राज्यातली घडलेली भाजपा बिघडली…
अलीकडे एक छान चुटकुला ऐकण्यात आला. मुलगी आईला येऊन सांगते कि आपल्या घराजवळ सिनेमाचे शूटिंग सुरु झाले आहे त्यावर आई म्हणते, लगेच घरात ये सिनेमातली माणसे चांगली नसतात. अगं आई, शूटिंग साठी इम्रान हाशमी आणि बिपाशा बासू आलेले अहेत मुलीच्या या बोलण्यावर आई म्हणते तर मग आजी आणि आजोबाला पण घरात घे. शेवटी मुलगी म्हणते, आजोबा घरातच आहेत पण आजी माझा तो तंग ड्रेस घालून तेथे घोळक्यात उभी आहे, आई कपाळावर हात मारून घेते. यातला विनोदाचा भाग सोडा पण आजचा या महाराष्ट्रातला भारतीय जनता पक्ष किंवा त्यात वर्षानुवर्षे काम करणारे मूळ नेते किंवा कार्यकर्ते यांची अवस्था हळूहळू शूटिंग बघायला तंग कपडे घालून बाहेर पडलेल्या चुटक्यातल्या आजीसारखी झाली आहे का किंवा भाजपामधले मूळ संघ संस्कार अलीकडे झपाट्याने दुर्लक्षित होताहेत का त्यावर नाईलाजाने हो म्हणण्याची वाईट वेळ येऊन ठेपली आहे. विशेषतः 1990 नंतर काहीही करून राज्यात सत्तेवर येऊन दाखवायचे या जिद्दीने या ईर्ष्येने जे महाजन मुंडे युग सुरु झाले त्यावर आता कळस चढला आहे आणि मूळ भाजपा संघ संस्कार किमान या महाराष्ट्रात भाजपाला बाहेरून लोंढे स्वरूपात येणाऱ्या नेत्यांवर व कार्यकर्त्यांवर जर पुढल्या काही वर्षात तेवढ्याच वेगाने जर रुजवल्या गेले नाहीत त्यावर संघ भाजपा मधल्या थिंक टॅंक परिवाराने लगेच पावले उचलली नाहीत तर पुढल्या काही वर्षातल्या भाजपा आणि राष्ट्रवादी सारख्या विचारांचा गाभा नसलेल्या राजकीय पक्षात कवडीचा देखील फरक उरणार नाही हि वस्तुस्थिती आहे किंवा हा प्रश्न संघ व संस्कारी भाजपाच्या मुशीत तयार झालेल्या परिपकव भाजपा कार्यकर्त्यांना आणि तेथे म्हणजे भाजपामध्ये काम करणाऱ्या संघ स्वयंसेवकांना भेडसावतो आहे अस्वस्थ करतो आहे त्यांच्या डोक्यात विचारांचे काहूर घोंघावते आहे…
कदाचित अनेकदा ऐकलेला एक चुटका मी तुम्हाला येथे पुन्हा सांगतो. शहरात उत्तम सेटल झालेल्या तरुणाचे जेव्हा लग्नाचे वय होते तो मनाशी विचार करतो कि शहरातल्या तरुणी मुली संस्काराच्या बाबतीत तेवढ्या काटेकोर नसतात, लग्नाआधीच त्या अफेअर करून किंवा शारीरिक संबंध ठेवून मोकळ्या झालेल्या असतात, आपल्या गावांकडे खेड्यात असे नसते, मुली धाकात असतात त्यांच्यावर कुटुंबाचे उत्तम संस्कार असतात, मोठ्यांचे त्यांच्याकडे बारीक नजर सतत असल्याने थोडक्यात त्या वाया गेलेल्या नसतात म्हणून हा तरुण गावाकडची मुलगी निवडतो तिच्याशी लग्न करून तिला मधुचंद्र साजरा करण्या महाबळेश्वरच्या हॉटेलात घेऊन जातो, रूमची कडी आतून बंद करून ते पलंगाकडे झेपावतात तेवढ्यात दाराची बदल वाजते, तरुण दरवाजा उघडतो, पाण्याचा जग द्यायला पोर्या आलेला असतो, हा पुन्हा जेव्हा पलंगाकडे वळतो तर बायको गायब, इकडे तिकडे शोधाशोध केल्यानंतर बायको त्याला पलंगाखाली लपलेली दिसते. तिला बाहेर ओढून विचारतो, पलंगाखाली का ग लपली त्यावर ती म्हणते मला वाटले नेहमीसरखे पोलीस आले असतील. मूळ जी नेहरू गांधी यांची काँग्रेस होती किंवा संघ स्वयंसेवकांनी काठोकाठ भरलेली जी भाजपा होती त्यातले सुसंसकार हे असे झपाट्याने लुप्त पावले आहेत विशेषतः स्थानिक शेंडा ना बुडुख असलेले राजकीय पक्ष जसे सत्तेच्या केवळ हव्यासापोटी जेवढ्या झपाट्याने जन्माला आले तसे काँग्रेस सेवादल किंवा संघ भाजपामधले संस्कारित नेते, कार्यकार्ते, पदाधिकारी एखाद्या जादूगारासारखे झपाट्याने गायब झाले ज्याची भली मोठी चिंता अलीकडे झपाट्याने विशेषतः भाजपामध्ये पसरली आहे लागली आहे कारण संस्कार देशसेवा समाजसेवा जनतेचे भले असे शब्द मूळ काँग्रेस केव्हाच विसरली आहे किंबहुना इंदिरा गांधी आणि त्यापुढले गांधी कुटुंबीयांनीच उत्तम संस्कार काँग्रेस नेत्यांना कार्यकार्त्यांना विसरायला भाग पाडलेले आहेत. विशेष म्हणजे यात आजच्या श्रीमान देवेंद्र फडणवीसांचा अजिबात दोष नाही, शरद पवार उद्धव यांची शिवसेना राज्यातली काँग्रेस संपवून त्यावर मात करून काहीही करून आपल्याला सत्तेत यायचे आहे असे आदेश जर फडणवीसांना वरूनच दिल्या जात असतील आणि त्या आदेशांमध्ये जर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अजिबात हस्तक्षेप करीत नसेल तर राज्यातल्या भाजपाची राष्ट्रवादी किंवा काँग्रेस व्हायला यापुढे अजिबात वेळ लागणार नाही…
संघाच्या मुशीतून तयार झालेला उत्तम भाजपा नेता अलीकडे राज्यातल्या विशेषतः मुंबईतल्या म्हणजे भाजपा प्रदेश कार्यालयात क्वचितच पाहायला मिळतो, त्याऐवजी जे कालपर्यंत शरद पवार, काँग्रेस किंवा अन्यत्र केवळ सत्ता काबीज करण्यासाठी आणि मिळणाऱ्या सत्तेतून बायकांची व पैशांची मस्ती करण्यासाठी जे सतत दिसायचे दुर्दैवाने तेच नेते तेच दलाल आता म्हणजे महाजन मुंडे युग सुरु झाल्यानंतर थोडक्यात भाजपाला देखील सत्तेची आस निर्माण रुजू झाल्यांनतर तेच बदमाश बदनाम नीच हलकट नेते दलाल किंवा पदाधिकारी आता भाजपा नेत्यांच्या जवळपास घुटमळतांना जेव्हा फार मोठ्या प्रमाणावर दिसतात आढळतात अशावेळी संघाने हस्तक्षेप करून बाहेरून आलेल्या या बेरकी संधीसाधू मंडळींना संघ आणि भाजपचे मूळ हिंदुत्व आणि सर्वोत्तम समाजसेवेचे देशसेवेचे संसकार त्यांना एकत्र करून अगदी नियमित घडवून आणणे अत्यंत गरजेचे आहे जे अगदी सहज शक्य आहे म्हणजे तुम्हाला भाजपामध्ये राहून पुढे जायचे असेल, यशस्वी राजकीय वाटचाल करायची असेल तर तुम्हाला आमची नेमकी तत्वे समजावून घेऊन आचरणात आणावी लागतील, हे या बाहेरून आलेल्यांना सांगणे फायद्याचे व गरजेचे आहे जे नेमक्या एकेकाळी इंदिरा गांधी विसरल्या त्यांनी सेवादल सारख्या त्यांच्या संस्कार घडविणार्या संस्था बासनात गुंडाळून ठेवल्या आणि तेथेच पुढे झपाट्याने राज्यातली विशेषतः देशातली काँग्रेस संपली, हे असे राज्यातल्या भाजपाचे अजिबात होता कामा नये अन्यथा भाजपा आणि कट्टर हिंदुत्व खूप मागे पडेल…
तूर्त एवढेच : हेमंत जोशी