खळबळजनक : उद्धव उध्वस्त आणि ठाकरे समस्त ..
उद्धव ठाकरे यांचे दिवस फिरले आहेत किंबहुना उद्धवजी आणि कुटुंबीयांनी वेळेआधीच राजकारणातून बाहेर पडावे आणि कुठेतरी थंड हवेच्या ठिकाणी मस्त दिवस घालवावेत. मोदी, शाह यांचे हे आता नक्की ठरले आहे कि उद्धव यांच्या या दिवसातल्या विनंतीला अजिबात मान द्यायचा नाही त्यांना जवळ करायचे घ्यायचे नाही. दिवंगत बिंदा ठाकरे यांचे व्यवसायाने उत्तम वकिली करणारे चिरंजीव निहार नाही म्हणायला एकनाथ शिंदे यांच्या एका जाहीर सभेत अगदी पहिल्या रांगेत मुद्दाम हजेरी लावून गेले, त्यांना राजकारणात कवडीचा देखील रस नाही पण आम्ही देखील उद्धव काकांच्या विरोधात आहोत हा मेसेज त्यातून त्यांनी राज्याला सांगून टाकला. मात्र याच निहार यांचे सासरचे सारे नामवंत राजकारणी आहेतच पण माजी मंत्री हर्षवर्धन पाटलांची सुकन्या आणि निहार यांची पत्नी अंकिता, उत्तम राजकारणी आहेत, उच्चशिक्षित आहेत त्यांना इंदापूर बारामती परिसरात उत्तम तरुण महिला नेत्या म्हणून मान आहे डिमांड आहे. नजीकच्या काळात अंकिता जेव्हा राजकारणात मोठी झेप घेऊन मोकळ्या होतील, उद्धव ठाकरे आणि कुटुंबियाला ती फार मोठी चपराक बसलेली असेल. नाही म्हणायला स्मिता जयदेव ठाकरे यांना देखील एकनाथ शिंदे यांनी ते मुख्यमंत्री झाल्यानंतर पुन्हा एकवार राजकारणात पुढे येण्या संधी दिली होती, स्मिता यांनी आयोजित केलेल्या एका सांस्कृतिक कार्यक्रमात देखील जाणून बुजून एकनाथजी यांनी हजेरी लावली होती पण पुन्हा तेच म्हणजे केवळ उत्पन्न मिळवून देणाऱ्या कामांमध्ये स्मिता यांनी यावेळीही दाखवलेला रस, विशेषतः एकनाथजी आणि त्यांच्या शिवसेना नेत्यांना ते फारसे रुचले नाही, हे मला खुद्द शिंदे यांच्याच एका मंत्र्याने बोलण्याच्या ओघात सांगितले, पुन्हा एकदा पूर्वीच्या स्मिता ठाकरे या शिंदे व त्यांच्या नेत्यांना न रुचणाऱ्या ठरल्या अन्यथा उद्धव ठाकरे याना पुन्हा एकवार या भावजयीचा राजकीय जाच नक्कीच सहन करावा लागला असता….
दुसऱ्याच्या खांदयावर बंदूक ठेवून तिसऱ्याच खात्मा करण्यात उद्धव एकदम तरबेज, त्यांनी राज यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून स्मिता ठाकरे यांना आधी घराबाहेर काढले, बाळासाहेबांपासून दूर नेऊन ठेवले आणि सारी सूत्रे स्वतःकडे घेऊन याच उद्धव यांनी एकदिवस राज यांचा देखील असा काटा काढला कि राज यांना आधी थेट बाळासाहेबांपासून दूर व्हावे लागले नंतर सेनेतून बाहेर पडावे लागले. राज यांची हिम्मत आणि त्यांचा सकारात्मक राजकीय दृष्टिकोन त्यांना आजतागायत त्यातून राजकीय जिवंतपणा आला अन्यथा राज यांचा देखील नक्की स्मिता ठाकरे झाला असता, त्यांचा राजकारणातला भगवान दादा झाला असता.
अलीकडे राज ठाकरे दिल्लीत जाऊन अमित शाह यांना भेटले त्यांच्यात बोलणी झाली. राज ठाकरे अमित शाह भेट हा टाइम पास नव्हता किंवा राज हे अमितजींकडे हळदीकुंकवाला गेले नव्हते किंवा ढोकळा फरसाणा वर ताव मारायला गेले नव्हते, त्या दोघांची भेट नजीकच्या काळात राज्याचे राजकारण ढवळून काढणारी नक्की ठरणार आहे, त्यातून राज यांचे राजकीय व्यथित व सत्तेविना आजतागायतचे आयुष्य त्यांना मोठी राजकीय ताकद देणारे ठरेल. येत्या लोकसभा किंवा त्यानंतरच्या निवडणुकात मनसे महायुतीमध्ये दाखल, वरकरणी जे तुम्हाला दिसते आहे दिसलेले आहे तेवढे हे प्रकरण सोपे नाही तर राज आणि अमित शाह भेटीतून राज्यातील राजकारण संपूर्णपणे ढवळून निघणार असून त्यातून जबरी धक्का फार मोठा हिसका १००% उद्धव ठाकरे यांना त्यांच्या शिवसेनेला बसणार आहे…
केवळ उद्धव यांचे नशीब फार बलवत्तर असेल म्हणजे चुकून जर केंद्रात मोदी सरकार आले नाही, तरच नजीकच्या काळात उद्धव ठाकरे आणि कुटुंबियांवर येणारे राजकीय संकट टळू शकते अन्यथा उद्धव यांचे काहीही खरे नाही, फारच वेगळ्या पद्धतीने एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांचे एकत्रीकरण घडवून आणण्याचे नक्की ठरलेले आहे… गेल्या अनेक वर्षांपासून राजकरणात तेही सत्तेविना कसेबसे तग धरून असलेले राज ठाकरे या एकत्रीकरणानंतर उद्धव यांना मागे टाकून थेट बाळासाहेबांची प्रतिकृती नजीकच्या भविष्यात नक्कीच राज्याला बघायला मिळेल, विशेष म्हणजे एकनाथ शिंदे यांनी भाजपाला दिलेली उत्तम साथ, त्यांची राजकीय वाटचाल अतिशय स्थिर आणि त्यांच्या राजकीय वाटचालीला कायम दिलासा देणारी ठरेल. शिवसेना प्रमुख इतर कोणीही नको तो केवळ ठाकरे कुटुंबाबातलाच असावा, मराठी माणसाची हि इच्छा, शाह व मोदी नेमकी पूर्ण करतील, हे आजच माझे वाक्य लिहून घ्या…
तूर्त एवढेच : पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी.