृष्ट्या धारातीर्थ पडतो…
www.vikrantjoshi.com
1995 दरम्यान ज्या हर्षवर्धन पाटलांनी अपक्ष उमेदवार म्हणून विधानसभा जिंकून शरद पवार यांना अपमानित केले होते या विधानसभेला जर याच शरद पवारांच्या तालमीत तयार झालेला एखादा नेता अपक्ष निवडणूक लढवून अनपेक्षितरित्या हर्षवर्धन पाटील यांचा जुना वचपा काढून मोकळा झाला, अजिबात आश्चर्य वाटून घेऊ नका किंबहुना शरद पवार यांची जर आतून त्या अपक्ष उमेदवाराला मोठी मदत झाली तरीही तोंडाचा आ वासू नका, हर्षवर्धन पाटील यांचे इंदापूरातले घराणे पवारांचे थोडक्यात बारामतीचे सख्खे शेजारी पक्के वैरी, काका शंकरराव बाजीराव पाटलांना शरद पवार कधीही भावले नाहीत आवडले नाहीत ते कायम पवारांना कोल्होबा म्हणून हिणवायचे विशेष म्हणजे शंकरराव बाजीराव हे यशवंतराव चव्हाणांना अति जवळचे किंबहुना हेच यशवंतराव अनेकदा याच शंकरराव यांचा सल्ला मौल्यवान मानायचे, जेव्हा शंकरराव यांनी यशवंतराव चव्हाण यांच्याशी अगदी उघड वाद घालीत या पोराला तुम्ही मोठे करू नका तोच एक दिवस तुम्हाला खाऊन टाकेल, सांगितले होते, शरद पवारांना पोटचा मुलगा मानलेल्या यशवंतरावांनी आपल्या या अत्यंत विश्वासू सहकारयाचे त्यावेळी ऐकले नाही त्यानंतर नेमके तेच घडले जे शंकरराव बाजीराव यांनी भविष्य वर्तविले होते हा पोरगा पुढे बाप यशवंतरावांचा देखील झाला नाही अर्थात तो इतिहास येथे पाजळण्याची अजिबात गरज नाही कारण तो यशवंतरावाच्या बाबतील घडलेला गडद इतिहास तुम्हा सर्वांना तोंडपाठ आहे. अर्थात हेच शंकरराव बाजीराव आपल्या कुटुंबात देखील नेमके हेच सांगायचे कि सत्ता मिळाली नाही सत्तेत स्थान मिळाले नाही घरी बसावे लागले तरी चालेल पण चुकूनही शरद पवारांच्या राजकीय आश्रयाला जाऊ नका, मोठ्यांचा सल्ला जर धुडकावला तर काय होते हे नजीकच्या भविष्यात हर्षवर्धन पाटील यांना अनुभवाने शिकविले नाही तर मला राजकीय पत्रकारितेतील ढ विद्यार्थी म्हणून हिणवा…
इंदापूर बारामती शेजारी शेजारी त्यामुळे काका शरद पवार पुतण्या अजित पवार यांच्याशी राजकीय पंगा घेणे तसे अत्यंत कठीण असे काम पण काका शंकरराव यांचा राजकीय सल्ला शिरसावंद्य मानून कधीही बारामतीच्या पवारांच्या खाणाखुणांना न भुलणार्या आजतागायत राजकारणात सहकारात यशस्वी वाटचाल करणाऱ्या हर्षवर्धन पाटलांचे पुणे जिल्ह्यातील महाराष्ट्रातील राजकीय महत्व अबाधित होते किंबहुना जेव्हा अजित पवार त्यांच्या महायुतीमध्ये सामील झाले तरीही हर्षवर्धन पाटलांनी त्यांना लोकसभा निवडणुकीत कसे फसविले आणि आतून सुप्रिया सुळे यांना सहकार्य करून निवडून आणण्यात कशी मोलाची कामगिरी पार पाडली हे त्यांनी आपणहून काल पर्वा अगदी जाहीर सांगून टाकले, यापुढे अगदी शम्भर टक्के हर्षवर्धन पाटलांची राजकीय वाटचाल कोल्हा आला रे आला कथेसारखी असेल, हर्षवर्धन अगदी आत्ता आता पर्यंत कधीही पवारांचे झाले नाहीत अचानक हर्षवर्धन यांना राजकीय अवदसा आठवली आणि ज्या मोदी, शाह यांच्या अगदी समीप नेणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना थोडक्यात या तिघांनाही फसवून ते ज्या उथळ पद्धतीने आपल्या खानदानी राजकीय वैरायला जाऊन बिलगले आहेत, मला वाटते त्यांनी भाजपा श्रेष्ठींचा हा केलेला जाहीर अपमान त्यांना एक दिवस नक्कीच महागात पडेल असे दिसते, वाईट याचे वाटते कि राजकारणात अगदी सुरुवातीपासून अतिशय चंचल फसवी लबाड भूमिका सतत घेणाऱ्या, राजकीय पक्ष आणि भूमिका अगदी सहज बदलणाऱ्या हर्षवर्धन पाटलांनी निदान राजकारणात उतरलेल्या अंकिता आणि राजवर्धन यांच्याकडे बघून यापद्धतीची सततची लबाड भूमिका निदान यावेळी घ्यायला नको होती पण ते चुकले नेमके पवारांच्या जाळ्यात अख्खे कुटुंब त्यांनी अडकवून टाकले, अति शहाणा त्याचा बैल रिकामा, हेच त्यांनी केले. हा विषय येथेच संपत नाही…
तूर्त एवढेच : पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी