बुडत्या उद्धवाचा पाय खोलात…
जसा टप्प्या टप्प्याने उद्धव यांचा राजकीय ह्रास होत गेला म्हणजे त्यांचे आजचे मोठे राजकीय अपयश केवळ काही महिन्यांच्या चुकीच्या कृत्यांचे हे नक्की फळ नाही तर क्रमाक्रमाने ते जसे चुकत गेले त्याचे नेमके विषारी फळ आज त्यांच्या हातात पडले त्यामुळे आज राजकरणात पूर्णतः ह्रास पावलेले उद्धव आता त्यांनी कितीही आटापिटा केला तरी त्यांना पूर्वपदावर येण्या यानंतर खूप वेळ द्यावा लागणार आहे आणि केलेल्या चुकांची शिक्षा त्यांना तसेच त्यांच्या पापात सहभागी असलेल्या त्यांच्या कुटुंब सदस्यांना नक्की आधी भोगावी लागेल नंतर वाटल्यास प्रायश्चित घेतल्यास त्यांना त्यांचे पूर्वीचे राजकीय वैभव प्राप्त होईल, या दिवसात त्यांना कितीही आटापिटा करू द्या, उपयोग शून्य किंवा पवारांना कितीही ओरडून सांगू द्या कि पुढल्या सहा महिन्यात हे सरकार कोसळणार आहे, पवारांचे सांगणे म्हणणे देखील नक्की खोटे ठरणारे आहे, जसे उद्धव यासी सारे सोडून गेले आहेत किंवा आणखी आणखी कितीतरी सोडून जाणार आहेत नेमकी ती वेळ आपल्यावर देखील ओढवू नये म्हणून पवार चुकीचे सांगत सुटले आहेत त्यांचे हे विधान अगदीच दिशाभूल करणारे आहे. याक्षणी मला पवार यांच्यात शोले मधला मावशी कडे जाऊन धर्मेंद्रविषयी खुबीने युक्तीने वाईट बोलणारा अमिताभ त्या पवारांमध्ये लपून दडून बसल्याचा मोठा भास होतो आहे. रिक्षा सुसाट, रिक्षावाला या पद्धतीने उद्धव जे अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन म्हणजे पातळी सोडून मुख्यमंत्र्यांना म्हणजे राज्याच्या प्रमुखाला ज्यापद्धतीने डिवचताहेत, त्यातून एकनाथ शिंदे यांची मानहानी न होता याउलट उद्धव ठाकरे विषयी अत्यंत चुकीचा संदेश अख्या राज्यात पसरतो आहे, नुकसान एकनाथ यांचे नव्हे तर उद्धव हेच जनतेच्या कार्यकर्त्यांच्या नेत्यांच्या शिवसैनिकांच्या मनातून आणखी आणखी उतरू लागले आहेत…
आज याठिकाणी मी जे उद्धव ठाकरे यांना अगदी बेंबीच्या देठापासून ओरडून सांगतो आहे तेच मी तब्बल 28-30 वर्षांपूर्वी बाळासाहेब ठाकरे यांना सांगितले होते, माझे एक ऑफिस माहीम परिसरात आहे तेथे प्रकाश आयरे नावाचे शिवसेनेचे नगरसेवक निवडून यायचे, त्यांना आणि स्थानिक शिवसैनिकांना जेव्हा खुद्द बाळासाहेब ठाकरे यांनी महानगर दैनिकाच्या निखिल वागळे यांच्यावर हल्ला करण्याचे आदेश दिले होते आणि महानगर वागळे विरुद्ध थेट बाळासाहेब ठाकरे हा वाद रस्त्यावर आला चव्हाट्यावर आला, मी प्रकाश आयरे यांना माझ्या ऑफिस मध्ये शांतपणे बसवून हाच निरोप बाळासाहेबांना द्यायला सांगितला कि तुम्ही नेते म्हणून फार मोठे आहात, तुमच्यासमोर निखिल वागळे म्हणजे पैलवानासमोर अगरबत्ती किंवा अभिनयात अमिताभ समोर लक्ष्मीकांत बेर्डे, तुमच्या या अशा चिथावण्याने निखिल मोठा होईल आणि राजकीय नुकसान तुमचे होईल, बाळासाहेबांनी माझे सांगणे झिडकारले त्यानंतर निखिल वागळे याचे एखाद्या अट्टल गुन्हेगारासारखे आत्ता आता पर्यंत म्हणजे त्याचे पत्रकार म्हणून महत्व संपेपर्यंत सेनेच्या बाबतीत घडत गेले म्हणजे एखादा अट्टल गुन्हेगार जसा पोलिसांसमोर निर्ढावल्याने तो त्यांना देखील घाबरत नाही तसे निखिलचे झाले त्याला शिवसेनेची बाळासाहेबांची स्थानिक नेत्यांची अजिबात भीती त्या हल्ल्याने वाटेनाशी झाली त्यामुळे निखिल थेट शिवाजी पार्कात बसून बाळासाहेब किंवा शिवसेनेवर किंवा स्थानिक आक्रमक नेत्यांवर लिहून बोलून मोकळा व्हायचा आणि उभ्या राज्याला तो वाघाच्या रूपात आणि त्याच्यासमोर बाळासाहेबांसहित अख्खी शिवसेना मांजरीच्या भूमिकेत बघितल्याचा भास व्हायचा, उद्धव यांनी नेमकी तीच चूक केली आहे म्हणजे एकनाथ शिंदे यांना हिणवण्याच्या नादात वेडात चिडवण्याच्या नादात सारी सहानुभूती शिंदे यांना मिळून उद्धव यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हलकट पद्धतीचा ठरणारा आहे हे नक्की लक्षात घ्या. थोडक्यात एकनाथ यांच्या अंगावर शिंतोडे, घाण उडवण्यासाठी उद्धव यांनी थेट गटारात मारलेला दगड त्यांच्या स्वतःच्या अंगावरच घाण उडवून त्यांचा राजकीय चेहरा विद्रुप करणारा नक्की ठरणार आहे त्यामुळे यापुढे उद्धव यांनी ठरवावे कि एकनाथ यांना घालून पाडून बोलतांना स्वतःचे आणखी खूप नुकसान करवून घ्यायचे आहे कि मागल्या चुकांची दुरुस्ती करून पुढे जाण्याचा प्रयत्न करायचा आहे…
तूर्त एवढेच : हेमंत जोशी