फडणवीसांबाबत कबूलनामा, तुम्ही वाचायलाच हवा :
कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्याला आणि कुठल्याही महत्वाच्या शासकीय प्रशासकीय अधिकाऱ्याला आम्ही अगदी जवळून पारखत निरखत असतो म्हणून येथे मी उपमुख्यमंत्री, भाजपा नेते देवेंद्र फडणवीस बाबत ठामपणे कबूल करतो, जाहीर सांगतो कि त्यांचे अगदी सुरुवातीला जे ठरले, ना खाऊंगा, त्यावर ते आजही ठाम आहेत, प्रसंगी त्यांचा विरोधक किंवा असलाच एखादा शत्रू तर तो देखील हेच सांगेल, देवेंद्र फडणवीस व्यक्तिगत, कुठल्याही कोणत्याही भ्रष्टाचारापासून कोसो दूर आहेत, दूरदूरपर्यंत त्यांचा त्यात संबंध नाही हात नाही, त्यांना स्वतःसाठी काहीही कधी मिळवायचे कमवायचे नसते, राहिला उरला प्रश्न, ना खाने दूंगा, बाबत त्यावर जे मला नेमके माहित आहे ते येथे मी सांगणार आहे, फक्त पुढली पाच वर्षे त्यांना तुम्ही द्या, उभ्या महाराष्ट्राला ते अगदी शंभर टक्के भ्रष्टाचारमुक्त करून सोडतील, याच दोन प्रमुख आणि महत्वाच्या मुद्द्यांवर जात पात मतभेद शत्रुत्व राजकीय विरोध विसरून तुम्हा सर्वांना लोकसभा आणि पाठोपाठ येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पाठीशी भरभक्कम पणे नक्की उभे राहावयाचे आहे किंवा ते ज्यांच्याकडे बोट दाखवतील त्या उमेदवारांना निवडून तेही तुम्हाला आणायचे आहे. देवेंद्रजींच्या आई सरिता असतील किंवा लाखो करोडो त्यातले जे त्यांना सतत किंवा अनेकदा अगदी जवळून बघतात त्या सर्वांना त्यांच्याविषयी जी काळजी असते ती अतिशय रास्त अशीच आहे कि व्यक्तिगत कुठलीही काळजी पर्वा चिंता न करता देवेन्द्रजी भल्या पहाटेपासून तर रात्री फार उशीरपर्यंत दररोज ज्यापद्धतीने कार्यमग्न कार्यव्यस्त असतात, राहतात आणि पायाला भिंगरी लागल्यागत दर दिवशी तेही सतत इकडून तिकडे आणि तिकडून इकडे नको तेवढी फिर फिर करतात अजिबात आराम न करता, जीवाची काळजी न घेता न करता जे फारच कमी नेत्यांना जमते किंवा जमलेले आहे, राजकारणात सार्वजनिक जीवनात दीर्घकाळ तंदुरुस्त टिकून राहण्यासाठी ते योग्य आहे का, त्यावर जर तुमचेही उत्तर ‘ नाही ‘ हेच असेल तर जेथे जेथे ज्यांना ज्यांना म्हणून फडणवीस नजरेत पडतील, भेटतील त्यातल्या प्रत्येकाने त्यांना अगदी ओरडून सांगायचे आहे, थोडासा वेळ स्वतःसाठी काढा…
www.vikrantjoshi.com
आता नेमक्या विषयाकडे वळतो. आज काल नव्हे, काल परवा नव्हे तर शिवसेना भाजपा युती जेव्हा सत्तेत आली आणि राज्यातला पहिला मुंबई पुणे केवळ 91 किलोमीटर लांबीचा महामार्ग तयार झाल्यानंतर ज्या झपाट्याने संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राची प्रगती केवळ नितीन गडकरी यांच्या या महत्वाकांक्षी प्रकल्पातून आणि प्रयत्नातून झाली, हा असा महामार्ग जर नागपूर ते मुंबई दरम्यान उभारल्या गेला तर अख्खा विदर्भ आणि मराठवाडा तसेच उत्तर महाराष्ट्र अगदी शंभर टक्के दारिद्र्यातून, विविध आपत्तीमधून अगदी सहज बाहेर पडून या अख्य्या परिसराचा कायापालट होईल, हे त्याकाळी त्यावेळी दूरवर विचार करणारे होते, अगदीच कोवळ्या वयातले देवेंद्र फडणवीस पण त्यांच्या हाती त्याकाळी काहीही नव्हते, दुर्दैवाने 2001 नंतर भाजपाकडे राज्याची सत्ता नव्हती, जेव्हा सत्ता आली तेव्हा परमेश्वराची कृपा नेमकी फडणवीसांवर झाली आणि ते थेट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, सत्तेतला अनुभव अजिबात नव्हता पण कधी भाजपा प्रदेशाध्यक्ष म्हणून तर कधी सभाग्रुहातला विरोधी पक्ष नेता म्हणून तर कधी नागपूरचे महापौर म्हणून नाही म्हणायला विविधांगी अनुभव नक्कीच होता, आळस ठाऊक नव्हता आणि प्रत्येक विषयात वाचन होते, संघाचे विचार मनात खोलवर रुजलेले रुतलेले होते आणि जोडीला होती प्रखर देशभक्ती जहाल देशप्रेम, त्याभरवशावर अगदी आपल्या समोर केवळ काही वर्षात कधी सत्तेत असून तर मधेच विरोधात बसून, सतत अनेक कटकटींचा सामना करत फडणवीसांनी एक नव्हे तर अनेक विविध बहुसंख्य महत्वाकांक्षी भव्यदिव्य असे विविध प्रकल्प अल्पावधीत प्रत्यक्षात उतरविले आणि त्यापैकी एक जबरी महत्वाकांक्षी प्रकल्प होता, राज्याचा संपूर्ण कायापालट करणारा आणि राज्याच्या अविकसित भागाला दारिद्र्याच्या खाईतून बाहेर काढणारा, राज्याच्या प्रगतीमध्ये आंतरराष्ट्रीय महत्व वाढविणारा, राज्याचे आधुनिक सौंदर्य खुलविणारा समृद्धी महामार्ग !! जशी अगदी सुरुवातीला मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वर फारशी वर्दळ नव्हती, आज कदाचित ते तसे तुम्हाला काही प्रमाणात समृद्धी महामार्गावर देखील पाहायला मिळत असेल पण एकदा का पुढल्या काही महिन्यात बाकी राहिलेला केवळ 70 किलोमीटर लांबीचा समृद्धी पूर्ण झाला रे झाला कि बदललेला झापाऱ्याने बदलणारा हा उर्वरित महाराष्ट्र तुम्हला नक्की बघायला मिळेल आणि हे असे कायापालट घडवून आणणारे नेतृत्व राज्याला हवे किंवा नको, हा सवाल नक्कीच देवेंद्रप्रेमी तुम्हाला विचारून मोकळे होतील…
येथे याठिकाणी केवळ समृद्धी महामार्गावर बोलायचे सांगायचे झाल्यास समृद्धी म्हणजे हास्यजत्रा कार्यक्रमातील गौरव मोरे म्हणजे अगदी बोहल्यावर चढल्यानांतर देखील जसे प्रत्येकवेळी गौरवचे लग्न या ना त्या निमित्ताने मोडते नेमके ते तसेच आजवर समृद्धी महामार्ग पूर्ण होता होता हुबेहूब घडले आहे, केवळ 2015 दरम्यान समृद्धी जन्माला आला पण 2015 ते 2024 दरम्यान असे कितीतरी सततचे छोटे मोठे गंभीर प्रसंग आणि व्यत्यय कि समृद्धी उभारणाऱ्यांना वाटायचे कि आता हा प्रकल्प शंभर टक्के बासनात नक्की गुंडाळल्या जाणार आहे पण फडणवीसांची पुण्याई आणि हुशारी त्यांना प्रत्यक्ष मिळालेली विशेषतः एकनाथ शिंदे आणि काही शासकीय अधिकाऱ्यांची साथ, जेव्हा मी समृद्धी महामार्गातले खर्या अर्थाने आलेले अडथळे तुम्हाला सांगून मोकळा होईल, तुमच्याही अंगाचा थरकाप उडेल पण म्हणतात ना कि उत्तम कार्यात अडथळे आणणारयांचे वाटोळे होते आणि शेवटी सिनेमातल्या खलनायकाचा जसा वाईट अंत होऊन हिरो जिंकतो तेच नेमके येथे या भव्यदिव्य प्रकल्प उभारणीत घडले आहे, फडणवीसांचे मोठे स्वप्न शेवटी प्रत्यक्षात उतरले आहे. विशेष म्हणजे स्वतः शरद पवारांना काहीही झाले तरी समृद्धी महामार्ग पूर्णत्वाला जाऊ द्यायचा नव्हता, दुर्दैवाने मधेच ते स्वतःच सत्तेत जेव्हा आले तेव्हा आता सारे काही संपले आशा मावळल्या असे त्यात काम करणाऱ्या अनेकांना वाटले कारण शरद पवार हे त्यातले छोटेमोठे नव्हे तर महाखलनायक होते, सिनेमातल्या अमरीश पुरी मदन पुरी प्रेम चोप्रा रणजित शक्ती कपूर पेक्षा कितीतरी अधिक पटींनी खतरनाक होते, देवेंद्र फडणवीसांना मिळणारे श्रेय त्यांना स्वप्नात देखील मान्य नव्हते पण परमेश्वरी चमत्कार जणू घडले आणि अनेक अडथळे पार करीत फडणवीसांचे स्वप्न अखेर साकारले…
तूर्त एवढेच : हेमंत जोशी