पुढल्या निवडणुका ठरले/ ठरलेले उमेदवार
असा भन्नाट नेता मी आजतागायत कधीही बघितला नाही कदाचित बघणार पण नाही. भारतीय जनता पक्षाचे लढाऊ लढवय्ये युवा नेतृत्व मोहित कंबोज यांनी अलीकडे त्यांच्या पक्ष श्रेष्ठींकडे थेट जाऊन सांगितले आहे कि मला पुढली लोकसभा निवडणूक मुंबईतून लढवायची तीव्र इच्छा आहे त्यादृष्टीने मी कामाला देखील लागलो आहे. विशेष म्हणजे अति आस्चर्य म्हणजे मुंबई महानगरात जे सहा लोकसभा मतदार संघ अस्तित्वात आहेत, त्यापैकी कोणत्याही कुठल्याही एका मतदारसंघातून मला उमेदवारी द्या, मी आनंदाने निवडणूक लढण्यास तयार आहे हेही मोहित कंबोज यांनी त्यांच्या पक्ष श्रेष्ठींना मोठया आत्मविश्वासाने सांगून टाकलेले असल्याने यादिवसात मुंबई भाजपात म्हणाल तर कंबोज यांच्या या विधानामुळे खळबळ आहे म्हणाल तर जोरात चर्चा सुरु आहे. एक मात्र नक्की आहे, ठरलेले आहे कि येणारी लोकसभा निवडणूक मोहित कंबोज लढवतील आणि जिंकून देखील येतील थेट दिल्लीत जाऊन बसतील. मोहित पद्धतीचा हुबेहूब जसाच्या तसा भन्नाट लढाऊ कामसू मेहनती कायम लोकात मतदारांत रमणारा राहणारा, प्रत्येकाच्या मदतीला धावून जाणारा भेटणार्या प्रत्येक गरजूला मनापासून सहकार्य करणारा कोकणात प्रत्येक गावात घरोघरी ओळखीचा प्रसिद्धीच्या झोतातला युवा नेता म्हणजे अर्थात रत्नागिरीचा किरण सामंत, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची कोकणातली मोठी ताकद आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांचे थोरले लाडके धाडसी बंधू…
www.vikrantjoshi.com
उदय सामंत आणि किरण सामंत म्हणजे अनिल तटकरे आणि सुनील तटकरे पद्धतीचे नाते नाही कि दोघात विस्तव देखील जात नाही, दोघातले नाते एवढे घट्ट आणि जिव्हाळ्याचे कि उदय यांना इकडे मुंबईत साधे खरचटले तरी तिकडे रत्नागिरीत किरण यांना वेदना व्हायला सुरुवात होते म्हणूनच काही त्यांना राम लक्ष्मणाची जोडी म्हणून ओळखतात तर काहींना वाटते दोन शरीर दोघांचे तेवढे वेगळे मात्र त्या दोघातले नाते प्रेम जिव्हाळा आदर आपुलकी सारे काही एक जीव आहेत ते दोघेही एकत्र राजकारणात आणि व्यवसायात असूनही त्या दोघात एकमेकांविषयी नितांत आदर आहे एकमेकांसाठी जीव देण्याची त्यांची तयारी आहे. रत्नागिरी लोकसभा यावेळी त्या विनायक राऊत यांच्या विरोधात शंभर टक्के किरण सामंत यांना शिंदे सेना भाजपा युती तर्फे लढवायची आहे त्यांना विनायक राऊतांना नक्की पराभूत करायचे आहे. राष्ट्रवादी काँग्रेस सहित सारे आणि शिंदे सेना भाजपा युती एकंदरीत सारे किरण सामंत यांच्या मदतीला काही उघड तर काही आतून धावून जातील थोडक्यात किरण आणि उदय यांची आजवरची पुण्याई कामातली कमाई त्यांच्या कामाला येईल आणि किरण सामंत त्या विनायक राऊत यांना लोकसभेला पराभूत करून मोकळे होतील…
श्रीमान अनिल गायकवाड हे समृद्धी महामार्गाचे एक महत्वाचे शिल्पकार आहेत पण ते अधिकारी कमी समाजसेवक अधिक आहेत त्यांना जात पात मान्य नाही म्हणजे स्वतःच्या जातीवर निस्सीम प्रेम पण त्या पलीकडे मानव जातीवर गायकवाड यांचे मनापासून निस्सीम प्रेम. लातूर मधून त्यांचे बंधू सुनील एक टर्म आधी भाजपाचे निवडून आलेले लोकसभा सदस्य होते विशेष म्हणजे सुनील अनिल मधले नाते हे असेच राम लक्ष्मण किंवा उदय आणि किरण सामंत यांच्यासारखे. लातूर जिल्ह्यात लातूर लोकसभा मतदारसंघात अनिल गायकवाड यांचे व्यक्तिगत संबंध त्यांच्या घरोघरी ओळखी त्यांचे जिल्ह्यातल्या सर्व पक्षीय प्रभावी नेत्यांशी असलेले घरचे संबंध त्यांची व्यक्तिगत मैत्री, यावेळी श्री अनिल गायकवाड हे भाजपातर्फे लातुरातून लोकसभेचे उमेदवार असावेत असे लातूरकरांना अगदी मनापासून वाटते आणि अनिल गायकवाड अगदी सहज निवडून येतील विरोधी उमेदवाराला चारी मुंड्या चित करून मोकळे होतील. अत्यंत लाघवी मृदू भाषा, मेहनती वृत्ती, दिलदार स्वभाव, कायम लोकांना घेऊन बसणारा त्यांच्या विविध समस्या ऐकून घेऊन त्यांना खिसे रिक्त होईपर्यंत मदत करणारा हा सरकारी अधिकारी उद्याचा नक्की खासदार आहे असे मला राहून राहून वाटते. मी जे तुम्हाला तब्बल तीन महिन्यांपूर्वी सांगितले होते तेच नेमके घडले आहे म्हणजे सुमित वानखेडे यांनी देवेंद्र फडणवीसांकडली आपली नोकरी सोडली आहे, उत्तम नोकरीवर त्यांनी पाणी सोडले आहे, अलीकडे सुमित वानखेडे खाजगी सचिव पदाचा राजीनामा देऊन पूर्णवेळ वर्धेतल्या त्या आर्वी विधान सभा मतदार संघात ठाण मांडून बसले आहेत आणि एखाद्या आमदाराने देखील लाजेने मान खाली घालावी एवढे तल्लीन होऊन गेली अनेक वर्षे सुमित वानखेडे आर्वीकरांचे विविध प्रश्न सोडविण्यात गुंतले आहेत रमले आहेत त्यामुळे येणाऱ्या विधान सभा निवडणुकीत विरोधी उमेदवार कितीही तगडा असला तरी सुमित एखाद्या अनुभवी ताकदवान पहेलवानासारखे त्या उमेदवाराला माती चारतील, मिशीवर ताव देत विजयी मुद्रेने विधान सभेत पोहोचतील….
अपूर्ण : हेमंत जोशी