काळेंविरुद्ध कोल्हेकुई, काळेही नाचती
थुई थुई : भाग 1
शरद पवार यांचे कायम अगदी सुरुवातीपासून वागणे कसे तर, हसींनोके बाप मर जायें और रोनेके बहाने हमें हसींनोके घर जायें !! पवार कायम टपून बसलेले असतात आणि सावज टप्प्यात आले रे आले कि क्षणार्धात झडप घेतात, आणखी एक उदाहरण देतो. एक अत्यंत स्त्रीलंपट सरकारी अधिकारी होते, अलीकडे ते निवृत्त झाले पण त्यांची वाईट विकृत सवय अशी होती कि ते ज्या मित्राच्या घरी जायचे त्या मित्राच्या कुटुंबातली एखादी तरुणी त्यांच्या मनात भरली कि ते पुढल्या काही दिवसात तिच्यावर झडप मारून मोकळे व्हायचे, औरंगाबादला शिंदे आडनावाचे त्यांचे कलीग होते, शिंदेंची बहीण या महोदयांच्या मनात भरली पुढे तिच्या आयुष्याचा बट्ट्याबोळ झाला, एक दिवस त्यांच्या मनात एका जवळच्या मित्राची देखणी बायको भरली, काही दिवसानंतर तिने नवऱ्याला सोडून यांच्याशी घरोबा केला, मित्र उध्वस्त झाला, याच अधिकाऱ्याच्या रांगेत एक बुवा होते, या बुवांचे देखील तेच, जी तरुणी मग ती विवाहित असेल किंवा अविवाहित, त्यातल्या काही त्यांच्या जवळच्या नातलग देखील होत्या, हे देखणे बुवा मनात भरलेल्या स्त्रियांवर याच पद्धतीने झडप घालून त्यांचा उपभोग घेऊन मोकळे व्हायचे अर्थात बुवांना आपल्या स्वार्थी आणि विकृत वृत्तीची फार मोठी किंमत ऐन तारुण्यात मोजावी लागली, त्यांच्या या पद्धतीच्या फसवाफसवीतून पुढे त्यांच्याही कुटुंबातल्या तरुण स्त्रिया उध्वस्त झाल्या, बुवांनीच त्यांना उध्वस्त केले. हा सरकारी अधिकारी किंवा तो बुवा, यांच्या लिंगपिसाट सवयी पुढे पुढे त्यांच्या जवळच्यांना लक्षात आल्याने त्यांना ओळखणारे मग घरात घेईनासे झाले. शरद पवारांना देखील हीच सवय पण राजकारणासाठी चांगली सवय, म्हणजे अमुक एखादा प्रभावी नेता पवारांच्या नजरेस पडला कि वाट्टेल ते डावपेच खेळून शरदराव एकतर त्या प्रभावी ठरलेल्या नेत्याला सुधाकरराव नाईक पद्धतीने राजकीय जीवनातून उध्वस्त करतात किंवा आर आर पाटील पद्धतीने त्या नेत्याला कायमस्वरूपी आपल्या दावणीला बांधून मोकळे होतात म्हणूनच प्रत्येक राजकीय पक्ष अगदी त्यांच्या पुतण्यासहीत शरदरावांची नजर आपल्याकडे असलेल्या ताकदवान नेत्यांवर पडणार नाही त्यासाठी मोठी काळजी घेतात पण पवारांची झडप वाघा सारखी असते, समजा एखाद्या हरणावर वाघाने झडप घेतली कि सभोवताली घोळक्याने उभे असलेला हरणांचा कळप हताश आणि हतबल होऊन वाघाकडे बघतो, पवारांचे देखील नेमके तेच, त्यांनी एकदा का झडप घेतली कि इतर विरोधकांचा हरीण होतो…
www.vikrantjoshi.com
विधानसभा निवडणुका अगदीच तोंडावर असल्याने यादिवसात पवारांची भूक भुकेल्या सिंहा सारखी झाली आहे ते दरदिवशी आवडत्या सावजावर झडप घालून मोकळे होताहेत, आता त्यांची नजर कोपरगावच्या कोल्हे कुटुंबावर पडली आहे तसेही कोल्हे घराणे एकेकाळी शरद पवारांना अतिशय जवळचे, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे हे वसंतदादा पाटलांच्या गटातले, दादा गेल्यानंतर दादा गटातले जवळपास सारेच बिन्नीचे नेते शरद पवारांना बिलगून त्यांच्या गटात सामील होऊन मोकळे झाले त्यातलेच एक शंकरराव कोल्हे, जोपर्यंत कोल्हे आणि समर्थक पवारांच्या गटात नव्हते तोपर्यंत शरद पवारांना नगर जिल्ह्यात नेता म्हणून मान्यता नव्हती डिमांड नव्हती स्कोप नव्हता किंबहुना शंकरराव काळे, बाळासाहेब विखे पाटील पद्धतीचे सहकार क्षेत्रातील किंवा बबनराव पाचपुते बबनराव ढाकणे पद्धतीचे नेते शरद पवारांना जुमानत नव्हते भाव देत नव्हते स्वयंभू होते पण शंकरराव कोल्हे पवारांना येऊन मिळाले, बघता बघता बारामतीला लागून असलेल्या या जिल्ह्यात पवारांनी पाय पसरायला सुरुवात केली आणि 1990 साली जेव्हा पवार मुख्यमंत्री झाले त्यांनी शंकरराव कोल्हे यांची खूप वर्षांची अतृप्त इच्छा पूर्ण केली, कोल्हेंना थेट त्यांच्या अतिशय आवडत्या सहकार खात्याचे मंत्री केले, पहिल्यांदाच पश्चिम महाराष्ट्रातून थेट उत्तर महाराष्ट्रात पवारांनी सहकार खाते वळविल्यामुळे पवारांचे नाशिक नगर धुळे जळगाव जिल्ह्यात प्रभावी नेतृत्व म्हणून त्यांनी पकड घेतली. मात्र पुढे हेच शंकरराव कोल्हे अंथरुणाला अनेक वर्षे खिळलेले असताना त्यांची जागा त्यांच्या मुलाने आणि सुनेने घेतली, कोपरगावच्या राजकारणात आणि सहकारक्षेत्रात विपीन आणि स्नेहलता कोल्हे यांनी देखील बघता बघता पकड घेतली मात्र बदलत्या राजकीय वातावरणात कधी नव्हे ते कोल्हे दाम्पत्याने गडकरी आणि फडणवीस यांच्या सहकार्याने भाजपात प्रवेश घेतला, आजच्या तारखेला वास्तविक विपीन स्नेहलता आणि त्यांचे अतिशय कर्तबगार चिरंजीव विवेक तसे फडणवीसांच्या खूपच जवळचे आणि लाडके पण त्यांच्यावर सवयीप्रमाणे अलीकडे पवारांची नजर पडली आहे आता कोणत्याही क्षणी पवार या तिघांवर झडप घेत त्यांना भाजपा आणि फडणवीस यांना तोडून आपल्याकडे खेचून आणतील असे वातावरण आज तरी निर्माण झाले आहे पण विधान सभा निवडणुकीच्या जीवघेण्या स्पर्धेतून भाजपाची साथ कोल्हे कुटुंबीयांनी सोडल्यास त्यांचे अधिक राजकीय नुकसान होईल असे नक्की आहे. हे लिखाण येथेच संपत नाही पण कौतुक त्या विवेक यांचे वाटते किंबहुना शंकरराव कोल्हे यांची विवेककडे बघतांना वारंवार आठवण येते, जसे तिकडे रोहित पवार यांच्याकडे बघतांना पदोपदी आप्पासाहेब पवार आठवतात तसे विवेक कडे बघतांना हमखास शंकरराव त्यांच्यात हुबेहूब असल्याचा पदोपदी भास होतो, विवेक उद्याचा नगर जिल्ह्यातला नक्की शंकरराव कोल्हे पद्धतीचा पुरून उरणार सहकारमहर्षी असेल…
क्रमश: पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी