इरफान इहलोकात: पत्रकार हेमंत जोशी
लॉक डाऊन ची घोषणा झाली आणि तेव्हाच माझ्या लक्षात आले कि आलेले संकट गहिरे आहे फार मोठे आहे दीर्घकाळ कोरोनाचे दुष्परिणाम भारतीयांना भोगावे लागणार आहेत, नेमके तेच घडते आहे. आमच्या इमारतीमध्ये हिंदुजा कुटुंबियांचे भाचे नागेश छाब्रिया माझे जवळचे मित्र आहेत म्हणाल तर आमचे ते शेजारी देखील आहेत. त्यांना एक मुलगा एक मुलगी, अक्षय तृतीयेला त्यांना त्यांच्या मुलीचे अतिशय धुमधडाक्यात लग्न करायचे होते, हिंदुजा बंधू जुहू समुद्र किनारी सकाळी फिरतांना अनेकदा मला म्हणायचे कि नागेशकडल्या लग्नात धमाल करूया पण दुर्दैवाने असे काहीही करता आले नाही, शेवटी नाईलाजाने मुलीचे त्यांनी अक्षय तृतीयेला कोर्टात फक्त चार लोकांच्या साक्षीने कसेबसे लग्न उरकले. सारी जय्यत तयारी पाण्यात गेली. असे कितीतरी कुटुंब आहेत ज्यांना आपल्या भावना बासनात गुंडाळून दिवस कंठावे लागताहेत. अभिनेता इरफान खान हे लिखाण करतांना गेल्याची बातमी कानावर पडली आणि त्याला कर्क रोग जडण्यापूर्वीचा इरफान माझ्या डोळ्यासमोर आला. एक दिवस तो माझ्या लोखंडवाला कॉम्प्लेक्स मधल्या अतिशय आवडत्या कॉफी बाय दि बेला मध्ये कोणाशी तरी अगदी गंभीर चर्चा करीत बसला होता, तेवढ्यात मी पण तेथे अचानक कॉफी प्यायला गेलो…
मुंबईतल्या जवळपास साऱ्याच कॉफी बाय दि बेला मध्ये हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीतले दिग्गज बसलेले असतात, त्यांना इतरांनी डिस्टरब करणे फारसे आवडत नाही. एकदा सैफ अली खान आणि करीना कपूर वांद्र्याच्या त्यांच्या घराजवळच्या आवडत्या दि बेला मध्ये बसले होते तेवढ्यात काही तरुण त्या दोघांचे फोटो काढायला लागले पण जेव्हा हे तरुण त्या दोघांच्या बाजूलाच खेटून फोटो काढायला लागले तेव्हा मात्र सैफ ची सटकली मग तो त्यांच्यावर असे काही बरसला कि ते सारे आल्या पावली पळून गेले. इरफान खान गंभीर चर्चेत मग्न होता नेमके तेथेही तेच घडले काही तरुण नमाज पठण करून जात असतांना त्यांना इरफान असल्याचे कळले, ते आत आले त्यांनी पटापट त्याच्याबदोबर हवे तेवढे फोटो काढले आवश्यक असूनही इरफान चिडला नाही त्याने त्यांना हवे तेवढे फोटो काढू दिले. नंतर मलाच राहवले नाही मी त्याला म्हणालो, माझी आवडती कपचिनो कॉफी तुमच्यासाठी सांगू का त्याने होकार दिला, त्याला माझी स्ट्रॉंग कॉफी खूप आवडली असावी न राहवून तीनदा मला तो धन्यवाद देत होता, मलाच लाजल्यासारखे झाले. आज इरफान आपल्यात नाही, अतिशय वाईट वाटते, परमेश्वर या कठीण दिवसात आणखी कोणाकोणाला नेणार आहे काहीच कळत नाही…
सरकारने लॉक डाऊन घोषित केल्यानंतर लोकांना विविध अडचणी आणि संकटांना यापुढे सामोरे जावे लागणार असल्याचे माझ्या लक्षात आले म्हणून मी एक पत्रकार या नात्याने सोशल मीडिया आणि फोन वरून अनेकांना सांगितले कि काही अडचण असेल किंवा सहकार्य लागले तर माझी आठवण ठेवा जे जे शक्य असेल ते ते मी अगदी मनापासून तुमच्यासाठी करेल. अनेकांना अडचणी आल्या काही सोडवल्या काही सोडविणे शक्य नव्हते समाधान मिळाले समाधान मिळते आहे. काही विचित्र फोन पण आले, आमच्या घराजवळच्या एक म्हातारी बाई म्हणाल्या, आठवड्यातून निदान दोनदा तरी माझा अंबाडा बांधून द्याल का, हे काम मी कधी केले नाही पण वाईट वाटले, जमले असते तर बांधून दिला असता वरून गजरा देखील खोवला असता. सध्या माझे पाच असे धमाल वृद्ध मित्र आणि मैत्रिणी आहेत कि जे त्यांच्या घरी एकटे आहेत मग काय दिवसातून एकदा तरी त्यांच्याशी गप्पा मारतो, त्यांना हसवतो, खूप छान वाटते. एका ओळखीच्या तरुणीचा फोन आला, म्हणाली मी काम करते ती गारमेंट फॅक्ट्री बंद आहे, पैसे संपले आहेत, पगार नाही, तीन दिवसांपासून माझ्या बाळाला मी कणकेची पेज दूध म्हणून पाजते, चिरंजीव विक्रांतला लगेच सूचना केल्या कि यानंतर तिच्यावर लॉक डाऊन संपेपर्यंत हा प्रसंग ओढवता काम नये. वयाच्या सोळाव्या वर्षी मी घर सोडल्यानंतर काही वर्षे अनेकदा उपाशी दिवस रडून काढत असे त्यामुळे भुकेचे महत्व मी जाणून आहे आणि तुम्हालाही नेमके तेच सांगायचे आहे कि हातचे न राखता यादिवसात एकमेकांना मनापासून सहकार्य करा, हात जोडून विनंती…
पत्रकार हेमंत जोशी