वाया गेला हुकुमाचा एक्का अन गुलाबराव झाला पोरका
बडबड गडबड करणाऱ्या अनेकांची बोलती वायफळ ठरते आणि ते नेमके नक्की अडचणीत सापडतात. मंत्री गुलाबराव पाटलांचे देखील हे असेच, एकदा ते सुटले रे कि सुटले विशेषतः रात्र असेल आणि गुलाबराव बडबडत असतील तर एकाचवेळी त्यांच्या शरीराचा मनाचा चालीचा आणि तोंडाचा तोल जातो आणि बघणार्यांचे जमलेल्यांचे फुकटात मनोरंजन होते त्यांना त्या रात्री हसून हसून थकल्याने गाढ झोप नक्की लागते. अलीकडे वाचाळवीर मंत्री गुलाबराव असेच काहीतरी मनात साचलेले बरळून गेले खरे नंतर त्यांनी स्वतःची जीभ देखील चावली असेल पण हातातून सुटलेला दगड आणि तोंडातून सुटलेला शब्द मागे येत नाही आणि एखाद्याचे त्यातून मोठे नुकसान होण्याची दाट शक्यता नक्की निर्माण होते जे नेमके गुलाबराव पाटील यांच्याही बाबतीत अलीकडे घडले. ते बोलून गेले, सारेच उद्धव ठाकरे यांना सोडून तिकडे म्हणजे एकनाथ कडे चालले होते मग मी एकट्याने थांबून काय केले असते, हे ते वाक्य होते ज्यातून अनेक गंभीर अर्थ निघतात. या वाक्याचा अर्थ असा कि जळगावकरांनो, मी तिकडे जाऊन मोठी चूक केलेली आहे मला माफ करा आणि पुन्हा एकदा कृपया मला निवडून द्या मी पुन्हा ती तशी चूक करणार नाही. दुसरा अर्थ असा कि ज्या भ्रष्ट गुलाबराव यांना फडणवीस आणि शिंदे यांनी मंत्री करून अतिशय महत्वाच्या खात्याची त्यांच्यावर जबाबदारी सोपविली आहे जमले तर त्यांनी होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात यापुढे शिंदे सेनेच्या तिकिटावर निवडून येण्याची अजिबात शक्यता नसलेल्या गुलाबराव यांचे मंत्रिपद काढून घडून जो शिंदे सेना आणि भाजपा युतीची ताकद वाढवू शकतो पद्धतीच्या आमदाराला गुलाबराव यांच्या ऐवजी संधी देऊन मोकळे व्हावे. तसेही चंचल बडबड्या धांदल गुलाबराव पाटील स्वतःच म्हणाले कि शिंदे गटात सामील होऊन मी मोठी चूक केली…
www.vikrantjoshi.com
गुलाबराव यांच्या त्या वक्तव्याचा अर्थ नक्की असा देखील निघतो कि जर त्यांना उद्धव ठाकरे यांनी कुरवाळून जवळ घेतले तर ते एकनाथ शिंदे यांना कुठल्याही क्षणी सोडून उद्धव यांच्या शिवसेनेत सामील व्हायला तयार आहेत कारण गुलाबराव यांचेच असे म्हणणे आहे कि माझी शिंदे यांच्याकडे जाण्याची अजिबात इच्छा नव्हती पण सारे तिकडे निघाले गेले म्हणून मी देखील उद्धव यांच्याकडे आणि त्यांच्या शिवसेनेकडे दातओठ खात फिरवली.अलीकडे मी गुलाबराव यांच्या सोबतीने आणि विरोधात असलेल्या काही स्थानिक नेत्यांशी जेव्हा चर्चा केली त्या साऱ्यांच्या बोलण्यातून येणाऱ्या विधान सभा निवडणुकीत गुलाबराव पाटील यांचे निवडून येणे दूर पण त्यांना आपली अमानत रक्कम देखील वाचविणे अशक्य होणार आहे कारण मतदार त्यांच्या अलीकडच्या नवश्रीमंतीवर आणि चंचल व वाचाळ वृत्तीवर मनातून मनापासून चिडले रागावले संतापले आहेत. आपण आपल्या बोलण्यातून आणि भाषणातून सभोवताली जमणाऱ्यांना क्षणार्धात आपलेसे करू शकतो हा जो गैरसमज गुलाबरावांनी स्वतःचा करवून घेतला आहे त्यावर येणाऱ्या, येत्या विधान सभा निवडणुकीत त्यांचे मतदार आणि जळगाव जिल्हा गुलाबराव कसे व किती पाण्यात हे त्यांना सारे निश्चित दाखवून देणार आहेत, ती काळ्या दगडावरची रेघ आहे…
तूर्त एवढेच : हेमंत जोशी