खडसेंची समीप घटिका, ना घर का ना घाटका :
राजकीय जीवनात अनेकांच्या हातून चुका होतात निर्णय चुकतात पण आधी केलेल्या चुका पुनःपुन्हा करायच्या नसतात अन्यथा अशा नेत्यांचा हमखास एकनाथ खडसे होतो हे आता जवळपास सिद्ध झाले आहे. दुबईत राहणाऱ्या माझ्या एका मित्राचे एकाचवेळी दोन दोन तरुणींवर प्रेम होते, त्यातली एक दुबईत राहायची आणि दुसरी मुंबईत, दुबईत राहणाऱ्या प्रेयसीच्या एक दिवस मित्र मुंबईत असतांना त्याचे मुंबईतले प्रेम प्रकरण तिला समजले आणि इकडे हा मुंबईत असतांना त्याने आपले दुबईतले प्रेम प्रकरण येथल्या प्रेयसीला सांगून टाकले. जेव्हा हा दुबईत परतला त्याने फसविल्याचे सारे पुरावे दुबईतल्या प्रेयसीने स्थानिक पोलिसांना सुपूर्द केले, केस चालली त्याला दोन वर्षांचा तुरुंगवास झाला, इकडे तुरुंगात असतांना आपण फसविल्या गेल्याचे मुंबईतल्या प्रेयसीच्या लक्षात आल्याने तिने आईवडिलांनी पसन्त केलेल्या तरुणाशी लग्न करून ती मोकळी झाली, तुरुंगातून सुटल्यावर त्याची अवस्था ना घरका ना घाटका अशी झाली, आता तो पन्नास वर्षांचा अविवाहित वयस्क म्हणून जगतो आहे. एकनाथ खडसे आणि माझा हा मित्र, दोघांच्या आयुष्यात कवडीचा फरक नाही. एकनाथ खडसे यांना एकेकाळी भारतीय जनता पक्षाने अक्षरश: डोक्यावर घेत त्यांना सत्ता दिली त्यातून त्यांनी आपल्या कुटुंबाचे मोठे आर्थिक भले करवून घेतले पण जेथे चांगले वर्तन आवश्यक होते तेथेच खडसेंनी सततच्या उद्धट वागण्या बोलण्यातून दादागिरीतून गैरव्यवहारातून अंतर्गत भाजपा नेत्यांनाच डोकेदुखी ठरेल पद्धतीचे वर्तन करायला सुरुवात केली परिणीती त्यांना भाजपाने आपली जागा दाखवली पुढे याच खडसेंनी दुसर्या प्रेयसीशी घरोबा केला वास्तविक तेथे त्यांचे चांगले चालले होते, पवारांकडे खान्देशात अगदीच रवींद्र प्रल्हादराव पाटील पद्धतीचे चंगू मंगू नेते होते पण खडसे राष्ट्रवादीत आल्याने पवार सुखावले त्यांनी भाजपाची जिरवण्यासाठी एकनाथ खडसेंना पुन्हा मोठी राजकीय ताकद देण्याचे ठरविले, खडसे लेवा पाटील असूनही पवारांनी अख्या खान्देशातले समस्त मराठा पाटील खडसेंच्या पाठीशी उभे केले ज्या खडसे याना राजकीय मुडदूस झाला होता पवार यांनीं खडसेंना खान्देशचा पैलवान म्हणून पुन्हा पुढे आणला वास्तविक खडसे पोटच्या लेकीसारखे रोहिणी सारखे राष्ट्रवादीलाच चिपकून बिलगून राहिले असते तर तिकडे भाजपामध्ये सून मोठी झाली केंद्रात मंत्री झाली तसे खडसे राष्ट्रवादीत राहिले असते तर ते आणि रोहिणी फार पुढे पुन्हा निघून गेले असते पण खडसे यांचा माझा दुबईतला मित्र झाला, इकडे खडसे राष्ट्रवादीशी रोमान्स करीत असतांना तिकडे त्यांनी ऐन लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर पुन्हा भाजपाला मिठीत घ्यायला भाजपाला चुंबन द्यायला सुरुवात केली आणि तेथेच पुन्हा चंचल स्वभावाच्या एकनाथ खडसेंची चाल चुकली, ज्या वेगाने खानदेशातल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी खडसे यांना डोक्यावर घेतले होते त्यापेक्षा दुप्पट वेगाने तेही अगदी तोंडावर शिव्या देत खडसे शरीराने राष्ट्रवादीत असतांना देखील आकाशपाताळ एक करीत त्यांनी खडसेंना शिव्यांची टीकेची लाखोली वाहिली….
www.vikrantjoshi.com
एकनाथ खडसेंना वाटले मला आता राष्ट्रवादी आणि शरद पवारांची त्यांना अजिबात गरज उरली नाही कारण माझी सून रक्षा भाजपातर्फे आधी खासदार झाली त्यानंतर तिला केंद्रात मंत्रिपद मिळाले, आता माझी भाजपात एकदा का एंट्री झाली रे झाली कि मी पूर्वीसारखा देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांना त्रास द्यायला मोकळा, विषेश म्हणजे भाजपामध्ये प्रवेश होण्याची वाट न बघता खडसेंनी आपला पूर्वीचा उर्मट स्वभाव उफाळून वर आणला आणि त्यांनी जणू लग्नाआधीच हनिमून साजरा करायला सुरुवात केली त्यांनी फडणवीस आणि महाजन यांना त्रास देण्यास सुरुवात केली आणि येथेच खडसे फसले चुकले त्यांचा या अशा बेभरवशाच्या वागण्याने भाजपामध्ये प्रवेश तर झाला नाहीच वरून त्यांनी राष्ट्रवादी आणि शरद पवार दोघांचाही विश्वास पूर्णपणे गमावला, आज ना घरका ना घटका या अवस्थेत एकनाथ खडसे आहेत आणि आता त्यांना जरी राष्ट्रवादीत राहायचे असले तरी त्यांची अवस्था शरद पवार माहेरी निघून गेलेल्या आणि पुन्हा परतलेल्या बायकोसारखी नक्की करतील, महाखतर्नाक आहेत ते यानंतर हेच पवार खडसेंना नक्की वापरून घेतील वरून त्यांची राजकीय अवस्था डर्टी पिक्चर मधल्या सिल्क स्मितासारखी शंभर टक्के करून सोडतील, पवार मोठ्या राजकीय अडचणीत असतांना खडसे यांनी त्यांना लोकसभा निवडणुकीदरम्यान पाठ दाखविली, हा अपमान हि दगाबाजी पवार नक्कीच न विसरणारे, वागण्यातून बोलण्यातून व्यवहारात अनेक गंभीर चुका करायच्या वरून दादागिरी करायची, वाट्टेल ते अपशब्द वापरायचे, फडणवीसांनी आज तरी खडसेंना नेमकी जागा दाखवून दिली आहे…
तूर्त एवढेच : पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी