अभूतपूर्व काम : बार बार तुझको सलाम !!
नेमका ढोपरापासून सलाम ठोकावा कुणाला, शिंदे फडणवीस कि अश्विनी भिडे यांना कि या तिघांनाही. सुरुवातीलाच सांगतो कि महाराष्ट्रात अलीकडे काही प्रकल्प आले उभे राहिले पण ज्यांच्या हातून काही महत्वाकांक्षी प्रकल्प उभे राहिले त्यांनी आधी आपल्या कुटुंबाचे पुढल्या किमान दहा पिढ्यांचे हित साधले, कुटुंबाच्या ‘ समृद्धी ‘ मध्ये भर घालून देशात तसेच परदेशातही अतिप्रचंड गुंतवणुकीचे मोठाले इमले बांधले, थोडक्यात आधी कुटुंबाचे भले नंतर राष्ट्राचे राज्याचे हित अशांनी साधले पण आधी मेट्रो त्यापाठोपाठ देशातला पहिला समुद्री मार्ग एकाचवेळी सांभाळणार्या एकाचवेळी जवळपास पूर्णत्वाला नेणाऱ्या प्रशासकीय अधिकारी अश्विनी सतीश भिडे, म्हणजे समोर मिठाईचे भले मोठे ताट मांडून ठेवले असतांना, वाढून ठेवलेले वाढून आणलेले ताट माझ्यासाठी नाही असा संकल्प सोडून सारे काही केवळ राष्ट्रसाठी, राष्ट्राच्या भल्यासाठी, सात्विक देशप्रेमाने ओथंबून ओसंडून वाहणारे अश्विनी भिडे यांचे कार्यतत्पर कर्तव्यपर जिणे, बार बार तुझको सलाम, म्हणायला भाग पाडते. समृद्धी असेल किंवा मेट्रो किंवा मुंबईतला देशातला पहिला कोस्टल रोड, याचे जनक अर्थातच देवेंद्र फडणवीस पण सुरुवातीपासून साथीला मदतीला सहकार्याला ते एकनाथ शिंदे, ज्यांची या प्रकल्पांमध्ये कधीही आडकाठी नव्हती म्हणून बघता बघता महायुतीच्या फडणवीसांनी हे तीन प्रकल्प प्रत्यक्षात उतरविले, पुढल्या पाच वर्षात हे असे आणखी आणखी तुम्हाला भव्य दिव्य असे नक्की बघायला मिळणार आहे. एक प्रशासकीय तेही महिला अधिकारी एकाचवेळी घर आणि नोकरीतले कर्तव्य सांभाळतांना भिडे मॅडम तुम्ही दाखविलेला संयम, बघणार्याच्या अंगावर काटा उभा राहतो आणि कौतुकाने पुन्हा तेच शब्द बाहेर पडतात, बार बार तुझको करते है सलाम…
www.vikrantjoshi.com
अश्विनी भिडे यांच्यावर प्रामुख्याने जबाबदारी भव्यदिव्य पण तेवढ्याच कटकटीच्या अवघड अशा मेट्रो प्रकल्पाची त्याचवेळी क्लिष्ट अशा पहिल्यावहिल्या मुंबईतल्या कोस्टल मार्गाची, जेथे केवळ ऐकून बेशुद्ध पडायला होते तेथे एकाचवेळी धीरोदात्त मनाने गांभीर्याने भिडे यांनी पेललेले हे दुहेरी आव्हान, अतिशय कठीण असे काम पण संभाव्य अशा अनेक अडचणींवर मात करीत कधी नेत्यांचा तर कधी मुंबईकरांचा जाच त्रास ताण सहन करीत अत्यंत धाडसाने त्या ज्या पद्धतीने जबाबदारी पार पडताहेत, राज्यातल्या प्रत्येकाचा एक लाईक त्यांच्यासाठी बनतो हे नक्की आहे. मे 2024 अखेर कोस्टल रोड पूर्ण होईल आणि मुंबईकर ट्राफिकच्या जाचातून मोकळा श्वास घेतील त्रासातून बऱ्यापैकी मुक्त होतील वरून या समुद्री मार्गामुळे मुंबईच्या सौंदर्यात मोठी भर पडेल हे वेगळे सांगायची गरज नाही. कोस्टल रोडची सुरुवात ज्या मारिन ड्राइव्ह पासून होणार आहे, या दिवसातला एकेकाळचा आणि आजचा देखील मुंबईकरांच्या कौतुकाचा हा मारिन ड्राइव्ह ब्रिज त्याची आजतागायत विशेष देखभाल न केली गेल्याने तो दुर्लक्षित झाल्याने या कोस्टल रोड समोर अगदी सुरुवातीला म्हणजे एखाद्या मादक सौंदर्यवतीचे डोळे चकणे असल्याचा हा प्रकार, महापालिकेला पर्यायाने अश्विनी भिडे, उपायुक्त, मुंबई महापालिका यांनाच हात जोडून विनंती, सारी कामे बाजूला ठेवा पण आधी त्या मारिन ड्राइव्हला सुशोभित करून त्याला पुन्हा प्रेक्षणीय करा. अलीकडे हा ब्रिज उतारवयातली आजची वैजयंती माला दिसतो. मुंबई कोस्टल रोड कधी समुद्राच्या आतून तर कधी समुद्राला भेदून तर कधी थेट जमिनींना छेदून ट्राफिक वर मात करतो, बघणार्यांच्या तोंडून कौतुकाचे आणि आश्चर्याचे गौरवोद्गार आपोआप बाहेर पडतात….
देवेन्द्रजी, तुम्ही जी स्वप्ने बघितली तुमच्या अधिकाऱ्यांनी ती पूर्णत्वाला नेली आणि अश्विनी भिडे तर टाकलेली कोणतीही जबाबदारी पार पाडणाऱ्या एक महत्वाकांक्षी मेहनती आणि प्रामाणिक प्रशासकीय अधिकारी ज्यांनी तुमचे आणखी एक स्वप्न बघता बघता पूर्ण केले, मुंबईच्या सौंदर्यात भर घातली आणि 45 मिनिटाचे अंतर केवळ आठ मिनिटात पूर्ण करणारे हे कोस्टल रोडचे आश्चर्य प्रत्यक्षात उतरविले. एकाचवेळी सौंदर्यीकरण त्याचवेळी ट्राफिकच्या कटकटींवर मात, फडणवीस तुमच्यासारखे राज्यकर्ते आणि अश्विनी भिडे यांच्यासारख्या प्रशासकीय अधिकारी, हे कॉम्बिनेशन माझ्यासारख्या चिकित्सक पत्रकाराला सुद्धा कौतुक करायला भाग पाडतात. विशेष म्हणजे टोल विरहित हा समुद्री महामार्ग, प्रवास करणाऱ्यांच्या खिशाला भुर्दंड न पाडता त्यांच्यासाठी आरामदायी ठरतो, त्यावर कौतुकाला शब्द कमी पडतात. सतत राजकीय भानगडी पण अधून मधून जेव्हा हे असे काहीतरी अत्युत्तम घडते, आशीर्वादाची थाप नक्कीच अगदी मनापासून द्यावीशी वाटते…
तूर्त एवढेच : हेमंत जोशी