निर्णय घ्या अचूक नको ती घोडचूक :
ठाणे जिल्ह्याच्या राजकीय परिघाचा लेखाजोखा चाळतांना मला जे नेमके वाटते कि जी चूक एकेकाळी बाळासाहेबांनी केली किंवा शरद पवारांना भोवली नेमकी तीच चूक अनवधानाने देवेंद्र फडणवीस त्या नगर जिल्ह्याबाबत करताहेत, एखादी उफाडी तरुणी पदर पाडून शेजारी उभी असतांना एखाद्याने जोरजोरात मारुती स्तोत्र म्हणायला सुरुवात करावी तसे नेमके फडणवीसांचे झाले आहे. नगर जिल्ह्यातले राजकीय पहेलवान बाळासाहेब थोरात वगळता जवळपास सारेच कधी नव्हे ते अलिकडल्या दहा वर्षात भाजप विरोधातली समस्त ताकदवान घराणी भाजपा वळचणीला लागलेली असतांना तसे काळोखात बाळासाहेब थोरात देखील फडणवीसांना अनेकदा फ्लायिंग किस देऊन मोकळे होतात, नगर जिल्ह्यातल्या साऱ्याच प्रमुख घराण्यांना नेत्यांना एकत्र बांधून ठेवण्याऐवजी त्या साऱ्यांचे वाद विकोपाला जात असतांना भाजपा प्रमुख वरिष्ठांनी नेमकी बघ्याची भूमिका घेतली जी नेमकी शरद पवारांच्या पथ्यावर पडली आहे, मी तर म्हणतो अजूनही वेळ गेलेली नाही, फडणवीसांनी उठावे एखाद्या थंड हवेच्या ठिकाणी फक्त तीन दिवस हॉटेल बुक करावे आणि एकाचवेळी विपीन कोल्हे आणि कुटुंबीय, राधाकृष्ण तसेच सुजय विखे पाटील, शिवाजीराव कर्डीले, बबनराव पाचपुते, राम शिंदे, बाळासाहेब मुरकुटे अशा समस्त प्रभावी नेत्यांचे एकत्र आत्मचिंतन घडवून आणावे त्यांच्यात शिताफीने सामंजस्य करार घडवून आणावा अन्यथा एकेकाळी कायमस्वरूपी जी वाट पवारांनी ठाणे जिल्ह्यात त्यांच्या राष्ट्रवादीची लावली किंवा बाळासाहेबांनी शिवसेनेची लावली नेमके ते तसेच अगदी विधानसभा निवडणूक तोंडावर नगर जिल्ह्यातल्या भाजपाचे नक्की होणार आहे. जीवघेण्या राजकीय स्पर्धेतून मोठ्या खुबीने युक्तीने विखे पाटील पितापुत्राने त्यांच्याच भाजपा नेत्यांना जवळपास नेस्तनाबूत केले म्हणजे राम शिंदे यांची अवस्था मधुचंद्राआधीच विधवा अशी केली किंवा बबनराव पाचपुते यांची स्थिती तर नको ते अवयव निकामी झाल्याने बायकोकडे पाठ करून झोपणार्या नवऱ्यासारखी केली, तिकडे विवेक कोल्हे केवळ विखे पाटलांनी विरोधात काम केल्याने विधान परिषद नासिक शिक्षक मतदार संघातून पराभूत झाले थोडक्यात विखे पाटील विरोधकांचा उघड आरोप असा कि आम्हाला त्यांनी रस्त्यावर आणले म्हणून आम्ही सुजय विखे पाटलांचा अगदी ठरवून लोकसभेला पराभव घडवून आणला. देवेन्द्रजी, नेमके हेच तुम्हाला मोठ्या अडचणीचे ठरणार आहे, नगर जिल्ह्यातली कालपर्यंतची अत्यंत ताकदवान भाजपा रस्त्यावर आणण्यासाठी जर तुम्ही तातडीने लक्ष घातले नाही तर तुम्हाला संपविण्यासाठी बाळासाहेब थोरात किंवा शरद पवार पद्धतीच्या विरोधी नेत्यांना कोणतेही डावपेच खेळण्याची आवश्यकता नाही, भाजपाचे नेतेच आपापसात तलवारी चालवून एकमेकांचा जीव ऐन मोक्याच्या क्षणी घेऊन मोकळे होतील, उठा राष्ट्रवीर हो…सुसज्ज व्हा, उठा चला…
www.vikrantjoshi.com
नगर जिल्ह्यात कोल्हे विरोधी विखे पाटील आणि काळे कुटुंबीय, सिनेमासारखे खानदानी वैर दुश्मनी वैमनस्य, अजित पवार महायुतीमध्ये सामील झाल्याने त्यांचे विद्यमान आमदार कोपरगाव विधान सभा मतदार संघाचे आशुतोष काळे, स्वाभाविकच पुन्हा येत्या विधान सभेला हि जागा अजितदादा गटाच्या आशुतोष काळे यांच्या वाट्याला जाणार हे उघड आहे आणि तेथेच नेमके कोल्हे कुटुंबीय कमालीचे अस्वस्थ झाल्याने त्यांनी शरद पवार राष्ट्रवादीत जाण्याचे नक्की केले आहे कारण स्नेहलता पाटील यांना भाजपातर्फे उमेदवारी मिळण्याची आशा जवळपास संपुष्टात आल्याने नगर जिल्ह्यातल्या भाजपाला आता भगदाड पडते कि काय असे वाटू लागले आहे आणि हा कटू प्रसंग टाळायचा असेल तर त्यावर फक्त आणि फक्त वैद्य फडणवीस यांचीच जडीबुटी उपयोगात येईल अशी माझी नेमकी माहिती आहे. जे कोल्हापुरात घडले तेच नगर मध्ये घडले तर ते या कठीण कालखंडात भाजपाला नेमके परवडणारे नाही, म्हणून तातडीने कोल्हे कुटुंबियांना याच क्षणी सत्तेतली नेमकी संधी आणि विधान सभा निवडणुकीनंतर त्यांचे योग्य राजकीय आणि सत्तेतले पुनर्वसन, हा उपाय भाजपच्या फारतर पथ्यावर पडू शकतो, अन्यथा बोक्यासारखी तीक्ष्ण नजर दुधाच्या वाटीवर लावून बसलेले शरद पवार पुढल्या क्षणी झडप घालून मोकळे होतील. अवघे 33 वयोमान असलेले विवेक विपीन स्नेहलता कोल्हे नासिक शिक्षक मतदार संघ विधान परिषद निवडणूक एकनाथ शिंदे यांच्या उमेदवाराविरोधात किशोर दराडे विरोधात तेही अपक्ष म्हणून थोड्या फरकाने पराभूत झाले खरे, पण विवेक कोल्हे यांची सहाही तालूक्यात असलेली फारमोठी राजकीय ताकद त्यातून दिसून आली कारण ती विधानपरिषद निवडणूक विवेक कोल्हे विरुद्ध मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अशी होती ज्यात शिंदे यांनी फारमोठी राजकीय आणि आर्थिक ताकद पणाला लावली होती, भाजपाने नगर जिल्ह्यातली हि अगडबंब राजकीय ताकद गमावू नये, त्यांना नंतर मोठा पश्चाताप होईल. पुन्हा तेच नगर जिल्हा राजकीय वातावरण हा विषय येथेच संपत नाही…
अपूर्ण : पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी