अलविदा ऋषी : पत्रकार हेमंत जोशी
१९८७ च्या जुन मध्ये मी कायमस्वरूपी मुंबईत राहायला आलो तत्पूर्वी ९-१० वर्षे जळगावला होतो तेव्हा चित्रपट सृष्टीविषयी मला पण सर्वसामान्यांसारखे कमालीचे आकर्षण होते. मुंबईत काही वर्षे सुरुवातीला वर्सोवा नंतर सात बांगला आणि आता सांताक्रुझजला जुहू गार्डन जवळ राहतो, अगदी आमच्या गल्लीत विधू विनोद चोप्रा, अनिल कपूर, संजय दत्त आणि सलमान खान यांची ऑफिसेस आहेत पण आता चुकूनही तिकडे लक्ष जात नाही. पण एक काळ नक्की असा होता कि सिने कलावंत बघणे किंवा त्यांच्याशी बोलणे माझे आवडते विषय होते. समृद्धी महामार्गाचे टॉप बॉस राधेश्याम मोपलवार मुंबईत येणे वाढले तेव्हा गोरेगावच्या चित्रनगरीचे उपमहासंचालक होते, एक दिवस त्यांचा फोन आला, तुम्हाला ऋषी कपूर बघायचा होता ना, सध्या त्याच्या ‘नगीना’ सिनेमाचा मोठा सेट लागला आहे, शूटिंग सुरु आहे, तेथे त्याला पहिल्यांदा बघितले, नंतर आरके स्टुडिओची शेवटची होळी जेव्हा खेळल्या गेली त्याचाही मी साक्षीदार नंतर जुहूच्या सन अँड सँड या पंचतारांकित हॉटेलात मी आणि माझी मुले नियमित पोहायला जात असू…
तेथेच आम्ही स्विमिंग शिकलो. या हॉटेलात सतत सिने कलाकारांचा राबता असतो. त्यामुळे जवळपास सारीच हिंदी नामवंत चित्रपट सृष्टी अगदी जवळून सतत पाच वर्षे मला बघता आली. नियमित संध्याकाळी जेव्हा मी स्विमिंगला जात असे त्याचवेळी जितेंद्र राकेश रोशन सुजितकुमार आणि प्रेम चोप्रा अगदी नियमित पुलाशेजारच्या हेल्थ क्लब मध्ये यायचे आणि त्यांना अनेकदा भेटायला तेथे त्यांच्या मित्र कंपूतला ऋषी कपूर यायचा मग त्यांचे ड्रिंक होत असे. मित्रहो, चित्रपट सृष्टी जेवढी दुरून साजरी तेवढी अधिक चांगली, गेलेल्या माणसाचे दोष काढू नये म्हणतात पण कालच मी माझ्या मुलास म्हणालो कि मोस्ट व्हिमजिकल स्वभाव वरून विविध व्यसने, कर्करोग त्यातून होणे, त्यात नवल ते कसले ? ज्यांनी ऋषी कपूर किंवा इरफान खान यांना जवळून बघितले असेल ते नेमके यावर सांगतील. जाऊद्या कलाकार म्हणून ते अतिशय वरच्या दर्जाचे होते यात तिळमात्र शंका नाही…
अलीकडे जुहू चौपाटीलगत मॅरियट हॉटेलात काही ना काही कामानिमित्ते अनेकदा जाणे होते, आजारी पडण्यापूर्वी ऋषी कपूर मला अनेकदा तेथे दिसला, त्याचे ते अति दारू सेवन केल्याने कपूर घराण्याला शोभणारे बेढब शरीर बघून हाच का तो आपला आवडता हिरो त्या बॉबी सिनेमातला, मनाला प्रश्न पडत असे. आणि हेच चित्रपटसृष्टीचे मोठे अपयश आहे, कलावंत मग तो मराठी सिनेमातला असो किंवा हिंदी सृष्टीतला जे जे कलावंत व्यसनांपासून लफड्यांपासून चार हात दूर त्यांचे आयुष्य ते छान जगले आणि छान संसार करून मोकळे झाले. अन्यथा यांच्यातल्या बहुतेकांचा फक्त वक्त चांगला असतो त्यांचा अंत थोड्याफार फरकाने परवीन बॉबी सारखाच होतो. डोक्यात सतत हवा आणि फॅन्स जवळ गेलेत कि त्यांना अपमानित करून मोकळे व्हायचे, स्वतःच्या धुंदीत आणि मस्तीत जगणारे व विविध वाईट व्यसनांना बिलगले बहुतेक कलावंत, एवढेच सांगतो, चुकूनही यांच्या जवळ जाण्यात अर्थ नसतो. आम्ही तर त्यांच्याच परिसरात राहतो, जवळून गेलेत तर नक्की आजही त्यांच्याकडे एक कौतुकाचा कटाक्ष नजर टाकतो पण संधी असतांनाही या मंडळींशी जवळीक शक्यतो नकोशी वाटते. अर्थात सारेच वाईट आणि वादग्रस्त असा माझा दावा नाही पण प्रमाण मात्र फार मोठे आहे. पुन्हा एकदा आवडत्या ऋषी कपूरला श्रद्धांजली…
तूर्त एवढेच : हेमंत जोशी.