खळबळजनक ! भुजबळ अडचणीत आले,
घरभेद्यांचे पुढे काय झाले !!
माणूस उगाच मोठा नसतो किंवा उगाच मोठा होत नाही. अगदी अलीकडे सकाळी साडे पाच पावणेसहाची वेळ, कुठल्याशा महत्वाच्या विषयावर मला खासदार डॉ श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्याशी व्हाट्सअप मेसेज करून बोलायचे होते, तो मी केल्यानंतर पलीकडून केवळ शून्य मिनिटात उत्तर आले, बापसे बेटा सवाई, एकनाथजी त्या आनंद दिघे पद्धतीने फारतर चार ते पाच तास झोपतात, जागे असतांना एकही क्षण आराम नाही, कार्यकर्त्यांच्या घोळक्यात एखाद्या सामान्य माणसासारखे गुंतलेले रमलेले असतात जेवण, आराम सारे काही विसरून, श्रीकांत शिंदे बापाच्या पावलावर पाऊल, मस्तीत अंथरुणावर न लोळता सदैव कार्यव्यस्त. तुम्ही न वाचलेले तुम्हाला माहित नसलेले मंत्री छगन भुजबळ विविध गौप्य्स्फोटांसहित मला येथे विस्तारून सांगायचे आहेत, माझे लिखाण माझे बोलणे त्यांना बोचले टोचले तरी चालेल. अटलबिहारी वाजपेयी एका बैठकीत प्रत्यक्ष भेटीत थेट बाळासाहेब ठाकरे यांना म्हणाले होते, हमारे पास बुध्दिबल है और आपके पास भुजबल है, युती होनीही चाहिये, असे म्हणतात कि बाळासाहेबांनी तेथल्या तेथे भाजपा शिवसेना युतीला होकार दिला त्यानंतर खऱ्या अर्थाने शिवसेनेला भाजपाला हिंदुत्वाला मोठे महत्व प्राप्त झाले आणि आज त्यातूनच जगातले हिंदुस्थानातले महाराष्ट्रातले समस्त हिंदू एकवटले एक झाले कधी नव्हे ते वाजपेयी ठाकरे व मोदी यांच्याचमुळे हिंदूंचे महत्व जगात वाढले, जगाला हिंदूंचे मूल्य ध्यानात आले, एकेकाळी या राज्यातले पहिल्या पाच दहा मधले छगन भुजबळ भले आज मंत्री असतील पण पवार, महाजन आणि बाळासाहेबांच्या रांगेतले भुजबळ नेतृत्वाच्या बाबतीत कुठेतरी हरवल्यासारखे किंवा खूप काही गमावून बसल्यासारखे वाटताहेत भासताहेत, नाही का? त्यांच्याही मनाची अवस्था, आवडते खेळणे हरविलेल्या लहान मुलाच्या विमनस्क मनासारखी नक्कीच झालेली असावी…
www.vikrantjoshi.com
वरकरणी बघतांना असे वाटते कि शिवसेना सोडल्यानंतर ज्यांच्या सांगण्यावरून अचानक ज्या भुजबळांनी आपल्या पाठीराख्या आमदार आणि राज्याच्या कानाकोपर्यातील असंख्य अनंत शिवसैनिकांसहित शिवसेना सोडली त्यानंतर अगदी आत्ताआत्ता पर्यंत भुजबळ यांना शरद पवार यांनी सांभाळून घेतले, वेळोवेळी सत्तेत ठेवले पण वस्तुस्थिती नेमकी ती तशी नाही तुमचा तो गैरसमज झालेला आहे याउलट भुजबळांची लोकप्रियता आणि राजकीय ताकद बघून त्यांना पवारांनी एकीकडे पदे दिली पण दुसरीकडे मोठ्या खुबीने लबाडीने त्यांचे राजकीय खच्चीकरण केले ज्यामुळे देशात मोठे होणारे भुजबळ केवळ राज्यापुरते किंवा शरद पवारांच्या पक्षापुरते मर्यादित राहिले आणि मनोमन अस्वस्थ झाले केवळ ते निधड्या छातीचे अन्यथा स्टेजवरून अपमानित करून उद्धव यांनी खाली उतरवून दिल्यानंतर पंतांनी जसे कायमचे आजतागायत अंथरून पकडले नेमके तेच भुजबळ यांचेही झाले असते, संघर्ष त्यांच्या पाचवीला पुजलेला, म्हणून पूर्वीचेच भुजबळ तग धरून आहेत अन्यथा त्यांचा खिलोना मधला संजीव कुमार झाला असता, रस्त्यावर ते सैरावैरा धावत सुटले असते किंवा अनिल थत्ते पद्धतिने रंगभूषा वेशभूषा करून गावभर वावरले असते. शरदराव खाजगीत सांगतात कि भुजबळ आपल्या पुढे निघुन जाऊ शकतात हे जर माझ्या सुरुवातीला लक्षात आले असते तर मी त्यांच्या शिवाय त्यावेळी शिवसेना फोडली असती, थोडक्यात पवार भुजबळांच्या झंझावाताला बघून मनातून एवढे हादरले कि त्यानंतर त्यांनी अगदी नियोजनपूर्वक भुजबळांचे पंख छाटले आणि पवारांवर जो विसंबला त्याचा सत्यानाश झाला हे जे मला विलासराव देशमुख म्हणायचे तेच छगन भुजबळ विशेषतः उद्धव ठाकरे किंवा सुधाकरराव नाईक यांच्या राजकीय कारकिर्दीकडे बघतांना सतत जाणवते….
एकदा नव्हे दोनवेळा फक्त आणि फक्त त्या शरद पवारांवर विश्वास ठेवल्याने छगन भुजबळ यांचे मुख्यमंत्रीपद हुकले हे मी येथे जाणीवपूर्वक सांगतो आहे म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर शिवसेनेत मनोहर जोशी नव्हे तर छगन भुजबळ बाळासाहेबांचे उजवे हात मानले जायचे किंबहुना अख्ख्या राज्यात बाळासाहेबांच्या खालोखाल फक्त आणि फक्त भुजबळ यांचा दरारा होता, भाषण ऐकायला बाळासाहेबांची तीच गर्दी भुजबळांच्या सभेला जमायची. विशेषतः महाजन मुंडे यांना पंतांपेक्षा भुजबळ जवळचे होते लाडके होते पण भुजबळ दुर्दैवाने पवारांच्या बोलण्यात शब्दात अडकले आणि ते सेनेतून बाहेर पडल्याने पुढे 1995 मध्ये हेच मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले. अत्यंत महत्वाचे म्हणजे जेव्हा शरद पवार काँग्रेसमधून बाहेर पडले तेव्हा जरी पवार प्रेमाने वेडे न होता, पवार निष्ठेने भावनिक न होता जर भुजबळ यांनी काँग्रेस सोडली नसती तर विलासराव देशमुख नव्हे तर भुजबळ शंभर टक्के मुख्यमंत्री झाले असते. माझे खोटे वाटत असेल तर अजितदादांच्या सतत मुद्दाम मागेपुढे कारणाऱ्या त्या अमरावतीच्या संजय खोडके यांना विचारा कारण त्यावेळी हेच खोडके भुजबळांचे पीए होते, तेच माधवराव शिंदे पासून तर थेट गांधी यांच्या घरातून येणारे काँग्रेसच्या प्रत्येक महत्वाच्या नेत्यांचे फोन घेत होते आणि भुजबळांना देत होते. मुख्यमंत्री म्हणून आम्ही आजच आपले नाव जाहीर करतो तुम्ही पवारांच्या सोबतीने बाहेर पडू नका पण फक्त आणि फक्त पवार प्रेमापोटी भुजबळ राष्ट्रवादीत गेले आणि स्वतःच्या पायावर धोंडा मारून बसले. पिंजरा सिनेमातला मास्तर नाचणार्या बाईच्या प्रेमात पडून बरबाद होतो येथे भुजबळ नाचवणार्या पवारांच्या प्रेमात पडून मास्तर झाले….
अपूर्ण : हेमंत जोशी