सांगायला लाज वाटते पण करायला छान वाटते…
मला वाटून उपयोग नाही संबंधितांना ते वाटायला पाहिजे म्हणजे मला लाख वाटते कि पत्रकार उदय तानपाठक यांनी एखाद्या नटीच्या प्रेमात पडावे पण नटीला देखील ते वाटायला हवे ना, मला वाटते पत्रकार अभय देशपांडे याने त्याच्या झुबकेदार काळ्या पांढऱ्या मिशा काढून टाकाव्यात पण ते तसे त्यालाही वाटायला हवे, अभयचा झुबका बघून एबीपीच्या खांडेकरांनी देखील झुबकेदार पिळदार मिशा अलीकडे वाढवून ठेवल्यात, उद्या हे असे लोण पसरले तर यदु जोशी देखील मिशा वाढवून मोकळा होईल. श्रीमान देवेंद्र फडणवीसांना अगदी मनातून वाटले होते कि नागपूरच्या माजी महापौर अर्चना डेहनकर किंवा अमरावती ग्रामीण च्या भाजपा जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी दिघडे या दोघींपैकी एकीला मी नक्की यावेळी विधान परिषदेवर पाठवीन पण चतुर चंद्रकांतदादा आणि धूर्त विनोद तावडे यांनी ऐनवेळी दिल्लीतल्या नेत्यांना आणि राज्यातल्या फडणवीसांना मोठ्या खुबीने राजी केले आणि राज्य महिला मोर्च्याच्या उमा खापरे यांचे नाव ऐन मोक्याच्या वेळी जाहीर करूंन त्यांना विधान परिषदेवर निवडूनही आणले. आता शिंदे शिवसेनेतल्या आणि राज्य भाजपा मधल्या अनेकांना राज्यपाल नियुक्त विधान परिषदेचे वेध लागले आहेत, येथेही मला अगदी मनापासून वाटते कि भाजपाच्या अडीअडचणीत कायम पुढे असणारा भाजपासाठी प्रसंगी कोणालाहि अंगावर घेणारा धाडसी दिलदार मोहित कंबोज, अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर किंवा सेवेनंतर अजूनही सत्तेच्या दृष्टीने कायम अविवाहित राहणाऱ्या भाजपा प्रदेश कार्यालय प्रमुख मुकुंद कुलकर्णी आणि भाजपामधले राज्यातले विनय सहस्त्रबुद्धे म्हणजे विश्वास पाठक या तिघांनाही फडणवीसांनी भाजपा पक्ष श्रेष्ठींनी नारदाची चोख भूमिका वठवणार्या चंद्रकांत पाटलांनी किंवा कामाचा ना धामाचा गाव अख्खा मामाचा या म्हणीत कायम चपखल बसणार्या केवळ गप्पिष्ठ रावसाहेब दानवे सारख्या प्रभावी नेत्यांनी, या तिघांना अगदी डोक्यावर बसवून राज्यपालांकडे घेऊन जावे व थेट आमदार म्हणून बाहेर आणावे…
मी विश्वास पाठक यांना राज्यातले विनय सहस्त्रबुद्धे असा जेव्हा केव्हा भाजप नेत्यांसमोर त्यांचा उल्लेख करतो तेव्हा हे नेते म्हणतात कि पाठक यांना सहस्त्रबुद्धे म्हणणे म्हणजे अजित पवारांना ऋषी कपूर म्हणण्यासारखे किंवा प्रमोद हिंदुराव यांना अमिताभच्या उंचीचा म्हणण्यासारखे किंवा सांम टीव्ही च्या प्रसन्न जोशी यांना तृतीय वर्ष संघ शिक्षित म्हणण्यासारखे म्हणजे पाठक यांना सहस्त्रबुद्धे म्हणणे म्हणजे विनय यांच्या नसलेल्या कार्याची विनाकारण उंची वाढवून ठेवण्यासारखे थोडक्यात विश्वास पाठक यांना हे अपमानित करण्यासारखे अगदी चारचौघात अपमान केल्यासारखे वाटते आणि मिस्टर जोशी, पाठक यांचा हा असा जाहीर अपमान करण्याचा कोणताही अधिकार तुम्हाला भाजपाने बहाल केलेला नाही. ऑफ द रेकॉर्ड सांगायचे झाल्यास निदान आज तरी या तिघांपैकी किमान दोघांवर माननीय राज्यपाल शिक्का मोर्तब करतील. मी याआधी देवेंद्र फडणवीसांवर त्यांच्या वाढ दिवसानिमीत्ते जे खूप बोललो तेवढ्याने माझ्या वाचकांचे अजिबात समाधान झालेले दिसत नाही त्यामुळे येथे फडणवीसांवर पुन्हा लिहिणे व बोलणे क्रमप्राप्त आहे. राजकीय जबाबदाऱ्या सांभाळून किंवा त्यांच्याकडे जे अधिकार पद चालून आलेले असते तेही सांभाळून फडणवीस सकाळी दररोज न चुकता अगदी आठवणीने विविध विषय अभ्यास स्वरूपात नियमित हाताखालून घालतात थोडक्यात नरेंद्र मोदी शरद पवार जसे कितीही व्यस्त असले किंवा कोणत्याही संकटात किंवा अडचणीत सापडलेले असले तरी ते जसे सार्या चिंता काळज्या बाजूला ठेवून अगदी नियमित वाचन चिंतन लेखन करतात हुबेहूब त्यांच्या पावलावर पाऊल देवेंद्र फडणवीस यांचे. फार पूर्वी मी केव्हातरी माजी आमदार कृष्णराव इंगळे यांना ते आमदार असतांना आणि पवार मुख्यमंत्री असतांना इंगळे यांना कृषी विद्यालय काढायचे होते म्हणून जातीने इंगळे यांना पवारांकडे घेऊन गेल्यानंतर इंगळे अगदी उथळपणे जेव्हा या विषयावर पवारांचा अमूल्य वेळ अधिक घेऊ लागले, पवारांनी त्यांना मध्येच थांबवले, शरदराव जागेवरून उठले आणि क्षणार्धात त्यांनी कपाटातून अगदी अद्ययावत कृषी महाविद्यालयाशी संबंधित प्रोजेकट रिपोर्ट काढून इंगळे यांच्या हाती ठेवत ते म्हणाले या पद्धतीने महाविद्यालय सुरु करा मनाने चुकीचे काही करू नका. नेमके हे असेच वागणे आणि बोलणे त्या देवेंद्र फडणवीसांचे म्हणजे मला एक नव्हे दोन नव्हे किमान दहा बुद्धिमान व मान्यवर अधिकाऱ्यांनी नेत्यांनी व्यावसायिकांनी बुद्धिवंतांनी नेमके हेच सांगितले कि फडणवीस यांच्यासमोर तुम्ही काहीही घेऊन जा त्यांना त्या विषयाचा अगदी सखोल अभ्यास असतो त्यातले ते नेमके महत्वाचे मुद्दे तुमच्यासमोर मांडून मोकळे होतात ऐकणारा अवाक होतो मनातून देवेंद्र फडणवीसांसमोर एका क्षणात नतमस्तक होतो…
जेव्हा देवेंद्र फडणवीसांकडे अमुक एखादी जबादारी वरून सोपविण्यात येते त्यानंतर ते एकही क्षण आराम न करता आणि तब्बेतीची किंवा जीवाची किंवा चांगल्या वाईट परिणामांची कोणतीही चिंता न करता पुढल्या क्षणी कामाला सुरुवात करतात. अशावेळी ते जवळून बघणार्यांना एखाद्या निष्काम कर्मयोग्यासारखे वाटतात विशेष म्हणजे फळाची अपेक्षा ठेवून ते अमुक एखादी जबाबदारी कधीही पार पाडत नाहीत म्हणून ते कायम साऱ्यांना अगदी मनापासून आवडतात, असा हा कायम सतत माणसांमध्ये माणसांच्या घोळक्यांमध्ये राहणारा रमणारा बोलका हसतमुख मेहनती बिनधास्त पराक्रमी देशभक्त समाजसेवी नेता, योग्य माणसाचा योग्य ठिकाणी उपयोग करवून घेणारा तरीही कोणत्याही स्वार्थ व मोहापोटी माणसांमध्ये गुंतून न पडणारा मनस्वी नेता, त्यांना वाढदिवसाच्या अगदी मनापासून शुभेच्छा !!
तूर्त एवढेच : हेमंत जोशी