महाआघाडी म्हणजे बड्या बड्या बाता अन वडापाव खाता :
इकडे मी राज्यातल्या कानाकोपऱ्यातले राजकारण लिहायचे बोलायचे आणि ज्या उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदार संघात गेली 36 वर्षे मी वास्तव्याला आहे त्यावर तुम्हाला नेमके न सांगणे म्हणजे एखाद्या चावट पोलीस पाटलाने गावातल्या चार पोरी पटवून ठेवायच्या अन त्याच्या बायकोने सालदार गड्याच्या प्रेमात आकंठ बुडावे त्यातला हा प्रकार ठरेल म्हणून उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदार संघाविषयी येथे तुम्हाला आज मी तंतोतंत सांगून लिहून मोकळा होणार आहे. महायुतीची हि जागा अर्थातच सुरुवातीपासून भाजपाच्या वाट्याला आलेली होती, येथून मोहित कंबोज यांना लोकसभा लढवायची होती पण अगदीच सुरुवातीला कंबोज यांच्या महागुरुंनी फडणवीसांनी, निवडणूक लढवू नका त्यांना सांगितल्याने पुढल्या क्षणी अगदी सहज निवडून येऊ शकणार्या कंबोज यांनी व्यक्तिगत महत्वाकांक्षा बाजूला ठेवत गुरूंची आज्ञा अमलात आणली त्यानंतर सतत या लोकसभा मतदार संघातून अनेक नावांची चर्चा होत असतांना त्यातले एकही नाव काही केल्या अंतिम ठरले नाही, अगदी आशिष शेलार पूनम महाजन पराग अळवणी अमित साटम सलमान खान माधुरी दीक्षित पासून तर जावेद अहमद आणि उज्वल निकम पर्यंत अनेक नावे घेतल्या जात होती विशेष म्हणजे माधुरी दीक्षितने आपणहून नकार कळविला होता मात्र साधारणतः 20 दिवसांपूर्वी जेव्हा जवळपास ऍडव्होकेट उज्वल निकम यांचे नाव निश्चित करण्यात आले लगेच विक्रांतने अनिकेत निकम यांना हि बातमी दिली जी त्यांनी उगाच हसण्यावारी नेली, वास्तविक आम्हाला हि बातमी लगेच समजली त्यावर नक्कीच अनिकेत मनातून घरातून अवाक झाले असावेत. पुढली माहिती अधिक महत्वाची आहे, उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघात दोघांच्या नावासभोवताली प्रचंड वलय आहे त्यापैकी एक आहेत अर्थातच आमदार आशिष शेलार आणि दुसरे देवेंद्र फडणवीस त्यात आता उमेदवार म्हणून ज्यांच्याविषयी मतदारांत आदर आणि उत्सुकता आहे ते उज्वल निकम, त्यामुळे उद्याचा निकाल नेहमीप्रमाणे आजच सांगतो, उज्वल निकम अति प्रचंड मताधिक्याने नक्की विजयी होतील आणि आनंदाने सभोवताली गोल गोल गिरक्या घेऊन मोकळे होतील…
www.vikrantjoshi.com
आमच्या उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदार संघात विविध धर्मीय विविध प्रांतातले विविध आर्थिक स्तरातले आणि ज्यांच्याविषयी जगाला आकर्षण आहे ते चित्रपटातले जवळपास सारेच शिवाय उद्योग क्षेत्रातले नामवंत थोडक्यात अख्ख्या भारतातला हा एकमेव आगळा वेगळा असा लोकसभा मतदार संघ आहे जेथे आशिष शेलार देवेंद्र फडणवीस मोहित कंबोज आणि उज्वल निकम या साऱ्याच विषयी मोठे आकर्षण आहे कौतुक आहे लोकप्रियता आहे आणखी महत्वाचे असे कि लोकसभेला उमेदवार कोण हे येथे अनेकदा फारसे महत्वाचे ठरलेले नाही कारण निवडणूक मग ती आमदारकीची असो कि नगरसेवक म्हणून किंवा खासदारकीची, या भागातली प्रत्येक निवडणूक पूर्णतः आशिष शेलार यांच्या भोवताली केंद्रित असते किंवा आशिष शेलार विरुद्ध विरोधी उमेदवार अशीच ती असते आणि प्रत्येक निवडणुकीत नेमके यश कसे मिळवायचे हि कला उत्तमरीतीने आशिष शेलार यांना साधली आहे, म्हणून पुन्हा तेच कि मंत्री म्हणून रग्गड कमावलेले त्या वर्षा गायकवाड यांनी उगाच लोकसभेला उधळून मोकळे होऊ नये, पैसेही जातील खर्च होतील आणि लोकसभा तर नक्कीच हातून त्यांच्या निसटणार आहे. उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदार संघातील जवळपास साऱ्याच नागरिकांना त्या देवेंद्र फडणवीसांना जवळून बघायचे भेटायचे आहे, डोळे भरून बघायचे आहे त्यात अर्थात वेगवेगळ्या सुंदर सुंदर नट्याही आल्याच, मी देवेंद्र फडणवीसांच्या जागी असतो तर त्यांचे बालपणीचे, जिवलग मित्र आमच्याच लोकसभा मतदार संघातले आल्हाद राजे यांच्या घरी मुक्कामाला राहिलो असतो. देवेनभौ येऊन जा. पूनम महाजन यांनी मला वाटते मागल्या वेळी निवडून आल्या दिवसापासूनच पुढली लोकसभा न लढविण्याचे ठरविले असावे कारण आमचे मतदार त्यांची सतत तुलना जगप्रसिद्ध जादूगार पी सी सरकार संगतीने हमखास करायचे एवढ्या त्या मतदारांपासून कायम गायब राहायच्या, बघता बघता अचानक दिसेनाशा व्हायच्या मधेच कधीतरी एखाद्या वेळी एखाद्या बुवा बाबासारख्या प्रकट व्हायच्या, वास्तविक अगदी थोड्याफार जरी त्या लोकांमध्ये मतदारांमध्ये मतदार संघात अमुक एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमात मिसळल्या असत्या, या ना त्या कार्यक्रमनिमित्ते जर त्यांचे अधून मधून पूनम म्हणजे पौर्णिमेच्या चंद्रासारखे दर्शन लोकांना घडले असते झाले असते तर प्रमोद महाजनांच्या या कन्येएवजी इतर कुठल्याही नावाचा नक्की विचार झाला नसता. लोकसभेऐवजी पूनम महाजन यांना विधान परिषदेवर घेण्याचे जवळपास नक्की झाले आहे तशी कल्पना त्यांनाही देण्यात आल्याने पंकजा पद्धतीने पूनम यांनी आदळआपट केल्याचे कुठेही ऐकण्यात आले नाही, आधी विधान परिषद त्यानंतर मंत्रिमंडळात स्थान हेही नसे थोडके…
तूर्त एवढेच : पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी.