सुजय राधाकृष्ण विखे पाटील निवडून
येतील कि पराभूत होतील :
मीडियात काम करणाऱ्या बहुसंख्य मंडळींना, पत्रकारांना दर दिवशी पेक्षा दर रात्री चकटफू दारू आणि जेवण हवे असते, राज्य शासनाने या अशा मीडियात काम करणाऱ्यांना ‘ जेवण गौरव ‘ पुरस्काराने सन्मानित करायचे ठरविल्याचे माझ्या कानावर पडले आहे. जर चकटफू जेवणाचे आमंत्रण नसेल तर आमच्यातले जसे त्यादिवशी बायको मुलांवर चिडचिड करतात त्यांच्या अंगावर धावून जातात हुबेहूब तेच सुजय आणि राधाकृष्ण विखे पाटील या पितापुत्रांच्या बाबत कानावर पडते आहे कि जर त्यांना एखाद्यावेळी टेन्शन नसेल डोक्याला ताप नसेल तर एखाद्या राजकीय विरोधकांपासून त्रास नसेल तर ते दोघेही कावरेबावरे होतात, घरातल्या घरात इकडून तिकडे अस्वस्थपणे येरझारा घालायला लागतात, आणि हे असे जर तणावविरहित जीवन काही दिवस त्यांच्या वाट्याला आले तर हेच विखे पाटील बाप बेटे आपापल्या डोक्यावरचे केस उपटायला कमी करणार नाहीत, त्यांना त्यातून वेडही लागू शकते, टेन्शन तो मंगताही है, त्यांची देवाकडे सकाळी उठून प्रार्थना असते. डॉ सुजय विखे पाटील नगर लोकसभा मतदार संघाचे खासदार आहेत उभे राहिले कि हमखास निवडून येतात हे तुम्हाला सांगणे म्हणजे गिरीश महाजन कंबर हलवून हलवून उत्कृष्ट डान्स करतात हे जळगावकरांना सांगण्यासारखे. अमुक एखादा नेता नगर जिल्ह्यातला किंवा राज्याचा मग ते काँग्रेसचे बाळासाहेब थोरात असतील किंवा थेट भाजपाचे राम शिंदे, शरद पवारांनी आजतागायत विखे घराण्याला जेवढे पाण्यात बघितले तेवढे पाण्यात तर महाराजांच्या घराण्यातल्या वारासदाराची प्रेयसी पळवून आणल्यानंतर त्या आक्रमक वारासदाराने देखील अजितदादांना एवढे पाण्यात बघितलेले नसेल म्हणजे विखे पाटील खानदानाचे नाव काढण्याचा अवकाश, शरद पवार म्हणे नाव काढणार्याच्या अंगावर थेट धावून जातात किंवा ज्या बाळासाहेब विखे पाटील यांनी अहोरात्र त्या शंकरराव चव्हाणांवर प्रेम केले, शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री असतांना त्यांना छळणार्या अ रा अंतुले किंवा शरद पवारांना अंगाव घेतले, आज त्यांचे पुत्र अशोक चव्हाण हेही विखे पाटील घराण्याचे नाव निघताच जागच्या जागी उंच उड्या मारून राग व खेद व्यक्त करतात, वेड लागल्यागत धावत सुटतात, थोडक्यात नेता मग तो नगर जिल्ह्यातला असेल किंवा राजकारणातला दारासिंग, जो तो सतत विखे पाटील पिता पुत्रावर दात ओठ खात असतो, त्यांचा राजकीय खात्मा करण्यासाठी टपून बसलेला असतो किंबहुना या दोघांवर मनापासून मनातून प्रेम केवळ त्या देवेंद्र फडणवीसांचे, इतर सारे किंवा कोणीही विखे पाटलांसाठी प्रेम चोप्रा, बिंदू, शशिकला किंवा मदन पुरी….
www.vikrantjoshi.com
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आमदार निलेश लंके असतील किंवा माजी आमदार संजीवनी कोल्हे व त्यांचे चिरंजीव विवेक कोल्हे किंवा पारंपरिक विरोधक कडू, म्हस्के आणि देवकर घराणे किंवा बाळासाहेब थोरात किंवा अपक्ष आमदार शंकरराव गडाख ज्यांना विखे विरोधक प्रबळ उमेदवार म्हणून पुढे करताहेत आणखी असे नगर किंवा शेजारच्या नासिक जिल्ह्यातले भाजपापासून तर विरोधी पक्षातले अग्रगण्य नेते, ऐन निवडणुकीच्या तोंडावर याच डॉ सुजय विखे पाटीलांविरोधात आतून किंवा बाहेरून एक झाले आहेत, अलीकडे या समस्त विरोधकांनी आपापसातले मतभेद विसरून केवळ विखे पाटील पिता पुत्राच्या विरोधात सारे एकवटले आहेत, शंकरराव गडाख किंवा निलेश लंके सारख्या एखाद्या मातब्बर नेत्याला डॉ सुजय विरोधात लोकसभेला उतरवून त्यांना काहीही करून पराभूत करण्याचे या मंडळींनी जरी ठरविलेले असले तरी विखे पाटील घराण्याला या अशा ताकदवान विरोधाची विरोधकांची सवय असल्याने त्यापेक्षा नगर जिल्ह्यात विशेषतः नगर लोकसभा मतदार संघात डॉ सुजय किंवा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी ज्या युक्तीने किंवा मनाचा मोठेपणा दाखवत ज्या उदारपणे प्रत्येक घर आणि मतदार जोडले आहेत त्यातून अमुक एखादा मतदार भलेही भाजपाचा नसेल पण विखे पाटलांकडल्या निवडणुकीत सारे मतदार त्यांच्या पाठीशी हमखास उभे असतात आणि विखे पाटलांना आमदारकी असो अथवा खासदारकी, हमखास निवडून आणतात त्यामुळे त्यांना होणारा विरोध त्यांच्यासाठी अजिबात नवीन नाही किंबहुना भाजपाचे जिल्ह्यातले प्रभावी नेते प्रसंगी अगदी उघड जरी डॉ सुजय यांना विरोध करून मोकळे झाले तरीही त्या विरोधाचा कुठलाही विपरीत परिणाम न होता, डॉ सुजय नेहमीप्रमाणे निवडून येतील. अत्यंत महत्वाचे म्हणजे भाजपातील नगर जिल्ह्याच्या काही प्रभावी नेत्यांचा आत्तापासून विखे पाटलांना होणारा असणारा विरोध, देवेंद्र फडणवीसांनी अगदी व्यक्तिगत या समस्त विरोधकांच्या गाठीभेटी घेत गैरसमज दूर करण्याचा आतापासून सपाटा लावल्याची माझी माहिती आहे. विखे पाटील पिता पुत्र हा विषय येथेच संपत नाही, पुन्हा कधीतरी…,
तूर्त एवढेच : हेमंत जोशी