कोण कुठले उमेदवार कोण विजयाचे शिल्पकार :
शाळेत असतांना मोरपीस जर पुस्तकात ठेवले तर आवडणारी मुलगी प्रेमात पडते असे सिनियर्स आपल्याला जसे सांगायचे तसे मी आत्ताच याठिकाणी तुम्हाला सांगून ठेवतो कि विधानसभा निवडणुक मतदान आटोपेपर्यंत माझे सारे व्हिडीओ तुम्ही असेच उशाशी ठेवून झोपत चला म्हणजे निवडणूक निकालानंतर आधी जे मी सांगितले होते तेच घडले तुमच्या लक्षात येईल. राज्यातील पहिला अपक्ष आणि तोही विजयी होणारा उमेदवार ठरला आहे तो अपक्ष म्हणून निवडणूक लढवेल आणि मोठ्या फरकाने विधानसभेला निवडुन येईल. मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यातील उदगीर विधानसभा मतदार संघ, सध्या या मतदार संघाचे नेतृत्व अजित पवार राष्ट्रवादीचे मंत्री संजय बनसोडे करताहेत, वास्तविक उदगीरच्या मतदारांना भावणारी भुमीका संजय बनसोडे यांनी घेतली असती तर ते नक्की काठावर पास झालेही असते पण संजय बनसोडे यांनी शरद पवारांकडे पाठ फिरविली जणू शरद पवार यांना फसवून केवळ मंत्रीपद मिळण्याच्या लालसेपोटी संजय त्या अजित पवारांसंगे बाहेर पडले खरे त्यातून त्यांना मंत्रिपदाचे क्षणिक सुख देखील मिळाले पण हेच बनसोडे उदगीर विधानसभा मतदारांच्या मनातून मात्र कायमचे उतरले आहेत अशी तेथे चाललेल्या उघड चर्चेवरून नेमकी माहिती मिळते थोडक्यात संजय बनसोडे यांचा उद्याचा निकाल आजच लागलेला आहे त्यांचा पराभव आता त्यांना स्वतःला देखील दिसायला लागला आहे..
www.vikrantjoshi.com
विद्यमान मंत्री संजय बनसोडे यांना नाकारणारे फटकारणारे लाथाडणारे त्यांच्या नावाने नाक मुरडणारे त्यांना चारी मुंड्या चित करणारे आताही त्यांना रस्त्याने जातांना वाकुल्या दाखविणारे त्यांच्या नावाने कडाकडा बोटे मोडणारे उदगीरकर मतदार मग निवडून निवडून कोणाला निवडणार आहेत तर तेही चाणाक्ष आणि चतुर अशा या ग्रामीण दूरदर्शी मतदारांचे आजच नेमके ठरले आहे, ज्या विश्वजित अनिलकुमार गायकवाड यांना अपक्ष म्हणून येति विधानसभा लढवायची आहे त्याच गायकवाड यांना प्रचंड बहुमताने निवडून आणण्याचे त्यांनी अगदी मनापासून ठरविले आहे. वास्तविक लातूर जिल्ह्यातले उच्चशिक्षित विश्वजित गायकवाड ठाणे शहरात लहानाचे मोठे झालेले, पण त्यांचे मन फारसे कधी त्या ठाण्याच्या सुखासीन दैनंदिनीत रमलेच नाही, सदानकदा लातुरात जाऊन बसायचे तेथील ग्रामीण सवंगड्यात रमायचे त्यांच्या या सवयीला स्वतः गायकवाड कुटुंबीय अक्षरश: कंटाळले होते, शेवटी तर महाराष्ट्र शासनातले बडे अधिकारी आणि राज्याच्या समृद्धी महामार्गाचे जे प्रमुख शिल्पकार त्यातले एक प्रमुख अनिलकुमार गायकवाड यांनी काही वर्षांपूर्वी अगदी स्पष्ट आणि काहीशा रागाने विश्वजित यांना सांगून टाकले कि बाबा जा आणि तिकडेच त्या लातूर जिल्ह्यात कायमचा राहा, गायकवाडांना वाटले आपल्या या तंबीने पोरगं ताळ्यावर येईल आणि ठाण्यात राहून एखाद्या व्यवसायात पडून बक्कळ पैसे मिळवेल पण घडले भलतेच विश्वजित महाशय ठाणे मुंबईतल्या समस्त सुखांना लाथाडून कायमस्वरूपी त्या उदगीर शहरात मुक्कामाला गेला तेथल्या सार्वजनिक जीवनात एवढा रमला कि समस्त मतदारांना उदगीरकरांना तो आपल्या कुटुंबातला एक वाटू लागला, अनेक उनाड मुलांना त्याने आपलेसे केले आणि समाजकारणात घुसविले तर एवढ्या लहान वयात ऐन तारुण्यात त्याने उदगीर मतदार संघात अगदी विद्यार्थ्यांपासून तर बुजुर्गांपर्यंत मोठा चाहता वर्ग निर्माण केला. अत्यंत बुद्धिमान तल्लख कष्टाळू आणि कायम जमिनीवर राहून सर्वसामान्यांमध्ये सतत कायम राहणारे विश्वजित अनिलकुमार गायकवाड यादिवसात संपूर्ण उदगीर विधानसभा मतदारसंघातील रहिवाशांचे आवडते आणि लोकप्रिय तरुण नेते म्हणून पुढे आले आहेत…
एखाद्य बुजुर्ग अनुभवी नेत्याने आमदाराने लोकांसाठी धडपडावे सतत धावपळ करीत लोकांना सहकार्य करावे तसे विश्वजित गायकवाड यांचे काम कर्तृत्व आणि कामगिरी, सारेच अगदी मनापासून त्यांच्यावर खुश आहेत म्हणूनच त्यांनी संजय बनसोडे ऐवजी या अपक्ष उमेदवाराला पुढला आमदार करण्याचे आतापासूनच ठरविले आहे. विशेषतः विश्वजित गायकवाड यांच्या विविध अनेक कार्यक्रमांचे व्हिडीओज मी आपणहून अधूनमधून बघतो, त्यांना प्रत्येक लहान मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमात उपक्रमात मिळणारा उत्स्फूर्त पाठिंबा प्रतिसाद होणारी गर्दी वाजणारया टाळ्या हे सारे काही बघून उद्याचा आमदार आजच जणू त्यातून बघायला मिळतो. पुन्हा तेच सांगतो कि विश्वजित अनिलकुमार गायकवाड हे अपक्ष म्हणून विधानसभा लढवतील आणि हमखास निवडून येतील. अत्यंत महत्वाचे म्हणजे उदगीर हा राखीव मतदार संघ, अनेकदा नाईलाजाने दगडापेक्षा वीट मऊ पद्धतीने विशेषतः राखीव विधान सभेतून आमदार निवडून पाठविले जातात पण विश्वजित या उच्चशिक्षित तरुणाच्या घरातले वातावरण आणि संस्कार ज्यांना उत्सुकता आहे त्यांनी अवश्य जाऊन तपासावेत बघावेत एवढे अत्योत्तम आणि धर्मनिरपेक्ष संस्कार कार्यव्यस्त असूनही सतत अनिलकुमार गायकवाडांनी आपल्या तिन्ही मुलांना दिले त्यामुळे संभाजी निलंगेकर पाटील किंवा अमित देशमुख पद्धतीचे कट्टर मराठे असतील किंवा कर्मठ ब्राम्हण, माळी तेली लिगायत व्यापारी मराठा अमराठा मुस्लिम थोडक्यात समस्त समाज आणि जातीधर्म केवळ आपुले, विश्वजित किंवा अनिल गायकवाड कुटुंबाची हि सकारात्मक वृत्ती प्रसंगी थेट सरसंघचालक मोहन भागवताना देखील गायकवाड कुटुंबियांवर प्रेम करायला लावते कारण गायकवाड असे एकमेव जेथे फक्त प्रेम मिळते, जातीचा अभिमान असतो पण केवळ आपल्याच जातीला थारा असे त्यांचे वागणे नसते. विश्वजित अनिलकुमार गायकवाड अगदी शंभर टक्के उदगीर विधान सभा मतदारसंघाचा कायापालट करून मोकळे होतील, ते अपक्ष म्हणून निवडून येतील…
तूर्त एवढेच : पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी