एकला चलोरे तरीही यशस्वी का तिकडंमबाज तटकरे :
ज्यांना गावाच्या जत्रेत नाचतांना अंगावर पैसे फेकून आनंद लुटलेला आहे त्याच गाव भवान्यांना बापाने घरात आणून प्रिय पत्नीचे स्थान द्यावे, या पद्धतीची कुरबुर कटकट गेल्या काही महिन्यांपासून विशेषतः अजित पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादीला सत्तेत मानाचे स्थान दिल्या दिवसापासून भाजपा संघा अंतर्गत सतत सुरु आहे, जेथे जेथे नेते आणि त्यांचे स्वयंसेवक किंवा कार्यकर्ते जमा होतात, नाराजीच्या सुराने आणि नेत्यांच्या नावाने बोटे मोडून ज्याची त्याची बोलायला सुरुवात होते पण यादिवसात जगात ज्या जोडगळीच्या नावाचा डंका सुरु आहे ज्यांच्यावर कौतुकाचा जगभर वर्षाव सुरु आहे त्या मोदी आणि शाह जोडगळीला आपल्या या राज्यातल्या संघ भाजपा मंडळींनी ज्ञान पाजणे किंवा त्यांच्या चुका काढणे म्हणजे सख्य्या बापाला पोटच्या पोराने कोकशास्त्राचे लैंगिक ज्ञान पाजळण्यासारखे, मोदी राज्यातल्या अंतर्गत राजकारणाकडे विशेषफारसे लक्ष घालत नाहीत, ती जबाबदारी अगदी तंतोतंत एकमेव अमित शाह पार पाडतात आणि शाह यांनी टाकलेल्या जबाबदारीवर जशीच्या तशी अंमलबजावणी देवेंद्र फडणवीस करतात हीच नेमकी वस्तुस्थिती आहे आणि अमित शाह यांची कुठेही काकणभर चुकी हे असे भन्नाट निर्णय घेतांना होते असे जर फडणवीसांना तुम्ही अगदी खाजगीत जरी विचारले तरी ते त्याक्षणी जोरजोरात नकारात्मक मान हलवून मोकळे होतील थोडक्यात त्यांना देखील शाह यांचे हे असे निर्णय घेणे मनापासून मान्य आहे…
www.vikrantjoshi.com
संघ आणि भाजपचे या राज्यातले एकही मत फुटणार नाही हे त्यांच्या नेत्यांना नेमके नक्की ठाऊक असल्याने पण या आजही मूठभर संख्यने असलेल्या कार्यकर्त्यांच्या भरवशावर निवडणूक लढवून जिंकणे अजिबात शक्य नसल्याने वरून उद्धव ठाकरे यांच्याशी युती फिस्कटल्याने या पद्धतीचे फोडाफोडीचे राजकारण खेळणे अमित शाह यांच्यासारख्या श्रुड नेत्यांना गरजेचे होते अत्यावश्यक होते आणि त्यातूनच राष्ट्रवादी व शिवसेनेच्या अंतर्गत फोडाफोडीला भाजपाने सुरुवात केली ज्यात नेमकी धूर्त व महत्वाची जबाबदारी तेही वेळोवेळी कमालीची गुप्तता पाळून आणि अमित शाह यांच्या खांद्याला खांदा लावून पार पाडली ती एकमेव फडणवीसांनी आणि शाह फडणवीस जोडगोळी या फोडाफोडीच्या राजकारणात जशी आज यशस्वी ठरलेली आहे तशी ती येणाऱ्या लोकसभा निवडणूक निकालात देखील यशस्वी ठरली असेल हे माझे भाकीत आजच तुम्ही नोंद करून ठेवा. कोकणातल्या माणगावच्या राजापासून म्हणजे ऐश्वर्य संपन्न सुनील तटकरे यांच्यापासून आपण सुरुवात करूया, म्हणजे नारायण राणे यांनी फारतर थोडीफार ताकद तिकडे सिंधुदुर्गात दाखवली असती कारण अख्ख्या कोकणातली त्यांची लोकप्रियता आता पूर्वीसारखी नसल्याने राणेंच्या भरवंशावर लोकसभा जिंकणे भाजपाला नक्की शक्य नव्हते किंवा उदय सामंत यांच्या भरवंशावर भाजपाला रत्नागिरीत तेही किरण सामंत यांना उमेदवारी बहाल करून म्हणजे भाजपा ऐवजी शिंदे सेनेला स्थान देऊन जिंकणे शक्य आहे पण आधी लोकसभा आणि पाठोपाठ येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत उभ्या कोकणात विजयाचा चमत्कार घडवून आणण्यासाठी अजित पवारांचे लाडके आणि हुकमाचे एक्के सुनील तटकरे यांनी आजच भाजपा आणि युतीचा विजय सोपा करून ठेवला आहे, एकाचवेळी सुनील तटकरे आणि उदय सामंत भाजपच्या उजव्या डाव्या बाजूला, वरून नारायण राणे, भरत गोगावले बाळ माने विनय नातू इत्यादी आणखी काही नेते, कुरबुर करणाऱ्यांनो, शाह फडणवीस यांनी आजच तुमच्या लोकसभेचा मार्ग सुकर करून ठेवलेला आहे…
अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे जेव्हा राज्याच्या राजकारणात 1990 दरम्यान जन्माला आले आणि मंत्रालयाच्या पायऱ्या जेव्हा त्यांनी चढायला सुरुवात केली तेव्हा अजित पवार बारामतीमध्ये आपला हनिमून साजरा करण्यात गुंग गर्क होते त्यांचा राजकीय जन्म त्यावेळी झालेला नव्हता, राजकारणातले दादांचे आणि तटकरे दोघांचेही बोबडे बोल मी ऐकलेले आहेत त्यामुळे तटकरे यांचा राजकीय प्रवास मला मुखोद्गत असल्याने शाह फडणवीस यांनी ज्या पद्धतीने अजित पवारांना आपल्या बाहुपाशात घेतले आहे सोबतीला सुनील तटकरे, अस्वस्थ असलेल्या संघ स्वयंसेवक आणि भाजपा कार्यकर्त्यांनो, विजयाचा मार्ग त्यातून सुकर झाला आहे. ज्या अंतुले यांचे बोट पकडून राजकारणात प्रकटले पुढे त्याच अंतुले यांचा राजकीय खात्मा करणार्या सुनील तटकरे यांनी जशी रायगड आणि अख्य्या कोकणातली काँग्रेस संपविली अत्यंत महत्वाचे म्हणजे दिवंगत माजी मुख्यमंत्री अब्दुल रहमान अंतुले आणि काँग्रेस पेक्षा शतपटीने ताकदवान बलवान लोकमान्य लोकप्रिय शेकाप झपाट्याने खंगविण्यात संपविण्यात खाली खेचण्यात मोठी जबादारी तेही शरद आणि अजित पवारांच्या वतीने केवळ स्वतःच्या भरवशावर पार पाडली ती एकमेव सुनील तटकरे यांनी, ज्यांनी डोक्यावर बसलेल्या सख्ख्या भावाला अनिल तटकरे आणि एकेकाळच्या लाडक्या पुतण्यास प्रसंगी सुनील तटकरे यांनी पार नेस्तनाबूत केले ते अतिशय धूर्त सुनील तटकरे आज भाजपच्या सोबतीला, चालू सवती सोबतीला, असे भाजपा कार्यकर्त्यांनी इतर त्यांच्या नेत्यांनी आणि स्वयंसेवकांनी असे गैरसमज करवून घेत उर बडवत बसता कामा नये. सुनील तटकरे आदिती तटकरे आणि अनिकेत तटकरे हा मोठा विषय येथे अजिबात संपत नाही….
क्रमश: हेमंत जोशी