आल्या आल्या निवडणूका, सांगतो रोखठोक,
कान देऊन ऐका :
जो प्रसंग माझ्या मित्रावर ओढवला विशेषतः तोच प्रसंग गावाकडे एकेकाळी शेती करणाऱ्या अनेक ब्राम्हणांवर ओढवला आहे. माझ्या एका मित्राकडे 300 एकर सुपीक शेती होती ते श्रीमंत कुटुंब म्हणून ओळखले जायचे मात्र शेती कसायला जाईल कोण, खेड्यावरच्या शेतीत मजुरांवर लक्ष ठेवायचे नाही सारे काही मुनिमाने बघायचे, जमीनदाराने इकडे घरीच राहून दरवर्षी मूल जन्माला घालायचे, एकदा तर माझ्या मित्राच्या आईची आणि वाहिनीची खाट शेजारी शेजारी एकाचवेळी बाळंतपणाला, घरी बसून दररोज उत्तोमत्तम खाण्याचे बेत आणि फावल्या वेळी पत्ते कुटायचे, याच ऐय्याशी आळशी बेफिकीर वृत्तीतून अनेकांच्या शेती विकल्या गेल्या किंवा मुनिमांनी हडप करून ते श्रीमंत झाले, जमिनदार एवढे रस्त्यावर आले कि माझा हा मित्र त्याकाळी रुपया मिळविण्यासाठी वणवण भटकायचा थोडक्यात काय तर इतरांच्या भरवशावर जशी शेती किंवा व्यवसाय करता येत नाही तेच राजकारणाचे, आम्ही जे नागपूरकरांसाठी केले त्याला तोड नाही म्हणून मी प्रचाराला बाहेर पडणार नाही, पद्धतीचे वक्तव्य लोकसभा निवडणुका लागण्याआधी नितीन गडकरी यांनी केले आणि ते तसेच सुरुवातीला गावच्या जमीनदारासारखे वागले पण निवडणूक प्रचाराच्या ऐन तोंडावर जेव्हा त्यांना लक्षात आणून देण्यात आले कि तुमचेही देऊळ पाण्यात आहे, प्रचार करायला घरोघरी जाणे अत्यावश्यक आहे तेव्हा कुठे गडकरींच्या हे लक्षात आले कि मतदारांसाठी काहीही कितीही करा तरीही ते जातीची माती खाण्यासाठी विदर्भ प्रगती पथावर नेणाऱ्या नेत्याला सुद्धा पायात पाय घालून आडवा करतील त्यानंतर गडकरी झेपत नसतांना देखील प्रचार करण्यासाठी वणवण भटकले तेव्हा कुठे कुणबी समाजाचे विकास ठाकरे कसेबसे पराभूत झाले. हेच पुढे अगदी तातडीने देवेंद्र फडणवीसांच्या देखील लक्षात आले…
www.vikrantjoshi.com
जसे फोटोतल्या प्रतिमेकडे बघून बायकोला दिवस जात नाहीत, प्रेयसीच्या डोळ्यात केवळ फुंकर मारून तिचा मोतीबिंदू गायब होणार नाही तेच लोकसभा किंवा विधानसभा मतदार संघाचे, नेत्यांना उगाचच वाटत राहते कि आपल्या पाठी आपले जवळचे नेते कार्यकर्ते मतदार संघ उत्तम संभाळताहेत पण ते अजिबात घडत नाही, भारदस्त मित्राबरोबर जसे देखण्या बायकोला सहलीला पाठवायचे नसते, आपला मतदार संघ हा देखील देखण्या बायकोसारखाच असतो, उफाड्या पत्नीसाठी काहीही कितीही केले तरी ती प्रसंगी जशी मित्राची होऊ शकते तेच गडकरींचे बाबत घडणार होते पण मी काय काय केले हे त्यांनी जेव्हा प्रत्यक्ष भेटून मतदारांना सांगितले थोडक्यात जेव्हा गडकरी त्या जमीनदारांसारखे वाड्यावरून खाली उतरले तेव्हा कुठे कसेबसे लोकसभेला निवडून आले. आधी जे कधीही घडले नाही आणि गडकरी फडणवीस जर नसतील तर जे पुन्हा घडणार नाही ते या दोघांनी संपूर्ण नागपूर आणि विदर्भासाठी केले तरीही जर या विधानसभा निवडणुकीला पण नागपूरकर जातीपातीचे राजकारण करीत म्हणजे केवळ कुणबी समाजाच्या उमेदवाराला मतदान करून समस्त कुणबी आपल्याच प्रगतीच्या आड येणार असतील त्यावर हसावे कि रडावे हेच समजेनासे झाले आहे. काही आमदार काही खासदार हे त्या त्या मतदार संघांची मोठी गरज असते जसे बारामतीमधून जर तुम्ही पवारांनाच घालविणार असाल तर मोठे नुकसान स्थानिक मतदारचे होईल तेच नागपूरचे, विदर्भातल्या किंवा नागपुरातल्या प्रत्येकाला हे तंतोतंत ठाऊक आहे कि निवडून येणारे मग ते लोकसभेला गडकरी असतील किंवा विधान सभेला फडणवीस असतील, निवडून आल्यानंतर या दोघांचा देशाच्या आणि राज्याच्या जडणघडणीत शंभर टक्के सहभाग असणार आहे, गडकरी फडणवीस म्हणजे अनिल देशमुख नव्हेत कि जे निवडून आल्यानंतर सत्तेत बसल्यानंतर केवळ आपल्या कुटुंबाच्या श्रीमंतीचा फारतर काटोल विधानसभेचा विचार करतील, दोघेही असे संकुचित नाहीत किंबहुना देवेंद्र फडणवीस यांच्या डोक्यात तर केवळ राज्याचे विदर्भाचे नागपूरचे भले कसे साधल्या जाईल हा एकमेव विचार असतो, राज्याचे एक सर्वोत्तम नेतृत्व म्हणून त्यांना सतत राज्यात वणवण भटकावे लागत असतांना जर त्यांचे आवडते विधान सभेचे सारे मतदार आणि काही मूर्ख कपाळकरांटे सहकारी जर याच फडणवीसांना प्रचारासाठी मतदार संघात अडकवून ठेवणार असतील तर पुन्हा तेच तुमच्यासमोर हसावे कि रडावे….
नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदार संघ तसा सुरुवातीपासून भाजपाचा बालेकिल्ला,माजी राज्यमंत्री विनोद गुडधे पाटील निवडून यायचे त्यानंतर ते भाजपातून बाहेर पडले आणि देवेंद्र फडणवीस नंतर येथून सातत्याने निवडून यायला लागले, यावेळीही तेच निवडून येतील यात तिळमात्र शंका नाही मात्र आपल्याही मतदार संघात जातीपातीचे राजकारण घुसलेले बघून फडणवीस या दिवसात कमालीचे मनोमन अस्वस्थ आहेत त्यांच्यासमोर विनोद गुडधे पाटील यांचे चिरंजीव प्रफुल्ल उभे ठाकणार असल्याने निवडणुकीत नक्कीच काही प्रमाणात चुरस निर्माण होईल असे दिसते मात्र ज्या कुणबी समाजाला फडणवीसांनी कायम खूप प्रेम दिले मायेने पोटाशी घेतले आणि दक्षिण पश्चिम मतदार संघाच्या भल्यासाठी तसेच नागपूरच्या चौफेर प्रगतीसाठी स्वतःचे रक्त आटविले त्याच दक्षिण पश्चिम नागपूर विधान सभा मतदार संघातील मतदारांनी कायम राज्यात नंबर एक ठरलेल्या ठरणाऱ्या आपल्या या नेत्याला गडकरी पद्धतीने पायात पाय अडकवून विशेषतः जातपात आडवी आणून त्याला या कठीण दिवसात डोकेदुखी ठरेल असे वागू नये किंबहुना ऐनवेळी स्वतः प्रफुल्ल गुडधे यांनी आपल्या या मित्राला, उमेदवारी मागे घेत अविरोध निवडून आणण्याचा मोठेपणा दाखवावा असे अनेकांना वाटते. पुढल्या पाच वर्षात पुन्हा न थांबता नक्कीच हेच फडणवीस विकासाचे अधिक स्रोत विदर्भात नागपुरात उभे करतील त्यात शंका घेणे म्हणजे केवळ एखाद्या सामान्य माणसाच्या सांगण्यावरून रामाने जे सीतेबाबत शंका घेत केले तेच दक्षिण पश्चिम नागपूर विधानसभा मतदारांनी करण्यासारखे…
तूर्त एवढेच : पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी