बारामतीचे महाभारत : घनघोर युद्धाला सुरुवात
लेखाची सुरुवात एका मोठ्या गौप्य्स्फोटाने करतो! लोकसभा निवडणुका आटोपल्या कि ‘भोर’ विधानसभा मतदार संघाचे आमदार संग्राम अनंतराव थोपटे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार एकत्र बसवून ठरवतील कि अस्वस्थ संग्राम थोपटे यांनी नेमकी आणि नक्की विधानसभा कोणाकडून लढवायची आहे? म्हणजे अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून कि भाजपातर्फे… कारण संग्राम थोपटे त्यांच्यावर सतत अन्याय झाल्या कारणाने तसेही फार पूर्वीपासून काँग्रेस हाय कमांडवर रुसून आहे, नाराज आहेत… आज ना उद्या पुणे जिल्ह्यातली हि मोठी ताकद काँग्रेसला कमकुवत करणार हे अगदी उघड होते, मधेच अजित पवार कांड घडल्याने थोपटे यांच्या भाजपा प्रवेशाला विलंब झाला हे खरे आहे, पण लोकसभा निवडणुका आटोपताच थोपटे आणि त्यांचे भोर विधानसभा मतदारसंघातले कार्यकर्ते मोठ्या संख्येने काँग्रेसला सोडचिठ्ठी देतील हे आता उघड सत्य आहे… थोपटे आपल्या पाठिराख्यांसहित बहुदा भाजपामध्ये जातील अशी माझी माहिती आहे, पण आधी अनंतराव आणि आता संग्राम, दोघेही बाप बेटे अगदी सुरुवाती पासून शरद पवार यांचे कट्टर आणि उघड विरोधक किंबहुना अनंतराव कायम त्या विलासराव देशमुख यांच्या पाठीशी उभे असायचे; त्यातून पवारांशी वेळोवेळी अगदी सहज पंगा घेणे त्या विलासराव देशमुख यांना शक्य होत असे… वास्तविक थोपटे घराणे तशी पुणे जिल्ह्यातली काँग्रेस पक्षाची मोठी ताकद पण संग्राम यांना नेमके त्यांच्या नेत्यांना सांभाळता आलेले नाही म्हणून संग्राम यांचे नक्की ठरले आहे, त्यांना काँग्रेस सोडायची आहे…
नेमक्या विषयाला हात घालतो, बारामती मध्ये घनघोर अघोर राजकीय युद्धाला सुरुवात झालेली आहे हे तुम्हाला सांगणे म्हणजे, राग अनावर झाल्यानंतर एकनाथ शिंदे स्वतःच जागेवरून उठतात आणि ज्याचा राग आलेला आहे त्याला एकट्यात गाठून धपाधप मारतात हे नरेश म्हस्केला सांगण्यासारखे!! अख्य्या पवार कुटुंबाचे जे नेमके आणि नक्की ठरले आहे ते त्यांनी थेट अजित पवार यांना प्रत्यक्ष गाठून सांगून टाकले आहे कि जरी येणारी लोकसभा हि सुनेत्रा वाहिनी विरुद्ध सुप्रिया सुळे अशी असली, तरी किंवा मनोमन इच्छा असली तरीही, लोकसभा निवडणुकीत आम्ही सारे अगदी उघड सुप्रियाताई यांचाच मन लावून मनापासून जातीने हिरिरीने प्रचार करणार आहोत… प्रसंगी सुनेत्रावहीनींना वाकुल्या दाखवायच्या झाल्या किंवा काळे झेंडे दाखवायला प्रसंगी तुम्हा दोघांच्या विरोधात घोषणाबाजी करयलाही आम्ही अजिबात मागे पुढे बघणार नाही कारण ज्या पद्धतीने गेली पन्नास वर्षे पवार घराण्याशी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष नातेसंबंध असणाऱ्या प्रत्येकाच्या पाठीशी ज्या पद्धतीने शरदराव उभे राहिले आहेत, सर्वोतपरी सहकार्य केले आहे, त्यातून या अशा कठीण प्रसंगी जरी आमची द्विधा मनस्थिती असली तरीही आम्ही सुप्रियाताई यांच्या प्रचारात सहभागी होऊ, हे आमचे ठरलेले आहे. विशेषतः आधीपासूनच आप्पासाहेब पवारांचे घर आणि आता तर अजितदादांचे पुतणे, युगेंद्र, तसेही अजितदादांच्या विरोधात होते आहेत किंबहुना जरी आजोबा शरद पवार यांच्या दरबारी रोहित पवार यांना फारशी किंमत नसली तरीही आई सुनंदा पवार यांच्या सूचनेवरून रोहित पवार यांनी कायम अजितदादा यांच्याकडे दुर्लक्ष करीत आजोबा शरदरावांच्या सभोवताली कोंडाळा करण्यात धन्यता मानलेली आहे. अत्यंत महत्वाचे म्हणजे जे पवार कुटुंब सदस्य आज उघड उघड ज्या सुप्रियाताई यांच्या पाठीशी उभे आहेत, मात्र त्यातले अनेक सदस्य विधान सभा निवडणुकीत प्रसंगी अजितदादा यांना पाठिंबा देऊन मोकळे होतील…
आणखी एक महत्वाचा मुद्दा असा कि, येणारी होणारी बारामती लोकसभा निवडणूक हि शरद पवार विरुद्ध अजित पवार अशी आहे, हा जर तुमचा समज असेल तर मनातून काढून टाका. जे नेमके घडणार आहे ते फार धक्कादायक शॉकिंग आहे. बारामती लोकसभा निवडणूक हि शरदराव विरुद्ध अजितदादा अशी नक्की आहे, पण, त्यापलीकडे जे स्वप्न गेली सतत पन्नास वर्षे भाजपा बघते आहे म्हणजे शरद पवार यांचा राजकीय खात्मा थेट बारामारीमधूनच करायचा ते त्यांचे स्वप्न त्यांना यावेळी प्रत्यक्षात उतरवायचे आहे… थोडक्यात होणारी बारामती लोकसभा निवडणूक हि सुप्रियाताई विरुद्ध सुनेत्रावहीनी, शरद पवार विरुद्ध अजितदादा, शरद पवार विरुद्ध थेट नरेंद्र मोदी आणि अमित शाह किंवा शरद पवार विरुद्ध कसलेला गडी देवेंद्र फडणवीस, अशी थेट आहे; आणी यावेळी काहीही करून भाजपाला महाराष्ट्रातली शरद पवार यांची थेट पन्नास वर्षांची राजकीय मक्तेदारी नक्की मोडीत काढायची आहे, या घनघोर लढाईत मग ते हर्षवर्धन पाटील असतील किंवा राहुल कुल किंवा संग्राम थोपटे किंवा त्याभागातले अन्य प्रभावी नेते जे भाजपाला मनापासून सहकार्य करतील त्या साऱ्यांचे राजकीय भले करून त्यांना कायमस्वरुपी शरद पवार विरुद्ध प्रभावी नेतृत्व म्हणून उभे करायचे हे, असे स्वतः नरेंद्र मोदी यांनी देवेंद्र फडणवीसांना सांगून ठेवले आहे. थेट रणांगणावर जेथे जेथे आजकाल अजितदादांचा समोर काका असल्याने अर्जुन होतो, त्या प्रत्येक क्षणी याच दादांच्या पाठी कणखर उभे राहून त्यांना आजच्या राजकारणातली गीता समजावून सांगत पून्हा दादा मागे फिरणार नाहीत याची मोठी काळजी स्वतः फडणवीस घेत असतात, घडणारे प्रसंग मी एक दिवस नक्की तुम्हाला सांगून मोकळा होणार आहे…
पत्रकार हेमंत जोशी